नवीन लेखन...

योद्धा (कथा)

अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त  घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा.

यांच्यात एकच दोष होता, तो म्हणजे मैदानी खेळ अजिबात न येणार. खोखो, लंगडी, पाठशीवणी न येणारा आणि कोणत्याही क्रीडा स्पर्धेत कधिच भाग न घेणारा. मात्र त्याच्या हुषारीपुढे हे वैगुण्य लपले जायचे.

तो चौथीत असतानाच त्याचे वडील वारले होते, चार भावंडात तोच मोठा. काकांचा आधार होता.त्याच आधारावर खूप शिकण्याची मनीषा बाळगून अजित वाढत होता.

सातवीच्या बोर्ड परीक्षेत पहिला आल्यामुळे वार्षिक ₹500 स्कॉलरशिप मिळाली,ती काकांच्याकडे जायची. गांवात हायस्कुल न्हवते म्हणून त्याला शिक्षणासाठी निपाणीला ठेवण्यात आले.

पंचक्रोशीतील अनेक मुले शिक्षणासाठी निपाणी ला यायची. तिथे सदलगेकर काकांनी आपल्या लांबसडक माडीवर लाकडी बॅटन पट्ट्या वापरून 8×6 फुटाच्या वीस खोल्या बनवल्या होत्या.या पार्टीशनची उंची जेमतेम 6 फूट! लाकडी पार्टिशन च्या पट्टया मध्ये असणाऱ्या फटीतून दुसऱ्या खोलीतील सगळे दिसायचे.

सदलगेकर म्हणजे एक मोठे प्रस्थ होते, काका काकू दोघेही तसे म्हातारे, मुलगा परदेशात नोकरी करायचा, त्यामुळे तो क्वचितच यायचा. माडीवरच्या खोलीतील ४० विद्यार्थी आणि खाली असणारी १५-२० बिऱ्हाडे आणि सर्वांच्याकडून येणारे भाडे यामुळे काकांचे म्हातारपण सुखात जात होते.
अजित हा सुद्धा त्यांचा भाडेकरू पण वयाने सर्व मुलात लहान, शिकणारे सगळे कॉलेज ला जाणारे हा एकटा आठवीतला. इतर वेळी तो काकूंना मदत करायचा, जसे किराणा माल आणून दे, गिरणीतून धान्य दळून आणणे.

रोज सगळ्या मुलांचे डबे एस टी ने यायचे. थोडा ओव्हरसाईझ पत्र्याचा डबा. त्यात असायच्या फडक्यात बांधलेल्या भाकरी किंवा चपाती.आणि छोट्या डब्यात असायची एखादी पातळ उसळ.किंवा भाजी, काही निरोप असेल तर चिट्ठी किंवा गरजेनुसार १०-२०रुपये, प्लॅटिकमध्ये गुंडाळून यातच ठेवलेले असायचे.

वेगवेगळ्या गावातून डबे घेऊन येणाऱ्या ST बसेस सकाळी साडे आठ पर्यंत निपाणी स्टँडवर पोचायच्या आणि तिथून डबे आणण्यासाठी, सायकल असणारी २-३ मुले स्टँडवर जाऊन डबे आणायची आणि प्रत्येकाला द्यायची.

हा डबा म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे, रात्रीचे जेवण सगळे असायचे. लागली भूक की खाल्ली उसळ भाकरी असे ते दिवस होते.

त्याच वेळी तो १९७२ चा कुप्रसिद्ध दुष्काळ पडला.पिकं उगवलीच नाहीत, जी उगवली ती करपून गेली.प्यायला पाणी मिळेनास झालं आणि अजितला एके दिवशी डब्यातील भाकरी आणि वांग्याच्या भाजीसोबत चिट्ठी आली.दुष्काळामुळे तुझा शिक्षणाचा खर्च आम्हाला झेपणार नाही, तू हायस्कुल सोडून ताबडतोब परत ये.

