योग हा सामान्य माणसासाठी नसून काही तरी अतिंद्रिय शक्ती साध्य करू पाहणाऱ्या योग्यांसाठी आहे अशी आपल्या देशातील सामान्य माणसांनी समजूत करून घेतली होती. त्याचप्रमाणे या गोष्टींना असलेले गूढतेचे वलय आणि अज्ञान यामुळे तसेच या गोष्टींना धार्मिक आवरणात गुंडाळून पुरोगामी विचारांच्या मंडळीने त्याचे महत्त्व कमी लेखल्यामुळे आपल्या देशातील लोकांनी या गोष्टीकडे पाठ फिरविली होती. पण हाच योग आपल्या देशातील योगाचार्यांनी विदेशात नेला आणि तेथील मंडळी शास्त्रीय ज्ञानाने प्रगल्भ असल्यामुळे याची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि महत्त्व त्यांनी आपल्या कसोट्या लावून घासूनपुसून जाणून घेतले आणि त्याला ‘योगा’ असे संबोधून त्याचा स्वीकारही केला. आता तोच ‘योगा’ म्हणून आपल्या देशातील उच्चभ्रू लोकांत आयात झालेला आहे. समाजाच्या सर्वच थरात याची स्वीकारार्हता वाढताना दिसत आहे त्याला फंड न समजता स्वागतच केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिगत धार्मिक श्रद्धांच्या खुळेपणामुळे कुणी योगाला व त्याच्याशी संबंधित आसनांना विरोध करत असेल तर त्याचे करंटेपण त्याला कसे उमगेल याचाही विचार करणे योग्य ठरणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित केला. हा दिवस भारतातही साजरा केला जाणार आहे. यामुळे येथे काही उलटसुलट चर्चा रंगायला लागल्या आहेत. याचा येथे विचार करण्यापेक्षा राजयोगाबाबत सांगताना स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते की, “राजयोगाच्या साऱ्या शिकवणुकीचा उद्देश आहे – मन एकाग्र करणे, नंतर या एकाग्र मनाने त्याच्याच अगदी आतल्या कप्प्यात काय चालले आहे ते शोधणे, नंतर तिथे जे काही गवसते त्यावरून काही सामान्य निष्कर्ष काढणे आणि अखेर त्यानुसार स्वतःच एखादा सिद्धान्त बसविणे. म्हणूनच, तुमचा धर्म कोणता? हा प्रश्न राजयोग तुम्हाला कधी विचारीतनाही. तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ख्रिश्चन असा, ज्यू असा की बौद्ध असा, त्याला काहीच हरकत नाही. राजयोगाच्या दृष्टीने त्याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही मनुष्य आहात ना – राजयोगाच्या दृष्टीने तेवढेच पुरेसे आहे.
याचाच अर्थ राजयोगाचा पर्यायाने योगाचा संपूर्ण मनुष्यमात्रांना अधिकार आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीतील या अत्युत्तम ज्ञानाचा वारसा नाकारण्याचा प्रयत्न करंटेपणे करण्यात काही अर्थ नाही. तसे पाहता सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन असून योग ही एक व्यापक संज्ञा आहे. या शब्दाचे अनेक अर्थ केले जातात. परंतु समाज कोणत्या अर्थाने त्याकडे पाहतो, तोच त्याचा सामान्यपणे अर्थ घेतला जातो. समाजात योगी हा शब्दसुद्धा प्रचलित आहे. हा शब्द भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. योगी म्हणजे उच्च कोटीचा साधक असा अर्थ घेतला जातो. यात आध्यात्मिक साधना अभिप्रेत असते आणि अध्यात्माची मग अपरिहार्यपणे धर्माशी सांगड घातली जाते. हिंदूचा धर्मग्रंथ असलेल्या भगवद्गीता या ग्रंथातही योग आणि योगी मनुष्यांचा उल्लेख आलेला आहे. ते परिपूर्ण योगशास्त्र आहे असे विद्वानांचे मत आहे. श्रीकृष्णालाही योगेश्वर असे म्हटले जाते. जीवाला परमात्म्याची प्राप्ती करविणे हे गीतेचे अंतिम लक्ष्य आहे. मात्र गीतेतील योग शब्दाचा अर्थ कर्मयोग असाच अनेक वेळा घेणे भाग पडते. त्याचप्रमाणे पातंजल योगसूत्रे प्रसिद्ध आहेत. तसेच राजयोग, लययोग, मंत्रयोग आणि हठयोग असे प्रकारही आपण पाहतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा संबंध आपण नेमक्या कोणत्या योगाशी जोडू शकतो? याचा आपला आपण विचार करावा.
