योग साधनेचा येता
विचार करोनि कर्म घडते
ज्याचे कर्म योग साधते
तोचि भगवंता समीप पोचतो!
अर्थ–
कर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो. ज्या शक्तीचा प्रभाव जास्त त्या व्यक्तीचा स्वभाव तसा ठरतो. विचारशक्ती भावशक्ती क्रियाशक्ती संयम शक्ती अशा या चार शक्ती होय.
कोणाचा स्वभाव कोणता हे ज्याचे त्याने पडताळून पाहणे सोयीस्कर. पुढे जाऊन जगास तो दिसतोच पण, योग्य वेळेत जर तो स्वतःला कळला तर त्यावर काम करणे सोप्पे जाऊ शकते. माणसाचा स्वभाव कोणताही असला तरी त्याला योग्य साधनेची जर मदत मिळाली तर कर्म आणि समाधान यांचा योग वारंवार जुळून आलाच समजा. साधना योग्य झाली की कर्म विचारपूर्वक घडण्यास मदत होते आणि त्याचा फायदा मन शांत होण्यास होतो.
श्री समर्थांनी सांगितलंच आहे की तुमच्या कर्मयोगात सुचकता आणि अखंड सावधानता ही असायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कार्यात सुचकता आणि सावधानता बाळगली नसती तर अफझलखान वध, आग्र्याहून सुटका, पन्हाळगड ते विशाळगड संग्राम आणि अजून असे कित्येक प्रसंग घडलेच नसते कारण त्या आधीच दगा फटका होऊन हे स्वराज्य धुळीस मिळाले असते. स्वतः श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सावधान या शब्दाला योग्य वेळी ओळखले नसते तर कदाचित नारायणा ते श्री समर्थ हा प्रवास घडलाच नसता.
माणसाचा स्वभाव काही असो त्याला योग्य साधना आणि कर्म यांचा योग जुळून आला तर भगवंता कडे जायचा मार्ग म्हणजेच आत्मिक समाधान हे मिळणारच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply