ग़ालिब म्हणतो,
ख़्याल उनका सुख़न मेरा,
ज़बाँ उनकी दहन मेरा
बहार उनकी, चमन मेरा
गुल उनके, गुलिस्ताँ मेरा !
(विचार त्याचे पण भाषा माझी,
त्याचा स्वर,पण माझे मुख;
त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा;
त्याची फुलं नि वाटिका माझी.)
“कोसला”कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे.
तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की मी आणि मिलिंद काही एकमेकांचे ‘खास’ मित्र नव्हतो.
अभय, दुर्गेश,अनिल व विशेषतः प्रविण सांगळे हे त्याला जास्त जवळचे होते हे मी माझगावच्या कोर्टात (ज्या कोर्टात दिलीपकुमारने एकही रिटेक न घेता मधुबालावरच्या आपल्या दिव्य प्रेमाची जाहीर कबुली दिली होती) पुराव्यानिशी शाबित करेन.
झाले असे होते की आमची शाळा सहभागी झालेल्या एका आंतरशालेय नाट्यस्पर्धेच्या नाटकात मिलिंद प्रमुख भूमिकेत होता.
तो सकाळी वर्गात आल्या आल्या पहिल्या बाकावर आपले दप्तर टाकून (हे पाहूनच नंतर मला पनवेल -मुंब्रा लालपरीत खिडकीतून सीटवर रुमाल टाकून जागा अडवायची कल्पना सुचली असेल का ?)
मोठया ऐटीत तालमीसाठी निघून जात असे.
एकेदिवशी त्याने शाळेला (व अर्थातच तालमीला) बुट्टी मारली.
शाळा सुरु झाल्यावर थोड्याच वेळात घामाघूम झालेले नाटकाचे सर्वेसर्वा दाभोळकर सर आमच्या वर्गावर आले.
मिलिंद आलेला नाही हे कळल्यावर त्यांनी ‘मिलिंदच्या घरी फोन आहे का ?’ अशी समस्त विद्यार्थ्यांकडे चौकशी केली.
त्याकाळी तो काळा कुळकुळीत फोन आम्ही फक्त फॅमिली डॉक्टरांच्या आणि हिंदी सिनेमातील तहहयात पोलीस कमिशनर इफ्तिकारच्या टेबलावर पाहिला होता.
‘हो, आहे ना !’ प्रविण उठून उभे रहात म्हणाला आणि त्याने विरार फास्ट लोकलच्या वेगात तो सहा आकडी नंबर धाडधाड सांगून टाकला.
त्यावेळी गिरीशकडून पेन घेऊन आपल्या खिशातल्या चिटोऱ्यावर तो नंबर लिहिताना दाभोळकरसरांची उडालेली धांदल माझ्या चांगलीच लक्षात आहे.
अवांतर वाचनाची आवड हा मात्र आमच्यातील समान दुवा होता.
आम्ही दोघांनीही श्रीकांत सिनकरांची ‘स्मगलर’ ही तद्दन फिल्मी कथानक असलेली कादंबरी घरच्यांच्या चोरुन वाचली होती.
आणि सिनकरांच्या त्यावेळेच्या एकंदर लौकिकास ती साजेशी नव्हती असे आम्हा दोघांचेही प्रामाणिक मत होते.
कदाचित स्मगलिंग हा चलनी विषय असल्याने तापल्या तव्यावर (भाईलोकांनी पिस्तूलाची पुंगळी भाजावी तशी) पोळी भाजण्यासाठी प्रकाशकांनी सिनकरांच्या मागे तगादा लावून ती लिहून घेतली असावी.
त्या कादंबरीपेक्षा त्याची अर्पणपत्रिकाच जास्त वाचनीय होती (जसे रामसेबंधुंच्या तथाकथित हॉरर सिनेमांपेक्षा त्यांचे ट्रेलरच जास्त प्रेक्षणीय असत तसे) असेही आमचे विचारांती ठाम एकमत झाले होते.
“युसूफ, मस्तान, बाखिया
तुमच्या लीला अगाध आहेत”
ही युसूफ पटेल, हाजी मस्तान व सुकूर नारायण बाखिया या नामचीन स्मगलरांना वाहिलेली अर्पणपत्रिका मी व मिलिंदने,शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर समोरासमोर बसून एकटप्पी चेंडूफेक करताना, पाढे म्हणावेत त्या चालीवर एकमेकांना ऐकवली होती.
( सहज आठवले म्हणून…. सिनकरांनी त्यांचे “सैली, तेरा सप्टेंबर” हे पुस्तक ‘शतपावलीच्या हँगओव्हर’ला अर्पण केले होते.
उदाहरणार्थ हे म्हणजे थोरच !)
१९८४ साली स्टर्लिंगला खास लोकाग्रहास्तव लावलेला आल्फ्रेड हिचकॉकचा “The Man Who Knew Too Much”(के सरा…सरा… सरा आठवतंय ना ?) पाहिल्यानंतर मी व्हीटी परिसरात निरुद्देश (म्हणजे नेहमीसारखाच) भटकत असताना ‘जे.जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ च्या पायऱ्यांवर आमची अचानक भेट झाली.
त्याच्या एका हातात त्याची शैक्षणिक अर्हता दर्शविणारा मिनी ड्राफ्टर आणि दुसऱ्या हातात ड्रॉईंग्ज् ची सुरनळी होती.
माझ्या एका हातात ग.वा. बेहेऱ्यांचा ‘सोबत’ आणि दुसऱ्या हातात दबंग देवयानी चौबळचा ‘देवीचा फेरा’ वाचण्यासाठी घेतलेला ‘चंदेरी’ होता.
(See the range.)
‘भारतीय वास्तुशास्त्र ; काल, आज आणि उद्या ‘ या विषयावर तो माझे बौद्धिक घेत असताना तो खरोखरच माझ्यापेक्षा चार पायऱ्या वर उभा होता की तो माझा भास होता हे मात्र आज मला नेमके आठवत नाही. इतक्यात एका तपकिरी डोळ्यांच्या मोहक मुलीने,छबिलदासच्या रंगमंचावर पोकळी भेदून यावे तशी आमच्या प्रवेशात एन्ट्री घेतली.
‘अरे,तू गेली नाहीस ?”…मिलिंदने क्षणार्धात बौद्धिकप्रमुखाचे बेअरिंग सोडले. ‘बघ ना, माझी कर्जत लोकल पाच सेकंदांकरता चुकली.आता एकदम दीड तासांनी पुढची लोकल….आयला वैताग !’
शेवटचे दोन शब्द ती तपकीरसुंदरी काही कारण नसताना माझ्याकडे बघत बोलली.
जणूकाही मीच त्या लोकलला पाच सेकंद आधी हिरवा बावटा दाखविला होता.
(तेव्हापासून मी कर्जत लोकलचे टाईमटेबल मागच्या खिशात घेऊनच फिरतो.
बाय द वे,हल्ली दर त्रेसाळीस मिनिटांनी कर्जत लोकल असते.)
‘मग आता ?’… मिलिंदचा स्वर चितळयांच्या गाईच्या दुधापेक्षाही जास्त पातळ झाला होता.
‘आता तासभर लायब्ररीत बसणार, फुकटची कटकट !'(शेवटचे दोन शब्द परंपरेने माझ्यासाठी.)
…..इतके बोलून ती भवानी लायब्ररीच्या दिशेने निघून गेली.
आमचे बौद्धिक ‘काल आणि आज’पर्यंत आले होते.
परंतु उद्याचे भारतीय वास्तुशास्त्र खुशाल माझ्या भरवशावर सोडून मिलिंद तिला कंपनी देण्यासाठी मला ‘चल मग बाय’ इतके बोलून लायब्ररीकडे चालता झाला.
