टीप : माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.
ये रे ये घना | तोषवी तना |
तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु ||
हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी |
पुरे पुरे आता, राख-रांगोळी |
सुकल्या माझिया देहावरी,
जल शिंपना | ये रे ये घना | ये रे ये घना …..|| १ ||
व्याकुळ मी ही, तरु-वेलीही |
आटले सारे, नद्या-नालेही |
वाट पाहुनी, तुज हाकारी |
तुझी मेघना | ये रे ये घना | ये रे ये घना . || २ ||
तापल्या तनुला, तुझीच आंस |
तुझिया स्पर्शाचा, ओला सुवास |
अधिर, आतुर, मिलन क्षणाची |
भूक भागवना | ये रे ये घना | ये रे ये घना … || ३ ||
तुझ्यावाचुनी, कोंब ना उगे |
पक्षी पाखरे, कोण रे जगे ?
कैसे विनवू ? तूची सांग ना |
पुरवी कामना | ये रे ये घना | ये रे ये घना .. .|| ४ ||
केव्हांची तुला , साद घालते |
ये रे ये झणी, तुज झेलते |
रिमझिम त्या, तालावरी |
करी नर्तना | ये रे ये घना | ये रे ये घना…. || ५ ||
सखया अंबरी, कां रे थांबला ?
लपंडाव हा, फार लांबला |
विरह, वेदना, सोसू मी कशी ?
सोसे न यातना | ये रे ये घना | ये रे ये घना ..|| ६ ||
क्षमावंत तू, क्षमाशील तू |
हाकेला देवा, धावशील तू |
चुकला मानव, तो ही आळवी |
हे दयाघना | ये रे ये घना | ये रे ये घना……. || ७ ||
©कवी : उपेंद्र चिंचोरे
Leave a Reply