बाप मेल्यावर जितकं अजित रडला न्हवता, त्या पेक्षा दस पटीने जास्त, धाय मोकलून ओक्सबोक्शी रडला.जवळ सांत्वन करायला कोणी न्हवतं.
त्याच वेळी १९७१-७२ च्या दरम्यान सीमा आंदोलनाने वेग घेतला. बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात आलाच पाहिजे यासाठी आंदोलन चालू झाले, जसे बेळगांव बंद झाले, तसे निपाणी बंद. सर्व एस टी बसेस बंद झाल्या त्यामुळे गावाकडे परतायचे मार्ग खुंटले.बाजारपेठा , शाळा बंद झाल्या, वातावरण तंग झाले. आणि अजितचे दोन वेळा जेवण्याची वांधे झाले.

ज्या मुलांची गांव ५-१० मैलावर होती, ती चालत किंवा सायकलीने गांवाला निघून गेली.अजित अडकला.ना गांवी परतायची सोय, ना डबा येण्याची शक्यता,ना खिशात पैसे. जेंव्हा जेंव्हा आभाळात ढग दाटून येतात आणि कांही दिसेनासे होते तेंव्हा कुठेतरी वीज चमकते आणि एक क्षणासाठी तरी मार्ग दाखवते.तो मार्ग ज्याला पकडता येतो तो नक्कीच पुढे जातो.

अजितच्या वर्गात पण दुसऱ्या तुकडीत सोमनाथ होता, सोमनाथचे वडील ताराचंद, हे राजस्थान मधून आलेले, इथे खानावळ टाकून बसलेले.देवचंद कॉलेज चे प्राध्यापक, बँकेतील अधिकारी वर्ग हे त्यांचे रोजचं गिऱ्हाईक. अजित, सोमनाथ च्या मध्यस्तीने ताराचंद सेठ पर्यंत पोचला.
ताराचंद सेठ असले तरी स्वतः स्वयंपाक रांधायचे,सोमनाथ पाट-पाणी बघायचा. अजितच्या वाट्याला काम आले, ताटे मांडणे, भाजी, आमटी वाढणे, नंतर भांडी घासणे, ती पुसून पुढच्या पंक्तीची तयारी करणे. आणि हे सगळे केल्यामुळे अजितच्या जेवणाचा प्रॉब्लेम संपला. दोनवेळा पोटभर ताजे जेवण मिळू लागले,दुपारी मधल्या सुट्टीत खाण्यासाठी २फुलके व भाजीचा डबा मिळू लागला. ताराचंद सेठ नी अजित आणि सोमनाथ मध्ये कधी भेदभाव केला नाही.

जेवणाचा प्रश्न सुटला पण खोलीभाडे ₹ ८ आणि इतर खर्चासाठी लागणारे ५-६ रुपये कुठून आणणार.सदलगेकर काका म्हणाले, मी थांबतो एक दोन महिने पण भाडे देत येत नसेल तर खोली सोड.

दरम्यानच्या काळात अजितच्या ओळख सुरेश सोबत झाली होती, सुरेश हा प्रकाश  टॉकीज मधला तिकीट विकणारा बुकिंग क्लार्क. त्या काळी राजेश खन्नाचे चित्रपट लागले की सुरेशची मजा असायची, निपाणीचे मोठे मोठे शेठ त्याला सुरेशदादा म्हणायचे !

अजितने आपली व्यथा त्यांना सांगितली. सुरेश दादा म्हणाले अरे एव्हडच न, मी तुला तिकीट देत जाईन, तू ब्लॅक ने विक, निम्मा फायदा तुझा ! पण संस्कारी अजितने हि ऑफर धुडकावली.

मग सुरेशदादानी त्याला विडी कामगारांचे मस्टर, पगारपत्रक भरायचे काम दिले.