पुन्हा स्वामी विवेकानंदांचा आधार घेतला असता, आपल्या राजयोग या पुस्तकात त्यांनी एका प्रधानाची गोष्ट सांगितली आहे, तिचा उल्लेख येथे करायला हरकत नाही. उंच मनोऱ्यावर एकाकी कोंडण्यात आलेल्या प्रधानाची सुटका करण्यासाठी त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार प्रधानाची पत्नी एका नाकतोड्याच्या केसांच्या टोकांना मध लावून आणि त्याच्या कमरेला रेशमाचा तंतू बांधून त्याला मनोऱ्याच्या शिखराच्या दिशेने सोडते. समोर मधाचा सुगावा लागल्यामुळे त्याच्या लोभाने तो नाकतोडा हळूहळू शिखरापर्यंत पोहोचतो आणि प्रधानाने नाकतोड्याला पकडल्यानंतर त्याच्या कमरेच्या रेशमाचा तंतू प्रधानाच्या हाती येतो. या रेशमी तंतूमागून बारीक सूत व नंतर याच क्रमाने दोरी व मजबूत दोरखंड शिखरापर्यंत पोहोचविला जातो. त्याच दोरखंडाला लोंबकळून प्रधान खाली उतरतो व आपली सुटका करून घेतो. याचा अन्वयार्थ लावताना स्वामी विवेकानंद आपल्या देहातील श्वासोच्छवासाच्या गतीला रेशीम, ज्ञानतंतूमधील शक्तिप्रवाहाला सूत, मनोवृत्तीला पक्का दोर आणि प्राणाला दोरखंड असे संबोधून प्राणाचा संयम कसा साधता येतो ते उलगडतात.
याचाच सुलभ अर्थ घेत आपण असे म्हणू शकतो की, सुरुवातीला सोपे सोपे व्यायामयोग, नंतर विविध आसने व ज्याच्या त्याच्या सोयीनुसार योगाचे भावलेले स्वरूप असे अनुक्रमागत प्रागतिक अर्थ लावण्यास काही हरकत नाही.
योगाची धर्माशी सांगड घालणाऱ्यांना स्वामी विवेकानंदांचे उत्तर असे आहे की, धर्म केवळ पूर्वीच्या काळच्या अनुभवांवरच आधारलेला आहे असे नव्हे तर स्वतःला काही प्रत्यक्ष अनुभूती आल्याखेरीज कुणीही खरोखर धार्मिक या संज्ञेला पात्र होऊ शकत नाहीत असेच योगशास्त्राच्या आचार्यांचे मत आहे. अशी प्रत्यक्ष अनुभूती कशी प्राप्त करून घ्यावी हे शिकविणाऱ्या शास्त्रालाच योग असे नाव आहे.
राजयोगाची साधना म्हणा अथवा अन्य योगांची साधना म्हणा ती मुख्यत्वे मानसिक स्वरूपाची असते हे नाकारता येत नाही. मात्र काही अंशी शारीरिक साधनाही आवश्यक मानली गेली आहे. मन हा शरीराचा सूक्ष्म भाग असून तो शरीरावर कार्य करतो असे मानले तर शरीरही आपल्या मनावर कार्य करीत असते ही गोष्ट तर्कसंगत म्हणावी लागते.
म्हणजेच शरीर आजारी पडल्यास मनही आजारी पडते आणि निकोप शरीरातील मनही निकोप असते ही गोष्ट मान्य केली पाहिजे. जीवनातील वास्तव मात्र असे आहे की, बहुतेक लोकांचे शरीरच त्यांच्या मनावर सत्ता गाजवित असते. याचे कारण असे की त्यांच्या मनाची फारशी वाढच झालेली नसते. एखाद्या पशुपेक्षा सर्वसाधारण मनुष्याची संयमशक्ती फार जास्त आहे, असे म्हणता येणे अवघड आहे. काही जणांची बाह्य इंद्रियेही ताब्यात नसतात हे स्पष्ट आहे. आपले शरीर व मन ताब्यात राहावे यासाठी मनुष्याला बाह्य अथवा शारीरिक बाबींची मदत घ्यावी लागते. आधी आपले शरीर आपल्या ताब्यात आल्यावर मग मनाला काबूत आणून आपल्या इच्छेनुसार त्याला काम करणे आपण भाग पाडू शकतो. योगाचे आचार्य असे सांगतात की, ज्याने आपल्या आंतरिक शक्ती समजावून घेऊन त्यांना कसे हाताळावे हे जाणले आहे तो समस्त प्रकृतीवर ताबा चालवू शकतो. प्रकृतीवर जय मिळण्यावरच मानवाची प्रगती आणि सभ्यता अवलंबून आहे. प्रकृतीला माणूस जितक्या प्रमाणात वश करून घेईल तितका तो प्रगत आणि सुसभ्य म्हणता येईल. प्रकृतीला वशीभूत करण्यासाठी विविध समाजांनी विविध पद्धती अंगीकारल्या होत्या. मात्र पाश्चात्य देशांत अशा विद्येला गुप्तविद्या, चेटूक अथवा जादूटोणा ठरवून या विद्येच्या मागे लागलेल्यांना जिवंत जाळण्यातही आले. मात्र भारतात ही विद्या पूर्णत्वास गेली होती. या गोष्टीला चार हजार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ज्यांच्या हातात हे शास्त्र पडले त्यांनी ती केवळ आपल्याच हातात राहावी या उद्देशाने या शास्त्राला गुप्तविद्येचे स्वरूप दिले. मात्र स्वामी विवेकानंद सांगतात की, योगाच्या या पद्धतीत जे काही गुप्त, गुह्य वा चमत्काराच्या स्वरूपात असेल त्या साऱ्यांचा आपण एकदम त्याग करायला हवा. त्याच्या वाऱ्यालाही आपण उभे राहता कामा नये. जे बल देईल, शक्ती देईल तेच केवळ ग्राह्य धरून आपल्याला दुबळे बनविल ते सारे आपण झुगारून दिले पाहिजे. असे सांगून एखाद्या भौतिक शास्त्राच्या बाबतीत आपण जसे वागतो तसेच याही शास्त्राच्या बाबतीत आपण वागायला हवे आणि अन्य शास्त्रांप्रमाणे हे शास्त्रही शिकून आत्मसात करायला हवे असा त्यांनी आग्रह धरला आहे.
असे असताना मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या योगविद्येला आपण दुर्लक्षित करून कसे चालेल?
योगाचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात –
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥६.१७।।
हा योग फार खाणाऱ्याला अथवा विनाकारण उपाशी राहणाऱ्याला तसेच आळशी व झोपाळू माणसाला आणि विनाकारण जागरण करणाऱ्याला शक्य होत नाही.
आपला आहार-विहार योग्य असावा. आपली दिनचर्या योग्य असावी. झोपणे आणि जागणे यात नियमितपणा असावा. आपले काम योग्य प्रकारे करावे. असे केल्यास या योगाने सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश होतो. हे सर्व किती सोपे आहे. पण आपण असे वागतो का? विलासीपणा आणि कठोरता ही दोन्ही टोके टाळायला हवीत. जो स्वतःला निष्कारण क्लेश देतो तो योगी होऊ शकत नाही. तसेच जो मनुष्य कर्माचा अतिरेक करतो आणि जो अजिबात कर्म करीत नाही, असा कोणीही मनुष्य योगी होऊ शकत नाही.
योगाचा आश्रय घेणाऱ्या माणसांसाठी पतंजली यांनी आठ पायऱ्या म्हणजेच अष्टांगयोग सुचविला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी यांचा समावेश होतो. यम व नियम हे साधकाला नैतिक वळण लावण्यासाठी उपयुक्त ठरतात. यमनियमांचा पाया नसल्यास कोणतीही योगसाधना यशस्वी होणे शक्य नाही. यानंतर आसनाचे महत्त्वही विशद केले जाते. आपण जेव्हा प्राणायामाचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कमालीची मानसिक एकाग्रता साधण्यासाठी प्राणायाम अत्यंत उपयुक्त असतो. मानसिक शक्तीने रोग बरे करणारे, त्याचप्रमाणे संमोहनविद्या जाणणारे व अशाच प्रकारच्या शक्तींचा वापर करू इच्छिणारे सर्वजण प्राणायामाला खूप महत्त्व देतात. अशा व्यक्ती जगभरातील देशात आढळतात आणि त्यांच्या विविध पद्धती असू शकतात.
हा अष्टांगयोग सर्वांना साध्य होऊ शकणार नाही असे नाही, पण त्यासाठी आवश्यक परिश्रम घेण्याची तयारी हवी. मात्र अलीकडे परिश्रम करण्याआधीच मोबदल्याचा विचार करण्याची वृत्ती बळावली आहे.
या सर्व खटाटोपापासून आपल्याला काय लाभ असा विचार पिढी करू शकते. वास्तविक पाहता, ज्ञानलाभ हाच ज्ञानलाभापासून होणारा सर्वांत मोठा फायदा असतो. या ज्ञानाचा उपयोगसुद्धा आहे. आपल्या मनाचे विश्लेषण करून माणसाला जेव्हा जी नित्य, शुद्ध व परिपूर्ण असून कधीही नष्ट होत नाही अशा वस्तूचा साक्षात्कार झाल्यावर त्याच्या दुःखाचा समूळ निरास होतो. भय आणि अतृप्त वासना या सर्व दुःखाचे मूळ आहेत. आपल्या पूर्णत्वाची व अविनाशी तत्त्वाची जाणीव झाल्यावर मानवाला ग्रासून टाकणाऱ्या मृत्यूचे भय अजिबात उरणार नाही. याच देहात तो पूर्ण आनंदाचा उपभोग घेत जगू शकेल. त्याचे जिणे अत्यंत सुसह्य होईल.
खरी गोष्ट अशी आहे की, योग हा सामान्य माणसासाठी नसून काही तरी अतिंद्रिय शक्ती साध्य करू पाहणाऱ्या योग्यांसाठी आहे अशी आपल्या देशातील सामान्य माणसांनी समजूत करून घेतली होती. त्याचप्रमाणे या गोष्टींना असलेले गूढतेचे वलय आणि अज्ञान यामुळे तसेच या गोष्टींना धार्मिक आवरणात गुंडाळून पुरोगामी विचाराच्या मंडळीने त्याचे महत्त्व कमी लेखल्यामुळे आपल्या देशातील लोकांनी या गोष्टीकडे पाठ फिरविली होती. पण हाच योग आपल्या देशातील योगाचार्यांनी विदेशात नेला आणि तेथील मंडळी शास्त्रीय ज्ञानाने प्रगल्भ असल्यामुळे याची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि महत्त्व त्यांनी आपल्या कसोट्या लावून घासूनपुसून जाणून घेतले आणि त्याला ‘योगा’ असे संबोधून त्याचा स्वीकारही केला. आता तोच ‘योगा’ म्हणून आपल्या देशातील उच्चभ्रू लोकांत आयात झालेला आहे. समाजाच्या सर्वच थरात याची स्वीकारार्हता वाढताना दिसत आहे त्याला फॅड न समजता स्वागतच केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिगत धार्मिक श्रद्धांच्या खुळेपणामुळे कुणी योगाला व त्याच्याशी संबंधित आसनांना विरोध करत असेल तर त्याचे करंटेपण त्याला कसे उमगेल याचाही विचार करणे योग्य ठरणार आहे. योगाची सक्ती करणे योग्य नसले तरी योगासक्त होणे हे चांगले आहे, हे आपण नक्कीच जाणून घेतले पाहिजे.
दीपक हनुमंत जेवणे
९५९४९६१८६४
महानगरी वार्ताहर मधील लेख
Leave a Reply