दहावीच्या मेरीटलिस्टमध्ये चारचार विद्यार्थी झळकविणाऱ्या आमच्या वर्गात मिलिंद काही रुढार्थाने हुशार विद्यार्थी गणला जात नव्हता. पण त्याच्या निग्रही चेहेऱ्यावरचे तेज आणि डोळ्यातील बुद्धीजीवी चमक (त्याच्या चष्म्यातूनही) स्पष्ट दिसत असे. विज्ञानाकडे त्याचा विशेष ओढा होता. शाळेत होणाऱ्या वक्तृत्वस्पर्धेत व वर्गात शनिवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने लिहिलेल्या प्रहसनाचा (ज्याला भाऊ कदमच्या मराठीत “स्किट” म्हणतात) सहभाग अत्यावश्यक असे.
त्याच्या प्रहसनांची जातकुळी ही डॉ.निलेश साबळेच्या उथळ व पांचट विनोदापेक्षा बबन प्रभूंच्या दर्जेदार फार्सीकल लिखाणाशी जास्त जवळचे नाते सांगणारी होती. तो वपु काळ्यांप्रमाणे उत्तम कथाकथनकारही होता. ऑफ पिरियडला त्याच्या गुन्हेगारी वळणाच्या कथांना प्रचंड मागणी असे. त्याने आपली नविन कथा सांगावी किंवा गेल्यावेळच्या कथेचा पुढील भाग सांगावा यासाठी आम्ही मित्रमंडळी लॉबिंग करुन (म्हणजे प्रचंड आरडाओरडा करुन) त्याला कथा सांगायला भाग पाडत असू. वर्गावर एका तासापुरते आलेले नवखे शिक्षक आमच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभाध्यक्षांसारखेच पुरते भांबावून जात. (उगाच नाही आमच्या शाळेने महाराष्ट्राला इतके हरहुन्नरी राजकारणी दिले.) वर्गशिक्षकांच्या टेबलावर डावा हात टेकवून साऱ्या वर्गाला गुंगवून ठेवणाऱ्या ओघवत्या शैलीत तो सांगत असलेल्या कथांमध्ये विलक्षण योगायोगाच्या घटनांचा जरा ओव्हरडोस असे. एका व्यक्तीच्या आयुष्यात इतके योगायोग कसे काय येऊ शकतील यावरुन मग पुढील आठदहा दिवस आम्ही त्याला छळत असू.
२८ फेब्रुवारी १९९१ रोजी न्यूयॉर्क राज्याच्या बफेलो शहरात झालेल्या गाडी अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्या दिवशी योगायोगाने त्याचा अठ्ठावीसावा वाढदिवस होता. माणसाच्या आयुष्यातील योगायोगांचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी, त्याच्या कथांमधे वारंवार डोकावणाऱ्या योगायोगांचे समर्थन करण्यासाठी आणि आम्हा चेष्टेखोर मित्रांची तोंडे कायमची बंद करण्यासाठी त्याने हा बिनतोड भीषण एकलमार्ग स्वीकारला.
आता तो स्वर्गामध्ये, इंद्राच्या दरबारात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात सादर करण्यासाठी, त्याचा आवडता लेखक श्रीकांत सिनकरांच्या साथीने,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एखादे नाटक बसविण्यात गर्क असेल. त्या नाटकात त्याच्या स्वानुभवाच्या योगायोगांची रेलचेल असेल. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याची धडपड बघून भारावलेल्या उत्साही दाभोळकरसरांनी आपणहून या नाटकाचे व्यवस्थापन सांभाळायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली असेल. आणि या नाटकात आपल्याला प्रमुख भूमिका मिळावी यासाठी नरकातून यमाचा वशिला लावून, पृथ्वीवरच्या आपल्या जुन्या खोडीनुसार, युसूफ, मस्तान व बाखिया मिलिंदवर दबाव टाकत असतील.
हादेखील एक विलक्षण योगायोगच.
शायर अहमद नदीम क़ासमी म्हणतो,
कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा
मैं तो दरिया हूँ, समुंदर मे उतर जाऊंगा !
(कोण म्हणतं की मी मरणार आहे ?
अहो मी नदी आहे, समुद्रात उतरेन मी.)
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
३०/०५/२०२१.
Leave a Reply