रजिस्टर लिहून सगळ्यांच्या सह्या घेण्याची जबाबदारी अजितची असायची. सह्या करणारे प्राणी दुर्मिळच होते, बहुतेक सगळे अंगठे बहाद्दर. पुरुषांना पगार असायचा रोज ३ रुपये तर बायकांना २ रुपये. अजितला महिन्याला 20 ₹ मिळायचं, त्याचे सगळे खर्च भागून पैसे शिल्लक पडू लागले.

हळूहळू त्याच्या लक्षात आले, कामगारांना जो पगार दिला जातोय त्याच्या दुप्पट नंतर रजिस्टरवर लिहला जातोय. आणि बरीच नावं खोटी असून त्यांचाही पगार काढून घेतला जातोय. त्यांच्या खोट्या सह्या/अंगठे केले जातात. अजित ने भाबडेपणाने हि गोष्ट कामगारांना सांगितली. ती एक दिवसात सुरेशदादा पर्यंत पोचली, त्याने अजित कडून ताबडतोब काम काढून घेतले.

अजितने खूप विनंत्या, आर्जव केली तेंव्हा, सुरेश दादा म्हणाले, थांब तुला मालकांना भेटवतो.

अजित जे गुमस्ता मस्टर लिहायचा, त्यात प्रकाश टॉकीज च्या मालकांचा विडी कारखाना पण होता. त्यांनी अजितला बोलावून घेतलं, आणि अजित त्यांच्या टॉकीज मध्ये तिकिटांचा काळाबाजार करतो म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या हवालदाराने अजितला चार मुस्कटात ठेऊन दिल्या पाच सहा लाथा घातल्या.

त्या दिवशी अजित  शिकला, की चुकीच्या मार्गावर, चुकीच्या लोकसंगे राहिलो, सोबत चाललो   की तो मार्ग सोडताना सुद्धा शिक्षा मिळते.
शांतपणे तो खोलीवर गेला. शिक्षण महत्वाचे होते, 2 महिन्यात वार्षिक परीक्षा दिली.

परिक्षा संपल्यावर अजितने पोलीस स्टेशन मध्ये पत्र दिले, त्यात विडी कामगारांना कसे निम्मा पगार देऊन फसवले जाते हे कामगारांची नावे व पगाराचे आकडे या सकट लिहिले, बोगस कामगारांची नांवे लिहिली.

प्रकाश टॉकीज च्या मालकांच्या सांगण्यावरून मारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नांव लिहिले. आणि जर हा हवालदार आणि प्रकाश टॉकीजच्या मालकांवर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशन समोर उपोषण करणार असे हि लिहिले.इन्स्पेक्टर ने पत्र घेतले वाचले, विक्राळ पणे हसून म्हणाला हुच्च मगन, भाळ शाण्या आगीदी, होग मनिगे !(खुळ्या लेका, लई शाना झालंयस, जा घरला)

अजित कांही बोलला नाही, त्याने, सेम तशीच तक्रार लिहून बेळगावच्या तरुण भारत या दैनिकाच्या, कैफियत या साप्ताहिकाला पाठवली.

दोन्हीकडे एका लहान , १२-१३  वर्षाच्या मुलाची करामत म्हणून विशेष चौकटीत छापून आली. त्यात छापलेला उपोषणाचा दिवस उजाडला आणि सकाळी सात वाजता अजित पोलीस स्टेशन च्या दारात पथरी पसरून बसला. न्याया साठी पहिले उपोषण ! ना बॅनर, ना पोस्टर. तासाभरात हि बातमी निपाणीत पोचली आणि स्थानिक पत्रकार, समाज सेवक, अजितच्या हायस्कूल मधील शिक्षक, विद्यार्थी सगळे पोलीस स्टेशन ला दाखल झाले. पोलीस स्टेशन हे एव्हढेशे सूप एव्हढे आणि माणसं गोळा झाली ५००-६०० . काहींनी अजितची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, काहींनी इन्स्पेक्टरचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व वर्तमानपत्रात फोटो सह हि बातमी प्रसिद्ध झाली. आणि दिवशी विषय गंभीर बनला, बेळगांव हुन DYSP आले. राजकीय पुढारी आले, समोर लोकांची गर्दी.सीमाभागात मुद्दाम नेमलेला कानडी इन्स्पेक्टर आणि त्याच्यावर खार खाऊन असणारे मराठा एकीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना घाम फोडला. DYSP नी अजितला आत चौकीत यायला सांगितले पण त्याने नकार दिला. शेवटी DYSP बाहेर आले, अजितच्या घोंगड्यावर बसले, म्हणाले थांबव उपोषण , मी कारवाई करतो. अजित म्हणाला, साहेब, कारवाई आधी करा, मग थांबवतो उपोषण. त्याच्या दृढ निश्चयापुढे यंत्रणा नमली.प्रकाश टॉकीज च्या मालकांना आणलं, त्यांना कस्टडीची हवा खावी लागली, त्या हवालदाराला अजितची जाहीर माफी मागायला लावली आणि त्याला सस्पेंड केले.

पगाराची तफावत आणि कामगार हक्क यासाठी गुमास्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांनी चौकशी सुरू केली.

न्यायासाठी, सत्यासाठी झगडावं लागत, ते आपोआप मिळत नाही, हा श्री गणेशा, अजितने मुक्त विद्यापीठात गिरवला !

असत्यावर, सत्याने विजय मिळवला होता. एक चिमुरड्याने उद्योग जगतातील वाळवी आणि सरकारी कारभारातील कीड यावर प्रहार केला होता.

परवाच हा अजित भेटला, साठी ओलांडलेला, थकलेला. तडजोडी करू न शकल्याने व्यावहारिक जगात अपयशी ठरलेला. मात्र अजुनही सत्याची चाड आणि असत्याची चीड मनी बाळगणारा.
थोडावेळ गप्पा झाल्या, मी म्हणालो, अजित तू होतास तस्साच आहेस बघ, अजून ही !!

तो मलूल पणे क्षीण हसला, नाहींरे, शेवटी अपयशी ठरलो, सत्य मांडत असताना, समोरच्या ची इंद्रिय सत्यग्रहण करण्याच्या, स्विकारण्याच्या लायकीची आहेत का, हे पहावं लागतं, नाहीतर माझ्यासारखी गत होते.

मी जेंव्हा जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा जाणवत वयाच्या 13 व्या वर्षी असणारी जिद्द आता खूप कमी झालीय. तडजोडी वाढल्यात भले तत्वाशी नाही करत, पण कुटुंबाशी तर करावी लागते, परिस्थितीशी तर करावीच लागते.

आता एक योद्धा परिस्थितीला शरण गेलाय. आपली अस्मिता, झुंजार वृत्ती गमावून शरण गेलाय…..स्वतःला गमावून बसलाय….

कसा ? नेमकं काय झालं ? मी कुतूहुल अनावर होऊन प्रश्न विचारला.

तो मंद हसला, म्हणाला, अरे मित्रा, जीवनातील शेवटचे युद्ध लढतोय, जिंकलो तर माझे सर्व जग मला डोक्यावर घेऊन नाचेल, हरलो तर सगळे मला विस्मरणाच्या गर्तेत लोटतील.

काहीही झाले तरी मी पुढील ४ वर्ष झुंजणार आहे,आणि त्यानंतर मी आत्मचरित्र लिहिणार आहे! मी कुठे चुकलो, माझे काय चुकले, माझे कसे चुकले सगळं लिहिणार आहे, तोपर्यंत ठेव पेशन्स !

आणि माझ्या लक्षात येण्यापूर्वीच तो निघून गेला. मी त्या पाठमोऱ्या योध्याकडे पहातच राहिलो…..अगतिकपणे.

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..