होय, मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी फसवलंय. मला आय.ए.एस., आय. पी. एस. वा तत्सम पदवीधारक अधिकाऱ्यांनीही फसवलंय. माझा साधं सोपं जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेऊन यांनी मला मोठी स्वप्न दाखवून फसवलंय. पहिलं गरीबी हटाव आणि नंतर अच्छे दिनचा नारा देऊन मला या सर्वांनी फसवलंय..
पोटासाठी होणारा माझा रोजचा संघर्ष कमी व्हावा येवढीच माझी लहानशी अपेक्षा होती. फुटपाथवरून चालताना व्यवस्थीत ताठ मानेने चालता यावं ही छोटीशी इच्छा होती. पण राजकारण्यांनी मतांच्या लालसेने आणि अधिकाऱ्यांनी पैशांच्या हव्यासाने तिथे वाढू दिलेल्या झोपड्यांनी माझा चालण्याचा आणि मृत्यूचे सापळे बनलेल्या पेव्हरब्लाॅक्सनी माझा जगण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. ह्या झोपड्या आणि पेव्हरब्लाॅक्सच्या लांचेवर स्वत:च्या घरातले संडासही इटालियन मार्बलने बनवून घेतलेल्या राजकारणी-अधिकाऱ्यांनी मला फसवलंय..झाडांना विषारी इंजेक्शन्स टोचून त्यांचा खुन करणारांना संरक्षण देणाऱ्या आणि वरून मलाच वृक्षारोपणाचे धडे देणाऱ्या ढोंगी नेत्यांनी मला फसवलंय..
रोजचा लोकल प्रवास सुधारण्यास असमर्थ ठरलेल्या शासन-प्रशासनाने मला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवून फसवलंय. पूल सुरक्षित असल्याचा लेखी हवाला देणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मला फसवलंय. जमिनिवरच्या रेल्वेमार्गावरच्या पावसाच्या पाण्याचा निचरा न करु शकणाऱ्या पुस्तकी इंजिनिअरांच्या हातात, जमिनिखालच्या रेल्वेचं काम देऊन मला स्वर्गाचं स्वप्न दाखवून पाताळात ढकलून फसवलंय. स्वर्ग काय नि पाताळ काय, तो पाहाण्यासाठी मरावच लागतं, असा अप्रतक्ष उपदेश देऊन वर माझ्या फसवणूकीवर मीठही चोळलंय..
परिणाम भकास, पण बाता विकासाच्या करणाऱ्या सर्वांनी मला फसवलंय. शेतकऱ्यांचा कैवार घेऊन धरणात मुतणाऱ्यांनी मला फसवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रान्ड करुन स्वत:ची पोळी भाजणारांनी मला फसवलंय. स्वच्छ कारभाराचा नारा देऊन धडधडीत गलिच्छ कारभार करणाऱ्या शासनाच्या प्रत्येक घटकाने मला फसवलंय. लुटारुंना बॅंकेची तिजोरी राजरोस लुटू देणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या चोरीत सामील असणाऱ्या आॅडिटरांनी मला फसवलंय. लोकसेवेच्या नांवाखाली शिक्षणाचे महागडे माॅल्स उभारणाऱ्या सरकारी शिक्षण महर्षींनी मला फसवलंय. मातृभाषेचा महिमा गात मराठी शाळांचा गळा घोटणाऱ्या सरकारने मला फसवलंय. रस्ते फेरीवाल्यांना आंदण देऊन मला प्रशासनाने फसवलंय. आपल्या खात्याचं ब्रिद बदलून ‘खलरक्षणाय, सद्ननिग्रहणाय’ करणाऱ्या पोलिसखात्याने मला फसवलंय. जाती-धर्माचा बागुलबुवा उभा करून वर जय हो, वंदे मातरम, जय मराठी आणि भारतमाता की जय व्हाया जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या सत्तेच्या सर्व रंगाच्या दलालांनी मला फसवलंय..
आता यांना फसवण्याची माझी पाळी…!!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply