अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कथा. लेखक श्री. रवींद्र वाळिंबे
अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये श्री. रवींद्र वाळिंबे यांनी लिहिलेली ही कथा.
सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो मोठ्याने गाणे बडबडू लागला. “सौरभ, अरे काय चालले आहे?” आईने विचारले. “तू काय आता लहान आहेस? काय हा पसारा मांडून ठेवला आहेस. अरे, नववीत आहेस. जरा नीट वाग.” सौरभ म्हणाला, “अगं आई, मी आज शाळेत गायन परीक्षेत पहिला आलो.” ‘अरे वा! उत्तम! अभिनंदन! म्हणून तुला कसंही वागायला परवानगी नाही मिळाली.” आई म्हणाली. ‘आधी बूट जाग्यावर ठेव, दप्तर कपाटात जाऊ दे आणि युनिफॉर्म धुवायला जाऊ देत. आधी हातपाय धुवून घे. आधी खाऊन घे आणि खाऊन झाल्यावर खेळायला जा.’ “हो. तु टीचरसारखी छडी घेऊन मागे लाग माझ्या. नाहीतरी तु टीचर आहेसच.” “हो. आहेच मी शिक्षिका.” आई म्हणाली. “आणि मी जे काही सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे.” “हो कळलं.’ सौरभ म्हणाला, “सारखे लेक्चर नकोय मला. मी गायनाच्या परीक्षेत पहिला आलो त्याचे कौतुक राहिले दूर.” “तसं नाही रे राजा,” आई म्हणाली, “कौतुक तर आहेच पण तू चांगलं वागावंस हीच माझी इच्छा आहे रे. मी कोणी तुझी शत्रू का आहे?” हे चालू असताना सौरभची आजी बेडरूममधून बाहेर आली. ती सगळे “आत ऐकत होती. ती म्हणाली, “अगं, राहू देत. आज तो इतक्या खुशीत आहे तर त्याच्या आनंदात विरजण घालू नकोस.’ अलका म्हणाली, “अहो आई, पण म्हणून त्याने बेशिस्तीने वागावे असे नव्हे ना. मी काय त्याची वैरीण आहे का? त्याने स्वत:चे स्वत: आवरावे, खाऊन घ्यावे आणि खेळायला जावे यात कसले आले विरजण! अहो, आजकालची मुले मैदानी खेळ खेळत नाहीत त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होत नाही. शारीरिक हालचालींमुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते मानसिक विकास होतो आणि मुख्य म्हणजे सांघिक खेळामुळे हार पचविण्याची मानसिक ताकद मिळते. मी सुद्धा शाळेत खेळाची शिक्षिका असल्यामुळे मला हे जास्त ठाऊक आहे.” आजी म्हणाली, “असू दे. आजचा दिवस त्याला जास्त काही बोलू नकोस. एवढा आनंदात आहे तर आजच्या दिवस नाही खेळायला गेला तर काही बिघडत नाही.’
रात्री बाबा आल्यावर जेवणाच्या टेबलावर सौरभच्या स्पर्धेची सविस्तर चर्चा झाली. सगळ्यांनी त्याचे अभिनंदन केले. आई म्हणाली, “बाळा सौरभ, आता सगळ्यांना सांग पाहू तू स्पर्धा कशी जिंकलास ते.” सौरभ म्हणाला, ‘आज सातवी, आठवी आणि नववीच्या वर्गातील मुलांची गायन स्पर्धा होती. त्यात बारा मुलांनी भाग घेतला होता. माझ्या नववीच्या तुकडीतून आम्ही दोघे होतो. क्वार्टर फायनल, सेमी फायनल झाली आणि फायनलला आम्ही दोघे होतो. त्यात मी पहिला आलो. आणि हो बाबा, मी पहिला आल्याचे आईला काही कौतुकच नाही.” सौरभची आई म्हणाली, “शाबास, तू जिंकल्याबद्दल माझ्यातर्फे आज आईस्क्रीम तुला हव्या ते फ्लेवरचे.’ सौरभ म्हणाला, “नको त्याने घसा खराब होईल.” बाबा म्हणाले, “वा! क्या बात है? आतापासून गळ्याची एवढी काळजी घ्यायला लागलास.? उत्तम. असो. तुला जे काही हवे हवे असेल ते सांग.” सौरभ म्हणाला, “आता तरी काही नको. जेव्हा हवे असेल तेव्हा सांगेन.” सगळे म्हणाले, “ठीक आहे. ” जेवण झाल्यावर आईच म्हणाली, ठीक आहे बेटा, तुला जर वाटत असेल तर गाण्यावर लक्ष केंद्रित कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. गो अहेड आणि बेस्ट लक.”
सौरभचा गाण्यातला परफॉर्मन्स बघून संगीत शिक्षकांनी त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले. सौरभच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घेतले. आणि म्हणाले, “सौरभचा गळा खरेच चांगला आहे. तुमच्या घरी कोणी गाणारे आहे का?” दोघेही म्हणाले, “नाही.” शिक्षक म्हणाले, “अरे वा! तरीही सौरभचा गळा खूप चांगला आहे. गळ्याला चांगली फिरत आहे. मी असा विचार करतोय की मी सौरभवर जरा जास्त मेहनत घेईन. त्यासाठी त्याला शाळेच्या वेळेनंतर थोडं थांबावं लागेल. तुमची काही हरकत नाही ना?’ सौरभचे वडील म्हणाले, “हो. हो. काहीच हरकत नाही पण याचा रोजच्या अभ्यासावर तर काही परिणाम होणार नाही ना?” संगीत शिक्षक म्हणाले, “नाही, नाही. त्याची काळजी आम्ही घेऊच. कारण शाळेचा विचार आहे की, आपल्या शाळेतर्फे सौरभला आंतरशालेय स्पर्धेसाठी पाठवायचे, आणि त्यासाठी त्याच्यावर भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि हो पुढचे वर्ष दहावीचे. त्यामुळे त्याला जे काही करावयाचे आहे ते याच वर्षी. त्याच्या सगळ्या अवांतर गोष्टी बंद कराव्या लागतील. फक्त अभ्यास आणि गाणे एके गाणे.
चालेल ना? आणि हो त्याच्या खाण्यावरसुद्धा बंधने येतील. थंड, तेलकट, तुपकट आणि बाहेरचे खाणे एकदम बंद. अहो, शाळा आजकाल मुलांवर अशी मेहनत घेत नाहीत. सौरभचे भाग्य उजळले म्हणून समजा. अहो, कुठच्या कुठे नेऊन ठेवू आम्ही सौरभला. खरंतर तुम्ही आमचे आभार मानायला हवेत. असो. मी तुमची परवानगी गृहीत धरतो. काय?’ सौरभचे वडील कोणी काही म्हणायच्या आत ‘हो’ म्हणाले. हे सगळे बोलणे चालू असताना सौरभ तिथेच होता. संगीत शिक्षकांचे बोलणे ऐकून तो हवेतच तरंगू लागला.
संगीत शिक्षकांनी विचारले, “तुमच्याकडे हामोनियम आहे?” सौरभचे वडील म्हणाले, “नाही. घेऊ का विकत?” संगीत शिक्षक म्हणाले, “नको. चांगली हामोनियम खूप महाग असते आणि शाळेत चांगली हार्मोनियम आहेच. तुम्ही एक काम करा. आपला तंबोरा असतो ना ज्याच्यावर आपण तारा जुळवून सूर लावतो तसे एक इलेक्ट्रॉनिक वाद्य बाजारात मिळते. त्यावर तंबोऱ्यासारखे स्केल जुळवून कुठेही सराव करता येतो म्हणजे सौरभला मधल्या सुट्टीतसुद्धा माझ्या रूममध्ये बसून रियाझ करता येईल. मी ते तुम्हाला आणून देईन.” शिक्षक म्हणाले, “सौरभ, लागणार ना आता जोरदार तयारीला? शाळेचे नाव खाली जाता कामा नये. काय?” सौरभ उत्साहाने ‘हो’ म्हणाला.
घरी येताना वडील आणि सौरभ खूप खुष होते. कधी एकदा घरी जातो आणि सोसायटीत सगळ्यांना सांगतो असे झाले. वडील तर सौरभच्या आईला म्हणाले, “पाहिलंस, शाळा सौरभसाठी काय करायला तयार झाली. नाहीतर तू शाळेतून सौरभ आल्यावर त्याला मातीत लोळण्यासाठी आणि ढोपरे फोडून घेण्यासाठी बळेबळे पाठवतेस. काय मिळणार आहे मातीत लोळून? आणि क्रिकेट सोडले तर मैदानी खेळांना कुत्री तरी विचारतात का? गाण्यात किती डिग्निटी आहे. उज्ज्वल भविष्य आहे.” सौरभची आई गप्प गप्प होती. सौरभचे वडील तिला म्हणाले, “एवढं सगळं चांगलं चालू असताना तू का चेहरा फुगवून बसलीस? नाहीतरी तुला सौरभने गाण्यात यश मिळवावे असे मनापासून वाटतंच नाही.” ती म्हणाली, “असं कसं असेल? माझा पोटचा मुलगा आहे हो तो मला चांगले वाटणार नाही असे तुम्हाला वाटलेच कसे?” “नाही, तुझा चेहरा सांगतोय. आता विषय इथेच संपला कळले?” हे सगळे सौरभच्या समोरच चालले होते. त्यालाही कळेना की आई अशी गप्प का? हे सगळे पाहिल्यावर तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा निश्चय केला. घरी आल्यावर सौरभच्या वडिलांना भराभर सोसायटीत सगळ्यांना फोन केले. मित्रांना देखील ही खूशखबर दिली. त्यांनी फर्मान सोडले की एक बेडरूम आता सौरभची. त्याला आता कधीही रियाझ करता यायला हवा.
रात्री सगळे कामे आटोपून सौरभची आई बेडवर येऊन लवंडली. तिचा नवरा तर काय हवेत तरंगून झोपून गेला पण तिच्या डोळ्याला डोळा नव्हता. ती वर गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत होती. शाळेत घडलेल्या घटना पुन:पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत होत्या. मनात विचारांचे काहूर माजले होते. आपल्या नव-याने आपले मत विचारणे तर सोडा, साधे बोलूसुद्धा दिले नाही. एवढी का मी कवडीमोल आहे? शाळेने काय केले आहे ते नव-याला सांगून समजणार नाही. आधीच तो फणकारत आहे. शाळेने चक्क आपल्या प्रतिष्ठेसाठी सौरभला आपला मोहरा बनवला आहे. त्यात हे सांगणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. किती बंधने त्याच्यावर लादली आहेत. शाळा आणि गायन याच्याशिवाय त्याला आयुष्य ठेवले नाही. आणि आपला नवरा तर काय हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे. मैदानी खेळ म्हणजे मातीत लोळणे? तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. तिने ते पदराने पुसले आणि ती कुशीवर वळली आणि तिच्या मनात भीती दाटून आली. आपण काही बोललो तर सौरभ आपल्याबद्दल मनात राग धरून बसायचा.
दुसऱ्या दिवसापासून सौरभचे वेळापत्रकच बदलले. सकाळी क्लास, अभ्यास, मग शाळा. ती सुटल्यावर गायनाची शिकवणी. रात्री रियाझ, रात्री उशिरा झोपणे, खाण्यावर बंधने. त्याला इतर आयुष्य उरलेच नाही. त्याची दमछाक तिला बघवत नव्हती तरी ती निमूटपणे सहन करीत होती. दोन महिन्यांनी शाळेने त्याला तालुका पातळीवर गायन स्पर्धेत निवडले. त्यात तो पहिला आला. शाळेत जोशात जल्लोश झाला. शाळेत सत्कार झाला. जो तो संगीत शिक्षकाचे कौतुक करू लागला. त्याच्या आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सौरभला आणि त्याच्या वडिलांना तर काय आभाळ ठेंगणे झाले. तालुका पातळीवर निवडला गेल्यामुळे साहजिकच पुढच्या स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर दोन महिन्यांनी बोलावणे आले. त्या स्पर्धेतही तो पहिला आला. तसे पाहायला गेले तर या दोन्ही स्पर्धा फार स्पर्धात्मक दर्जाच्या नव्हत्या. पुन्हा शाळेत जल्लोष, कौतुक, पेढे वाटणे, भाषणे, संगीत शिक्षकाचा सन्मान. हे पाहिल्यावर तर सौरभचे वडील एकत्र जेवताना सौरभच्या आईला म्हणाले, “बघितलंस सौरभची मेहनत, यश, अरे, माझ्या सौरभला अपयश ठाऊकच नाही.” सौरभला तर स्वर्ग दोन बोटावर उरला पण आईचा मात्र या वाक्याने काळजाचा ठोका चुकला. ती विचार करू लागली की, अपयश ठाऊक नाही? अरे, खरंच जेव्हा अपयश येईल तेव्हा हा कसा सामोरा जाईल. पण ती बोलू शकली नव्हती.
काही दिवसांनी एका प्रसिद्ध मराठी वाहिनीवर जाहिरात आली की गाण्याच्या स्पर्धेसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील स्पर्धक भाग घेऊ शकतात. अगदी भारताबाहेरचे सुद्धा भाग घेऊ शकतात. साहजिकच घरचे आणि शाळा असे दोघेही सौरभला स्पर्धेसाठी पाठविण्यासाठी सज्ज झाले. सौरभला त्यासाठी पुण्याला जावे लागणार होते. शाळेचे शिक्षक आणि वडील असे दोघे त्याच्याबरोबर ऑडिशनच्या आदल्या दिवशी पुण्याला गेले. ऑडिशन्स पार पडल्या. तिघांनाही वाटत होते की सौरभचा स्पर्धेत समावेश होणार पण त्यांना हे समजत नव्हते की ही गायन स्पर्धा जागतिक पातळीवर होणार आहे. येणारे सगळेच तयार गळ्याचे असणार आहेत. ऑडिशन पार पडली पण सौरभ त्यात निवडला गेला नाही. तिघांनाही प्रचंड हादरा बसला. सौरभला तर जरा जास्तच बसला. आतापर्यंतचे यश बघून सौरभला वाटले होते की मी जन्माला आलो आहे तोच मुळी जिंकण्यासाठी. तिघेही परतले. गावी आल्यावर कसे सांगायचे की सौरभ निवडला गेला नाही. सौरभला तर वाटले की आपल्याला आता कोणालाही तोंड दाखवता येणार नाही. पण परतल्यावर जे घडले ते सांगावेच लागले. सौरभच्या आईला खूप धक्का बसला. तो सौरभ न निवडला गेल्याचा नाही तर तो अपयश कसे पचवणार याचा.
घरी आल्यावर कोणीही कोणाशी बोलत नव्हते. घर एकदम अबोल झाले. घराला अवकळा आली होती. सौरभ काहीही न खातापिता आपल्या खोलीत गेला आणि त्याने धाडकन दरवाजा आतून लावून घेतला. सौरभची आई सुन्न मनाने आवराआवर करू लागली. ती सौरभच्या बेडरूमपाशी आली आणि ती थंडगार पडली. तिचे डोळे जागच्या जागी थिजले, बेडरूमच्या दरवाजा खालून रक्ताचा एक ओघळ बाहेर आला होता. तिने ताबडतोब नवऱ्याला आणि शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा आतून बंद होता. तो तोडला. सौरभ बेडवर पडला होता व त्याने मनगटाची शीर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता व तो शुद्धीत नव्हता. ताबडतोब डॉक्टरना बोलावण्यात आले. त्यांनी सौरभला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले. सुदैवाने फार उशीर झाला नव्हता. त्याच्यावर उपचार झाले. संध्याकाळी तो शुद्धीवर आला. डॉक्टरांनी हे कशामुळे झाले असावे असे दोघांना विचारले. वडील काही सांगणार त्याच्या आधीच सौरभची आई संतापाने म्हणाली, “कुणी काहीही बोलणार नाही. आता फक्त मी बोलेन.” डॉक्टरही अचंबित झाले. तिने झाला प्रकार विस्ताराने सांगितला. अगदी गायनाच्या शिकवणीपासून ते पुणे येथील स्पर्धेत निवड न होण्यापर्यंत. डॉक्टर दोघांना म्हणाले, “सौरभला मी हॉस्पिटलमध्ये भरती करतो. तो शारीरिकदृष्ट्या पूर्ण बरा झाल्यावर या विषयावर मी तुम्हा दोघांशी सविस्तर बोलेन.” सौरभवर तीन-चार दिवस उपचार झाले. तो शारीरिकदृष्ट्या पूर्ण बरा झाल्यावर घरी सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी सौरभच्या आई-वडिलांना बोलावले व म्हणाले, “हे बघा सौरभला तातडीने समुपदेशनाची गरज आहे आणि ते फक्त मोठ्या शहरातच होते. तो या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर लवकरात लवकर पुण्याला एखाद्या समुपदेशकाकडे घेऊन जा. मी एक-दोन समुपदेशकाचे पत्ते देतो. ते त्याला समुपदेशन करतील. तुम्ही कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन करतील.”
सौरभला घेऊन त्याचे आई-बाबा समुपदेशनासाठी पुण्याला समुपदेशक देशपांडे यांचेकडे घेऊन गेले. त्यांनी केस ऐकून घेतली. ते सौरभला म्हणाले, “सौरभ, तुझ्याकडे गाण्याची कला आहे, आहे ना?” “हो.” डॉक्टर म्हणाले, “मला सांग एवढ्या टोकाला का गेलास?’ सौरभ आधी काही बोलायला तयार नव्हता. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला बोलते करण्यात देशपांड्यांना यश आले. सौरभ म्हणाला, “मी सिलेक्ट झालो नाही हे कळल्यावर मी पूर्ण हताश झालो. आयुष्यात काही उरले नाही असे वाटले. सगळे संपल्यासारखे वाटले. शाळेत कोणत्या तोंडाने जाऊ असे वाटले. आता सगळीकडे आपली छीथू होईल असे वाटले.” डॉक्टर म्हणाले, “काळजी अजिबात करू नको, तुझ्या गाण्याची काळजी घेणारे आईबाबा आहेत. शाळेचे “शिक्षक आहेत. तुझी गाण्याची तयारी चांगली आहे. तू बक्षिसेही मिळवली आहेस, आणि एका अपयशाने एवढा खचून गेलास. अरे, आयुष्यात प्रत्येक वेळेस यश नाही मिळत. म्हणून इतकी टोकाची भूमिका घ्यायची? अरे, आयुष्य इतके सोपे नसते रे. या खोलीतील प्रकाश दिसतोय ना? त्या दिव्याचा शोध लावणाऱ्या एडिसनला कित्येक वेळा अपयश आले म्हणून तो खचला नाही, एव्हरेस्ट शिखर सर करण्यात गिर्यारोहकांना कितीतरी वेळा अपयश येते म्हणून ते खचून जात नाहीत. पुन्हा नव्या जोमाने यशाकडे वाटचाल करतात. खऱ्या यशाला ‘शॉर्टकट’ नसतो. तुला प्रत्येक वेळेस यश मिळत गेले म्हणून आता मला अपयश येणारच नाही अशी समजूत झाली. पण असे नसते, आयुष्यात यश-अपयश येतच राहते. ही स्पर्धा काय तुझ्या आयुष्याची शेवटची स्पर्धा आहे का? नाही ना? एवढ्या तेवढ्याने खचून जाणे योग्य आहे का? तूच सांग.” “नाही.’ सौरभ म्हणाला. “गुड बॉय देशपांडे म्हणाले. “आता तूर्त सगळं विसरून फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. काय?’ समुपदेशक देशपांडे म्हणाले. “आणि सौरभ, अशा समुपदेशनासाठी म्हणजेच मार्गदर्शनासाठी तुला काही वेळा माझ्याकडे यावे लागेल. सौरभ बेटा, तू थोडावेळ बाहेर बसशील? मला तुझ्या आई-बाबांशी बोलायचे आहे.” तो बाहेर गेल्यावर देशपांडे त्याच्या आई-बाबांना म्हणाले, “हे पहा, यात संगीत शिक्षक व शाळेप्रमाणे तुमचाही दोष आहे. तुम्हीसुद्धा त्याच्या गाण्याला नको तितके महत्त्व दिलेत.’ वडील म्हणाले, “नाही. फक्त मीच महत्त्व दिले. त्याची आई सतत सांगत होती की गाणे काही सर्वस्व नाही. अभ्यास, खेळणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पण आम्ही तिचे म्हणणे धुडकावून लावत होतो.’ देशपांडे म्हणाले, “सौरभच्या केसमध्ये त्याच्या अवास्तव महत्त्वाकांक्षेला तुम्ही खतपाणी घातलंत तुमची मिसेस सतत याबद्दल सांगत होती तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंत, त्याचा परिणाम काय झाला? तो अपयश पचवू शकला नाही. तुम्हीच नाही तर असे असंख्य सुशिक्षित पालक ही चूक करतात. अपेक्षांचे प्रचंड ओझे पाल्यावर टाकतात. सौरभच्या केसमध्ये त्याला फाजिल आत्मविश्वास होता तर इतर मुले आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि अपयश आल्यावर घरी काय होईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न करतात. अहो, हल्ली तर दहावीच्या परीक्षेआधी व नंतर समुपदेशनासाठी आम्हाला केंद्रे सुरू करावी लागतात. त्यासाठी कितीतरी पाल्यांचे आम्हाला फोन येतात आणि या अपयशाची भीती इतकी वाढली आहे की दहावीचा रिझल्ट घेण्यासाठी पाल्यासोबत पालकांना सोबत येणे आवश्यक केले आहे. आपल्या काळात असे होते? आपला पाल्य कधी मॅट्रिक झाला व कसे शिक्षण घेतोय याची पालकांना चिंता नसे. आता पालकच मुलांवर अपेक्षांचे ओझे लादतात. तो बिचारा नववीपासूनच धास्तावलेला असतो. दहावीची परीक्षा त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनवितात. मान्य आहे की, दहावी महत्त्वाची आहे. पण ते काही जिवनसर्वस्व नाही ना. मला एक सांगा, आपली कामवाली बाई कधी धास्तावलेली दिसते का हो? तिच्या मुलाला चाळीस टक्के जरी मिळाले तरी ती पेढे वाटते.”
सौरभची आई म्हणाली, “झालं गेलं जाऊ दे हो, मुलगा हाताशी लागला ही देवाची कृपा आहे.”
देशपांडे म्हणाले, “आता एक काम करा त्याला तूर्तास गाणे विसरून जाऊ दे.”
वडील म्हणाले, “पण?” देशपांडे म्हणाले, “होय, मी योग्य तेच बोलतोय. थोडे दिवस त्याला गाण्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. कायमचे बंद करा असे मी म्हणत नाही. सध्या त्याला त्याचा वेळ देणे गरजेचे आहे. त्याला इतर गोष्टीत मन रमवायला सांगा. खेळ असो, वाचन असो, खेळाने मन ताजेतवाने होते, मेंदूला रक्तपुरवठा होतो, स्नायू मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ”
ज्याची त्याला अत्यंत गरज आहे.’ सौरभच्या आईने त्याच्या वडिलांकडे हेतुपरस्सर नजरेने पाहिले. देशपांडे म्हणाले, “वाचनात त्याला मोठ्या लोकांची चरित्रे वाचायला द्या. म्हणजे ती लोकं मोठी होताना किती संकटांशी लढत होती, किती अपयशी झालेली होती हे त्याला कळेल. आणखी काही सेशन्स घ्यावी लागतील.” आणि त्यांनी सौरभला आत बोलावले व म्हणाले, “सौरभ, तुला आणखी काही वेळा माझ्याकडे यावे लागेल. मी तुला काही होमवर्क देतो. शाळेत देतात तसा. तो पुढच्या खेपेस येशील तेव्हा तो करून यायचा. तो पाहिल्यावर पुढे काय करायचे, किती वेळा यायचे ते ठरवता येईल, बरोबर ना? अरे, तू हुशार आहेसच, आत्ता थोडा धक्का बसलाय इतकंच. गुड बॉय.” ते सौरभच्या आई-वडिलांना म्हणाले, “आणखीन एक, अतिशय महत्त्वाचे, पुढचे वर्ष त्याचे दहावीचे आहे. तेव्हा त्याच्यावर कोणतेही दडपण आणू नका. नाहीतर असाच प्रसंग पुन्हा उद्भवेल आणि हो, त्याला मानसिक स्वास्थ्यासाठी औषधांची गरज कदाचित भासू शकेल तेव्हा त्याला न संकोच करता मानोपसोचारतज्ज्ञांकडे घेऊन जा. तुम्ही सुशिक्षित आहात. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेड्याच्या डॉक्टरांकडे जाणे नव्हे. बरोबर ना?”
साधारण पाच-सहा सेशन्स सौरभचे उपचार चालले. आता सौरभ उत्तम आहे. दहावीचा अभ्यास जोमात सुरू आहे. अवांतर वाचन, खेळ यातसुद्धा तो रमला आहे. अपयश आले तरी बेहत्तर या वृत्तीने तो वागतो आहे. खऱ्या अर्थाने त्याच्या आईला हवा आहे तसा तो झाला आहे.
— श्री. रवींद्र वाळिंबे
२०१ बी, मंदार अपार्टमेंटस,
पाण्याच्या टाकीसमोर, वर्तक रोड,
विरार (प.) जि. पालघर – ४०१ ३०२
मो. ८९४९७५२८१५
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply