नवीन लेखन...

योगासने व प्राणायाम

शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. पंचमहाभूतांच्या बाह्यप्रकारात वसलेल्या पंचतनमात्रांच्या देवालयाचे पंचकर्मेंद्रीये व पंचज्ञानेंद्रिये हे आधारस्तंभ होत. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात पंचप्राण व पंचउपप्राण यांच्या मंद तेवणाऱ्या समईच्या पंचवातींच्या प्रकाशात आत्म्याचे पूजन व अंहकाराचे निर्माल्य उतरवून, शुद्ध मनाची फुले अर्पण करून, शुद्ध सात्त्विक बुद्धीचा अभिषेक करीत आत्मपूजन करायचे आहे. तेव्हा या बाह्य व अंतःकरणातील शुद्धीशिवाय आत्मपूजन अशक्यच असते. म्हणून महर्षि पतंजलींनी प्रकृतीत जखडलेल्या पुरूषाला बंधमुक्त करण्यासाठी अष्टांगयोगाची योजना आखली आहे. तेव्हा या दृष्टीकोनातून आसन-प्राणायामाचे प्रयोजन बघुया.


व्यायामाचे प्रकार

अनेक ढोबळ मानाने त्यांचे पाश्चात्य व पौर्वात्य असे दोन भाग पाडता येतील. तेव्हा अगोदर व्यायाम म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. व्यायाम म्हणजे शरीराची व शरीरातील प्राणशक्तीची ओढाताण करणे किंवा शरीर शक्तीशी झुंज देणे. आयाम म्हणजे शरीर शक्ती व प्राण शक्ती यांना योग्य तऱ्हेने व योग्य दिशेने आणणे, विस्तृत करणे, संचित करणे अथवा थोपवून धरणे, बांध घालणे आणि त्याचा निरोध करणे. आसन-प्राणायामात प्राण शक्तीला व्यायाम नव्हे तर आयाम दिला जातो. प्राणाचा अपव्यय होऊ न देता योग्य दिशेने प्राण वहन केले जाते. प्राण संचय करून त्याचे निबंधन केले जाते.

आसन-प्राणायाम यांचा आयाम व आवाका विस्तृत व व्यापक आहे. शरीर, मन व आत्मा यांना सांभाळणारा हा सेतू शरीरारोग्य, मानसिक संतुलन व आत्मिक समाधान मिळवून देणारा आहे. आसन आणि प्राणायाम ही दोन्ही अंगे वेगवेगळी असली तरी ती परस्पर पुरक, परस्पराधारी व परस्परावलंबी आणि परस्पर परिणामकारक आहेत. त्यांच्यातील भेद सुक्ष्म आहे. दोन्ही अंगांचा सखोल अभ्यास केलेल्यांना योग्य वेळी, आवश्यकतेनुसार इतर अंगांच्या साधनेत समावेश कसा करायचा हे नक्कीच कळून येते. आध्यात्मिक मार्गात, आत्मशोधनात महर्षि पतंजलींना देहाचे अवमूल्यन अमान्य आहे. प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादेपर्यंत स्वतःचे अस्तित्व जाणवते. त्या पलिकडचे अस्तित्व जाणवत नाही, अनुभवाच्या कक्षेत येत नाहीत. म्हणून ते अमान्य असते. आसन-प्राणायाम हे आपल्याला या जाणीव प्रदेशातून अजाणीव किंवा असंवेदनशील प्रदेशात नेऊन संवेदनशील बनवतात.

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही यमाची पंचतत्वे आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान ही नियमांची पंचतत्वे आचरणात आणायची झाल्यास साधकाला प्रथमतः कास धरावी लागते नियमांची. कारण नियम हे स्वतःवर लादून घेऊन, बाह्योपचाराने का होईना पाळता येतात. पुढे या नियमबंधनातून जे बदल घडत जातात, त्यांचा उपयोग पंचयमपालनात होतो.

यम नियमांचे बाह्यतः पालन करणे वेगळे आणि कालांतराने बहुधा ते अशक्यही असते. तेव्हा अंतःकरणात बदल घडवून ही तत्वे सहजगत्या पाळणे, स्वभावात बदल घडविणे, हे आसन-प्राणायामाभ्यासाने शक्य होते. अष्टांगयोगाचे रहस्य यातच दडलेले आहे.

योगासने व प्राणायाम ही मुलतः अंतःसंतुलन साधत. योगासनांचा सराव करताना साधकाने प्रथमतः डोळस असावे लागते. शरीराच्या प्रत्येक भागाशी व मनाशी अंतर्गत संपर्क साधावा लागतो. अंतर्मुख होऊन उजव्या डाव्या बाजूला संतुलन साधावे लागते. ऊर्जा जागृत करावी लागते. शरीराच्या सुक्ष्म हालचाली टिपीत, त्यांची योग्यता-अयोग्यता पडताळून प्राणशक्ती संतुलित करावी लागते.

शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये नवजीवन, नवचैतन्य आणावे लागते. रक्तप्रवाहाची जाणीव ठेवून मज्जातंतुना उत्तेजित करणे किंवा शांत करणे यातही संतुलन साधावे लागते. तेव्हा कुठे आसन सिद्धी होते. याचाच अर्थ असा की आसनांचा सराव करताना या सर्वांचा खोलवर विचार करावा लागतो. आसन प्राणायामाभ्यासाने शरीर-मनाचा आवेग व आवेश थोपवून आव्हान स्वीकारण्याची ताकद येते.

विविध आसनांची गरज भासते ती यासाठीच. ध्यानासाठी केवळ एकाच आसनात बसून चालते, असे धरून इतर आसनांचे महत्त्व न जाणणे हे देखील अज्ञान असते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोषांचा अंतर्भेद करून हा अंतप्रवाह साधणे आसन-प्राणायामाने शक्य होते. आणि म्हणूनच पाश्चात्यांना आज त्याची खरी गरज जाणवते आहे.. कारण वर उल्लेखिलेल्या सर्व व्याधी, अडचणी व मानसिक संतुलन गमावणाऱ्याना उत्तर मिळते ते योगासन – प्राणायाम यांच्या अभ्यासाने.

प्राणायामाचेही विविध प्रकार आहेत. त्यांचे प्राणांवर व मनावर होणारे परिणाम ही वेगवेगळे असतात. प्राणाचा आयाम म्हणजे प्राणाची विशालता, व्यापकता, तीव्रता, दीर्घता, सुक्ष्मता नियमन आणि निरोध. हे साधणे म्हणजे प्राणायाम.

एखादे तलम वस्त्र पाण्यात टाकल्यावर त्यातील प्रत्येक धागा जसा हळुवारपणे भिजत जातो त्याप्रमाणे प्रत्येक पेशीला प्राणामध्ये प्राणतत्वांमध्ये हळुवारपणे भिजवणे, प्राणाला पसरविणे, विस्तृत करणे म्हणजे प्राणायाम.

-आसन – प्राणायामांचा आस्वाद अनुभवायला देखील शिकावे लागते. खेळाडूंना उदासीन किंवा नकारात्मक होऊन चालत नाही. खेळताना किंवा कोणताही खेळाचा सराव करताना सकारात्मक भूमिका घेण्यासाठी मनाची उंची वाढविण्यासाठी, आत्मिक ध्यैर्य टिकविण्यासाठी आसन-प्राणायाम तंत्रात देखील आवश्यक असे बदल करावे लागतात. मैदानावर हाय खाऊन चालत नाही. त्यासाठी आसने करताना अर्थशून्य दृष्टी ठेवता कामा नये. तसेच स्मृतीशून्य होता कामा नये. मेंदू हा डोळ्यांच्या खिडकीतून डोकावतो. तर मन हे कानांच्या तावदानातून बाहेर जाते. तेव्हा उदासिन्य व नकारात्मकता घालवण्यासाठी डोळ्यांना वारंवार शरीराच्या व मनाच्या गतीशी व कृतीशी संपर्क ठेवायला लावावे लागते. शरीराच्या पेशीन् पेशीची जाणीव असावी लागते. शरीर, इंद्रिये व मन यांची साखळी तोडून चालत नाही. त्यासाठी मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या आसनाचा सराव करावा लागतो..

अशा वेळी प्राणायामांचा अभ्यासदेखील एकदम खोलात न शिरता करावा लागतो. प्रथम स्वतःची ताकद आजमावून पूरक प्राणायामाचा आधार घ्यावा लागतो. श्वास दीर्घ नसला तरी तो स्पष्ट, तीव्र व तीक्ष्ण असणे आवश्यक आहे. असा पूरक प्राणायाम खेळाडूमध्ये आत्मविश्वास व धिटाई आणण्यास उपयुक्त ठरतो. इच्छाशक्ती वाढवण्यास आंतरकुंभक प्राणायामाचा उपयोग होतो. याउलट हेकेखोर व तापटवृत्ती असणाऱ्यांना हाच सराव वेगळ्या तऱ्हेने करावा लागतो. त्यांच्या मज्जातंतूना व प्राणशक्तींना विचलित होऊन चालत नाही. अशावेळी रेचक – प्राणायामावर भर द्यावा लागतो. हे झाले थोडक्यात.

हे साधण्यासाठी पुन्हा इतर प्राणायाम प्रकारांचा आधार घ्यावा लागतो. मैदानावर क्रीडास्पर्धा संपल्यावर उत्तेजित झालेल्या शरीराला व मनाला देखील आसन-प्राणायाम आवश्यक असतात. अर्धहलासन, विपरित करणी यासारखी आसने स्नायू, मज्जातंतू, मेंदू व मनाचे सात्वंन करून त्यांना शांत करतात. तसेच प्रत्येक खेळाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. विशिष्ट तऱ्हेच्या खेळाला विशिष्ट तऱ्हेच्या हालचाली, एकाग्रता व कौशल्य यांची आवश्यकता असते. विविध आसने व प्राणायाम आणि त्यांचे तंत्र वापरात आणावे लागते.

तेव्हा आसन-प्राणायाम या अंगांची दिशा समजण्यास देखील सखोल अभ्यास करून त्यांच्या उपयुक्ततेचा आवाका समजून घेणे आवश्यक आहे. खेळाडूंना या दोन्ही अंगाचे स्वरुप जाणवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तरच योग हा सर्व कलांचा पाया कसा आहे हे समजेल.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..