सक्काळी दार उघडलं आणि अतिथी गृहाच्या दारातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! ”
गेटवरच्या वॉचमनने हसून स्वागत केले आणि अदबीने बॅरिकेड वर केलं. मीही त्याला ” काय म्हणतंय धुकं आणि थंडीची रात्र कशी गेली ? ” असं विचारलं. त्याने होकारात मान हलवली.
समोर अथांग पसरलेला विद्यापीठीय रस्ता कॅमेऱ्याला खुणावून गेला. त्याचे निमंत्रण मग मी कैद केले. बाहेरच्या हवेत गारवा बऱ्यापैकी शिरशिरत होता. मी आपला “कभी-कभी ” आणि “सिलसिला ” मधील अमिताभने दिलेला पॉलीनेक घालून प्रभातीचे चालणे सुरु केले. दूरवर कोवळं सूर्यबिंब झाडाच्या फांदीला लोंबकळत होतं. मनात मात्र –
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं
तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती
तुम इस बात पे हैरां होती, तुम उस बात पे कितनी हँसती
तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं I
सुरु होतं.
ती मात्र तिकडे “चला, प्रभातीची चाल नेमाने सुरु ठेवलीय तर ” म्हणत किंचित आश्वस्त !
यूँही अकेले चलते चलते “पंढरपुरी चहावाल्याकडे” हॉल्ट घेतला.
परतताना सकाळपासून निर्हेतुक बरसणारे दव जगरहाटीनुसार हळूहळू वाढत्या सूर्यप्रकाशात दिसेनासे झाले पण मनात जाऊन दडले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply