कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी. माणसांचे जसे अनुयायी असतात तसे विचारांचेही अनुयायी असतात. एकदा पायवाट निर्माण झाली की ती मळलेली पायवाट होउन जातें. अनेक जण डोळे झाकून तिच्यावरून मार्गक्रमण करतात. छंद जोपासले व त्याला प्रेरणेची साथ असेल तर ते यशाचे अत्युच्च टोक अनेकजण गाठतात. Over the Top.यशोशिखरावर झिग झिगलर यांचे हे बेस्टसेलर पुस्तक आहे. झिग झिगलर अमेरिकेतील महत्त्वाचे प्रभावी व प्रेरणादायी वक्ते व लेखक होते.ते अचूकपणे दाखवून देतात की संपूर्ण आयुष्यात लोकांना जे हवे असते ते कसे मिळवावे.
आनंदी, निरोगी, रास्तपणे समृद्ध आणि सुरक्षित राहण्यासाठी आणि मित्र, मनाची शांती, चांगले नातेसंबंध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशा टिकवण्यासाठी काय करायला हवे.
यशोशिखरावर हे पुस्तक तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनण्याच्या आणि तुमच्याजवळ जे आहे ते ओळखून विकसित करत राहण्याच्या जबाबदारीची खात्री करून देते. झिग झिगलर लोकांना शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या संसाधने पूर्णपणे वापरात आणण्यासाठी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. या पुस्तकात आपल्या ध्येयसिद्धीचा कार्यक्रम उभारण्याची चर्चा केली आहे. तुमच्या मनात योग्य आशा- आकांक्षा पेरण्यासाठी, रुजविण्यासाठी आणि फुलविण्यासाठी हे पुस्तक प्रोत्साहन देते. शरीराला जशी ऑक्सिजनची गरज असते तशी आत्म्याला आशा-आकांक्षा ची आवश्यकता असते. पैशाने विकत घेता येणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू तुम्ही कशा विकत घेऊ शकता तसेच पैशाने ज्या वस्तू विकत घेता येत नाहीत त्याही वस्तू तुम्ही कशा मिळवू शकाल याचा मूलमंत्र यामध्ये आहे. पराभव हा एक प्रसंग असतो, माणूस नव्हें, हे पटवून देण्यात हे पुस्तक प्रमाणभूत असे आहे. तुमचे स्वतःबद्दलचे चुकीचे चित्र योग्य तऱ्हेने बदलून टाकण्यासाठी आणि हे जीवन तुम्हाला काय बहाल करू शकते याबद्दल च्या तुमच्या जाणिवा प्रगल्भ करण्यास हे पुस्तक तुम्हाला खात्रीनं मार्गदर्शन करते.
हे जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्यास आणि जगण्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आवश्यक ते सारे योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला हे पुस्तक शिकवेल, प्रोत्साहित करेल आणि क्रियाशील बनवेल.
काही करण्यापूर्वी तुम्ही ते कां करायला हवे आणि काही मिळवण्यापूर्वी तुम्ही ते कां मिळवायला हवे याचे प्रात्यक्षिक यात दाखवले आहे. योग्य दृष्टिकोन विकसित करणे त्याला योग्य त्या कौशल्याची जोड देणे आणि त्यासाठी आपल्या चारित्र्याचा पाया पक्का करणे या गोष्टी च्या साह्याने जीवनात समतोल राखण्यासाठी, यशाची खात्री करून घेण्यासाठी हा ग्रंथ सदैव सहकार्य करतो. तुम्ही वर्तमानावर लक्ष केंद्रित करत भविष्य सुरक्षित करता यावे म्हणून भूतकाळाशी मैत्री का करावी हे समजण्यासाठी हे पुस्तक मदतीला येईल. तुम्ही अधिक सुखी, निरोगी, धनवान, सुरक्षित कसे असावे, तुम्हाला अधिक मित्र कसे मिळावेत, तुमची मनस्थिती कशी सुधारावी; कौटुंबिक संबंध सलोख्याचे कसे असावेत आणि तुमची आशा कशी वाढेल हे यात दाखवले आहे. इतरांना जे हवे आहे ते देण्यासाठी मदत केली की, तुम्हाला जे पाहिजे ते मिळते हा संदेश या पुस्तकातून दिला आहे. तुमचा आर्थिक दर्जा वाढावा, कौटुंबिक संबंधात सुधारणा व्हावी आणि तुम्ही आनंदी व निरोगी व्हावे, यासाठी या पुस्तकात मार्ग दाखवला आहे.
ओव्हर द टॉप हे पुस्तक गरजांनुसार मार्गदर्शक तत्त्वांचा आराखडा तर देतेच, त्याचबरोबर भयगंड, दोष राग -लोभ -मत्सर इ. भावानांचा उहापोह करते. त्यायोगे उज्वल भविष्याची भक्कम पायावर इमारत कशी उभारता येईल यासाठी आणि तुमच्या जीवनातील आशा- अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. प्रोत्साहन आशा -अपेक्षांची प्रेरक शक्ती असते. प्रोत्साहित करणारे विचार आणि कल्पना या पुस्तकाच्या पानापानावर पेरलेले पाहायला मिळतील ते तुमच्या यशाच्या मार्गावर मार्गस्थ तर करतीलच पण त्याबरोबरच तुमचा मार्ग गतिमान करण्यात यशस्वी ठरतील. उत्कट भावभावनांचा हा ग्रंथ आहे. उत्कट भावभावनांची शिदोरीच यशोशिखराकडे नेते. काही पुस्तके प्रेरणा देतात, काही पुस्तके दिशा देतात, काही पुस्तके कृती करायला भाग पडतात, काही पुस्तके नैराश्यातून उभारी देतात,त्यापैकीच हे एक. माणसे घडायला पुस्तकें ही कारणीभूत असतात म्हणून पुस्तकें वाचायलाच हवीत. वाचाल तर वाचाल एवढेच नाही तर वाचाल तर चांगले जगाल.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply