येशील तू कधीतरी रे
वाट तुझी ओढ लागता
नकळत मोहरले मी रे
गुंतून हळवे क्षण लाजता
स्पर्श तुझा मज हलकेच होता
अंगावर रोमांच अलगद उमटता,
तुझ्या मिठीची आस व्यक्त अशी
व्याकुळ मी भाव मग्न होते एकांता
का भूल तुझी पडली मज रे
मलाही न उमगले कातर वेळा,
सोडव मोह पाश माझे हे सारे
डोळ्यांत पाणी अलगद उरले आता
घेतलेस भाव मिठीत तू मजला
ते बहरणे निःशब्द सलते आता,
अस्वस्थ मी अशी अव्यक्त मनी
न कळणार तुला माझी ही व्यथा
घे अलवार घट्ट मिठीत मज
वाट त्या क्षणाची पाहते आता,
गोड ती जाणीव मोहक मधुर
तुला न आस ती कोरडा तू असा
न भेटणार कधी तू असा
परी आठवणीत मी हुरहूरते,
तुझ्या स्पर्शात व्याकुळ मोहिनी
मोहात पुरती मग फसत जाते
ये असा तू सोडून तमा सारी
मी ही वाट वळणाची सोडून येते,
भेट एकदा तू अवचित असा रे
व्याकुळ मन तुझ्या मिठीत बद्ध होते
न पेलवतो मनास आताशा
शांत समंजस भाव तो सारा,
तुझ्या ओढीत कासावीस जीव
तप्त मन अव्यक्त भाव कोमेजला
न कळणार तुला बोचरी सल माझी
न कळणार दग्ध ही अवस्था,
न कळणार शांततेमागील तगमग ही
न कळणार मी तुला कधीही केव्हा
येशील का रे तू अलवार असा
जीव तुझ्या ओढीत बावरला,
न तुला ओढ माझी भाव मी तो जाणला
अश्रूंचा पूर डोळ्यांत आल्हाद साचला
न भेटशील तू कधी मज रे
तोड तू अलवार मज आता,
समजून घे तू भाव माझे सारे
समजून घे माझ्या मन व्यथा
किती कितीक आर्त तुझ्यात होऊ
न कळणार तुला नाजूक मन कथा,
का मोहरल्या मनात माझ्या तुझ्या
मिठीतल्या अबोल स्पर्श भावना
घेता मिठीत अलगद तू मज
अश्रूंचा बांध फुटेल मग तेव्हा,
न येणार तू कधीच रे माहीत मज आता
वाट पाहून तुझी चंद्रही माझ्यासवे झाकोळला
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply