मित्रांनो, भारत वर्षात अशी दोन महान व्यक्तिमत्त्व होऊन गेली, जी अगदी आजही आपल्या प्रत्येकाला प्रचंड भुरळ घालून राहिलेली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अथांगत्व , त्यांचं अचाट कार्यकर्तृत्व खरंच त्यांचा थांग लागू देत नाही. त्यातलं एक इतिहासकालीन व्यक्तिमत्त्व म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि द्वापारयुगात – परित्राणाय साधुनाम्…….. म्हणत जन्माला आलेलं व्यक्तिमत्त्व, योगेश्वर कृष्ण. आपापल्या युगापासून आगदी आजपर्यंत प्रत्येकाच्या मनावर, हृदयावर आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा ठसा उमटवून राहिलेल्या या दोन्ही युगपुरुषांना आपल्या संतांनी, बखरकारांनी, इतिहासकारांनी, आधुनिक लेखकांनी, नाटककारानी, दिग्दर्शकांनी, अभिनेत्यांनी ,आपापल्या परीने समाजासमोर मांडलं. तरीही या दोन्ही विभूती अगदी आजही या सगळ्यांवर दशांगुळे व्यापून उभ्या आहेत. मला नेहमीच या दोन्ही महापुरुषांनी प्रचंड आकर्षित केलेलं आहे. या दोघांमध्ये काही बाबतीत मला खूप साम्य दिसून येतं. सर्वप्रथम हे दोन्ही महापुरुष निर्भयी, निडर होते. शत्रुची भिती त्यांनी मनात कधीही बाळगली नाही, त्याचबरोबर शत्रूला कमजोर समजण्याची चूकही केली नाही. शत्रूच्या सामर्थ्याचा संपूर्ण अभ्यास करूनच आपले डाव प्रतिडाव, रणनीती निश्चित केली, आणि विजय मिळवला.
ही दोन्ही व्यक्तिमत्त्व आपण चित्रातून पहातो तेव्हा हृदयात एक अद्भुत भाव दाटून येतो. महाराजांचा तो जिरेटोप, कपाळावरचं शिवगंध, प्रसन्न आणि पाहिल्यावर कुणाचीही मान लवावी असं व्यक्तिमत्त्व, असा जाणता राजा, तर कृष्ण मोरमुकुट शिरिधारी, मुखावर विलसणारं स्मित, पितांबर ल्यालेला, सुदर्शनचक्रधारी योगेश्वर.
बघा ना, कृष्णजन्मावेळी धर्म लयाला जात होता, पाप वाढीस लागलं होतं, असुर बलाढ्य झाले होते. शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी सुद्धा यवन मातले होते, पश्चिम महाराष्ट्रात यवन शासक, मराठी रयतेवर प्रचंड अत्याचार करत होते, पिकलेली शेतं, घरातल्या तरण्या लेकी लुटून नेल्या जात होत्या, मराठी मुलखाला कुणी वाली नव्हता. भिती आणि अराजकता माजली होती. अगदी बालपणापासून दोघांवरही संकटं चाल करून आली, ज्यांचा त्यांनी युक्तीने, अक्कलहुशारीने आणि शौर्याने पराभव केला. हे दोन्ही महापुरुष अत्यंत धोरणी होते. शिवाजी महाराजांनी वेळेला युद्धातून यशस्वी माघार घेणं, यामध्ये कधीही कमीपणा मानला नाही, तर तो त्यांच्या रणनीतीचा एक भाग होता. तसच कृष्णाला सुद्धा रणछोड असं नाव पडलं त्यामागे सुध्दा एक कहाणी आहे. कालयवन या महादेवाच्या वरामुळे प्रबळ आणि अमर झालेल्या राजाचा परस्पर निप्पात करण्यासाठी त्याने रण सोडून पळत त्याला मुचकुंद ऋषी झोपलेल्या गुहेत आणलं आणि त्यांच्याकरवी कालयवनचा वध केला.
दोघांनीही आपल्या रयतेच्या गरजांना, सुरक्षेला प्राधान्य दिलं. प्रचंड कष्टाने शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनशासाठी, धर्मरक्षणासाठी अनेक बलाढ्य असुरांचा विनाश करून, कुरुक्षेत्रावर झालेल्या महासंग्रामात पांडवांना विजयी करून श्रीकृष्णाने पुन्हा एकदा धर्माची स्थापना केली. महाराजांच्या शेवटच्या आजारात आपल्या जीवलगांपासून ते एकटे पडले आणि आपली सगळी बिरूदं, ऐश्वर्य, राज्य कशाचाही मोह न धरता शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले. कृष्णानेही कौरव पांडवांच्या युद्धानंतर, यदुकुलाचा संपूर्ण नाश आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि अरण्यात एकांतात निद्रिस्त स्थितीत त्याच्या पाउलाला एका पारध्याने हरिणाचं मुख समजून मारलेल्या बाणाने जखमी होऊन – विधिलिखितानुसार एकांतात आपलं अवतारकार्य संपवलं.
आज मात्र मी, श्रीकृष्ण या व्यक्तिमत्त्वावर, माझ्या परीने लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे.
श्रीकृष्णाच्या जन्मापासून सुरवात करायची म्हटली तर, या जगत्चालकाचा जन्म नियतीने योजला होता कारागृहात. त्याच्या आधीची सात भावंडं अत्यंत क्रूरपणे मारली गेली होती. कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला, तो आजूबाजूला असलेल्या संपूर्ण भीतीदायक वातावरणात. धुंवाधार कोसळणारा पर्जन्य, यमुनेला आलेला महाभयंकर पुर, लोखंडाच्या जड बेड्यामध्ये जखडलेले माता पिता, कारागृहाबाहेर डोळ्यात तेल घालून दिला जात असलेला पहारा आणि वेळ रात्रीच्या बारा वाजताची.
“ज्या वेळी धर्म लयाला जाऊ लागेल, अधर्म प्रबळ होऊ लागेल त्या वेळी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माची मुहूर्तमेढ पुन्हा रोवण्यासाठी, प्रत्येक युगात मी जन्म घेईन”
या स्वतःच्या वचनाला जागत, त्याने द्वापारयुगात जन्म घेतला. परंतु या जगत् नियंत्याच प्राक्तन बघा, जन्म झाल्यानंतर, जन्मदात्रीच्या कुशीची उब घेत निर्घोरपणे स्तनपान करण्याचा आनंदही त्याच्या नशिबी नव्हता, कारण ईश्वरी संकेतानुसार आयुष्याच्या पुढच्या काळात पार पाडायच्या कार्यासाठी, धुवांधार कोसळणाऱ्या पावसात, वसुदेवाच्या डोक्यावर एका टोपलीत निजून, यमुनेला आलेल्या प्रचंड पुरातून त्याला गोकुळ गाठावं लागलं. प्रत्यक्ष परमेश्वरी अंश जन्माला आला होता, परंतु त्या जन्माचा आनंद साजरा होत नव्हता, गोडधोड, पेढे मिठाई वाटली जात नव्हती की आनंदाचा जल्लोष नव्हता. जन्मदात्रीपासून काही वेळातच दूर होऊन कृष्ण गोकुळात, यशोदेच्या कुशीत अलगद विसावला. यामधून काय सांगायचं असेल परमात्म्याला ? तर, आपल्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत घडणारी प्रत्येक घटना, गोष्ट आपल्या संचीतानुसार नियतीने आधीच ठरवलेली असते. जी आपल्यासारख्या सर्वसामान्यांपासून अगदी इश्र्वरापर्यंत प्रत्येकाच्या प्राक्तनानुसार घडत असते.
आपलं जन्मरहस्य कळल्यानंतर हतबुद्ध झालेला कर्ण कृष्णाला विचारतो,
“हे माझ्याबरोबरच का घडावं? यात माझी चूक कोणती ?”
त्याच्या या प्रश्नावर कृष्ण उत्तरतो,
“अरे, माझ्या जन्माचं स्थान कारागृह, जिच्या गर्भातून जन्म घेतला तिच्या मातृसुखाला मुकणं, सतत चाल करून येणारी संकटं, गाई गुरांच्या समवेत बालपण व्यतीत होणं या सगळ्यात माझा दोष काय होता, म्हणून ते माझ्या वाट्याला आलं?”
दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,
दोष ना कुणाचा.
गीतरामायणातील या गीतामधून गदिमांनी मानवी जीवनाचं अगदी यथार्थ वर्णन केलं आहे.
श्रीकृष्णाचं आकर्षण, मला लहानपणापासून वाटू लागलं ते, त्याच्या अद्भुत जीवनावरील गोष्टीच्या पुस्तकांमधून, सचित्र पुस्तकांमधून तसच पौराणिक चित्रपटांमधून. रामायण महाभारतामधल्या गोष्टी वाचल्यावर, नकळत राम आणि कृष्ण या दोघांमधलं वेगळेपण जाणवू लागलं. त्रेतायुगातला राम हा मानवजन्म घेतलेला सरळमार्गी, एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असा होता, तर द्वापारयुगातील कृष्ण हा आपलं इश्र्वरत्व घेऊनच जन्माला आलेला आहे. लहानपणापासून तो लबाड, खोडकर, मस्तीखोर, माखनचोर, गोकुळातील गोप गोपिकांवर, गोधनावर आपल्या प्रेमाची आणि सुरक्षेची सावली धरून रहाणारा आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्याच्यापाशी तोडगा आहे. कृष्णावतारात तो फक्त सरळ मार्गाने वावरत नाही, तर धर्म स्थापनेसाठी, आसुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी, अविवेकावर विवेकाने मात करण्यासाठी, अन्यायावर न्यायाने मात करण्यासाठी आणि मनातला शुद्ध हेतू साध्य करण्यासाठी तो वाट वाकडी करतो, कृष्णनिती चतुरपणे अवलंबतो आणि ज्या मुत्सद्दीपणाने आपले डाव आखतो त्याला तोड नाही. त्याच्या प्रत्येक कृतीमागे सज्जनांचं आणि जगाचं कल्याण हा एकमेव भाव दिसून येतो. कृष्णावतारात तो अगदी स्पष्टपणे आपल्या देवत्वाचा परिचय देतो. कुरुक्षेत्रावर गलितगात्र झालेल्या अर्जुनाला तो म्हणतो,
“कुणी आप्त ना कुणी सखा, या जगती जिवांचा,
क्षणभंगुर ही संसृती आहे, खेळ ईश्वराचा.”
पुढे आपला परिचय देताना तो म्हणतो,
“रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो,
कौरवात मी, पांडवात मी अणुरेणुत भरलो,
मीच घडवितो, मीच मोडीतो, उमज आता परमार्था,
कर्मफलाते अर्पुन मजला, सोड अहंता वृथा.”
गीत संगीतकार मनोहर कवीश्वर आणि गायक सुधीर फडके यांनी या गीतातून कृष्णाला जे सांगायचं आहे ते अगदी नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोहचवलय.
यामध्ये कुठेही भिडस्तपणा, आपलं मोठेपण लपवण्याचा भाग डोकावतही नाही.
आपलं सार्वभौमत्व, चराचरत्व, देवत्वाचा परिचय देताना, युद्ध न करण्याच्या आपल्या निर्णयावर अडून राहिलेल्या अर्जुनालाही अखेर तो म्हणतो,
“पार्था, तू फक्त निमित्तमात्र आहेस, एक माध्यम आहेस – अधर्मीयांचा नाश करण्यासाठी. दुबळेपण सोडून युद्धाला सामोरा जा, कारण ते तुझं कर्तव्य आहे. हे युद्ध होणारच, तू नाहीच तयार झालास तर दुसऱ्या कुणालाही तुझ्या जागी योजून मी ते यशस्वी करीन, कारण दुष्टांचं निर्दालन आणि धर्माची पुनर्स्थापना हे माझं ब्रीद आहे.
गोकुळात आल्यावर, अगदी बालपणापासून त्याच्यावर कंसाने केलेले आघात, येणारी संकटं, त्यांना कृष्णाने तोडीस तोड दिलेलं उत्तर, गोपिकांसमवेत त्याने केलेल्या रासक्रीडा, त्याच्या मुरलीची गोप गोपिंपासून, गायी वासरांपर्यंत साऱ्यांवर पडणारी मोहिनी, पुढे मथुरेत परतून त्याने केलेलं कंस निर्दालन या सगळ्यांपेक्षा, मला भावतं ते त्याचं पांडव प्रेम आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, कायम त्यांच्या, म्हणजेच सत्याच्या पाठीशी राहून, कौरवांना म्हणजेच असत्याला, अनितीला त्याने केलेलं शासन.
पांडवांच्या भेटीपासून महाभारत युद्ध समाप्त होईपर्यंत, कृष्णाने पांडवांना आपल्या अचाट बुद्धिमत्तेने, मुत्सद्दीपणाने आणि कृष्णनीतीने विजयपथावर नेलं, ते पांडवांच्या कृष्णावर असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे. आपल्या मनातील हेतू साध्य करण्यासाठी त्याने कधीही खोटेपणा, आक्रस्ताळेपणा केला नाही. प्रतीपक्षाला पर्याय दिले, खोट्या अहंकाराला चिकटून राहिल्यामुळे काय होऊ शकतं याची स्पष्ट शब्दात जाणीवही दिली. कर्तव्यावर आंधळं प्रेम वरचढ झालं, स्त्रीची विटंबना झाली, पापाने पुण्यावर कुरघोडी केली की महाभारत घडतं, हे त्याने त्रेतायुगात आणि द्वापारयुगात सिद्ध केलं.
कौरवांकडेही शकुनीसारखा धोरणी, मुत्सद्दी होता, परंतु त्याच्या या गुणांना स्वार्थाचं, कुपमंडूक नीच वृत्तीचं आणि असत्याचं दाट कोंदण होतं. त्यामुळे शकुनीनिती कधीच कायमस्वरूपी यशस्वी झाली नाही. याउलट कृष्ण निती ही नेहमीच सर्वसमावेशक, निस्वार्थी, सत्य आणि धर्म स्थापनेसाठी होती. पांडवांवर आलेल्या प्रत्येक संकटाला नेस्तनाबूत करताना, कृष्णाने जी योजना आखली, ती शंभर टक्के यशस्वी होणार, याची त्याला पूर्णपणे खात्री होती. तरीही त्याने प्रतिपक्षाला प्रत्येकवेळी संधी दिली. ती संधी ते स्वीकारणार नाहीत, याचीही त्याला पूर्ण खात्री होती. कृष्णशिष्टाईसाठी जेव्हा तो पांडवांचा दुत म्हणून इंद्रप्रस्थ नगरीत आला, तेव्हाही ही शिष्टाई असफल होणार, याची त्याला खात्री होती, तरीही युद्ध टाळण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न त्याने केला. पण कृष्णाने दिलेले पर्याय स्वीकारणाऱ्यानी आपल्या मन आणि कानांवर दंभाचे, अहंकाराचे आणि अनितीचे दाट पडदे लावून घेतलेले होते.
कृष्णाचा संपूर्ण जीवनप्रवास पहाताना, या प्रवासात त्याने आखलेले डाव प्रतिडाव, त्याची दूरदृष्टी, कोणताही प्रसंग निवारणारी अचूक कृष्णनिती, गोकुळापासून महाभारतीय युद्धापर्यंत, प्रत्येक ठिकाणी नेमक्या वेळी असणारा त्याचा वावर, आपल्या अंगावर रोमांच उभे करतात.
आपले नव्याण्णव पुत्र युद्धात मारले गेल्याने निराश, दुःखी आणि उद्विग्न झालेली गांधारी, महादेवाकडे वर मागते, की माझा पुत्र दुर्योधनाला काहीही होता उपयोगी नाही. त्याला मरण येणार नाही असा मला वर द्या. भोलेनाथ प्रसन्न होऊन शिवभक्तिनी पतिव्रता गांधारीला वर देतात,
“स्वतःहून अंधत्व स्वीकारलेल्या तुझ्या तेजस्वी डोळ्यांनी तू दुर्योधनाकडे पाहिलस तर त्याचं शरीर वज्रासारखं होऊन जाईल, आणि त्याच्या शरीरावर कोणत्याही अस्त्र शस्त्राचा परिणाम होणार नाही.”
या वरामुळे आनंदित झालेली गांधारी परतल्यावर, कृष्ण विचारतो,
“महादेव, हे आपण काय केलंत ? दुर्योधनाचा मृत्यू होणं अत्यंत आवश्यक आहे.”
महादेव उत्तरतात,
“कृष्णा, माझ्या भक्तांना अशी वरदान देऊन, मी तुझं कार्य कठीण करतो हे खरं आहे, परंतु यातूनही तू मार्ग काढशील याची मला खात्री आहे.”
महाभारतीय युद्ध संपल्यानंतर, आपल्याला मिळालेल्या वरदानाचाही काही उपयोग न झाल्यामुळे हताश, दुःखी आणि क्रुद्ध झालेल्या गांधारीने कृष्णाला, यादव कुळाचा असाच सर्वनाश होईल असा शाप दिला, आणि आपली चूक जाणवल्यावर तिने कृष्णाला कळवळून विचारलं,
“कृष्णा, हे युद्ध थांबवणं तुलाच शक्य होतं. मग तू हे का केलं नाहीस ?”
यावर कृष्ण उत्तरतो,
“मग दुष्टांना, अधर्मीना, पापी जनाना शासन कसं झालं असतं ? माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण कशा झाल्या असत्या ? उच्चारलेले शाप पूर्णत्वाला कसे गेले असते ? धर्माची पुनर्स्थापना कशी झाली असती ? हे विधिलिखित होतं, जे टाळणं अशक्य होतं.”
“तू यादवकुलाला दिलेला शाप, हे सुद्धा विधिलिखितच, केवळ तुझ्या मुखातून शापवाणीने उच्चारलं गेलं.”
कृष्णाचं अस्तित्व भगवद्गीतेवर लिहिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
कुरुक्षेत्रावर, समोर आपलेच आप्त पाहून हतविर्य झालेल्या अर्जुनाच्या माध्यमातून श्रीकृष्णाने संपूर्ण विश्वाला भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता म्हणजे फक्त तत्वज्ञान नाही, तर जीवनातील प्रत्येक गोष्टीचा त्यामध्ये उहापोह केलेला आढळतो. आपलं विहित कर्तव्य प्रामाणिकपणे करताना, त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा ठेवू नये, हा मोलाचा मंत्र गीतेतून कृष्णाने सांगितला, कारण आपला अधिकार फक्त कर्मावर असतो, न की त्यापासून मिळणाऱ्या फलावर. आपापल्या कर्मसंचीतानुसार, आपलं प्रारब्ध आपलं जीवन घडवत असतं. आपला प्रिय सखा अर्जुनाला हे विस्तारुन सांगताना आत्म्याचं अमरत्व, कर्मयोग, स्थितप्रज्ञ दर्शन, कर्माची अपरिहार्यता, लोकसंग्रह, अकर्म (आसक्ती सोडून केलेलं कर्म) ज्ञानाची महती, ध्यानयोग, ज्ञानविज्ञान, भक्तिमार्ग, विभूतीकथन अशा अनेक विषयांतून अर्जुनाची झालेली दोलायमान स्थिती पूर्वपदावर येत असताना, अखेर अर्जुनाला ब्रम्हांडाच्या अणूअणूला व्यापून राहिलेलं श्रीकृष्णाचं विराट विश्वरूप पहाण्याची इच्छा झाली, आणि शिष्यावरच्या प्रेमाने, कृष्णाने ती लगेच पूर्णही केली. हजारो सूर्य एकाचवेळी प्रकट व्हावे, असं तेज असलेल्या श्रीकृष्णाचं, देवदुर्लभ असं विराट विश्वरूप पाहून अर्जुन भयभीत झाला. ते पाहून पुढच्याच क्षणी कृष्णाने आपल्या वास्तविक रुपात प्रवेश केला. विश्वरूपदर्शनयोग या विषयावर मध्यंतरी विदुषी धनश्री लेले यांचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला, त्यांच्या अप्रतिम शब्दकळेतून तो संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा
राहिला. या सगळ्यात मला कौतुक वाटतं ते संजय या व्यक्तीचं. त्याचं भाग्य किती थोर, प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टिमुळे हे सगळं त्याला पहाता आलं.
कृष्णाचं संपूर्ण जीवनच रोमांचित करणारं आहे.
ज्ञानेश्वर माऊलीनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली ही गीता ओवीबद्ध रुपात सर्वसामान्य जनांसाठी, भावार्थदीपिका या ग्रंथामधून जगासमोर आणली. महाभारत युद्ध घडलं तो काळ साडेसात हजार वर्षांपूर्वीचा, आणि ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा काळ सन १२९०.
अगदी आजही भगवद्गितेच्या संशोधकांना, अभ्यासकांना त्यामधून नवनवीन गोष्टी गवसत असतात. लो.टिळकांनी भगवद्गितेवर गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला, आणि श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मयोग जगासमोर विस्तृत स्वरूपात आणला.
फार पूर्वी मध्य प्रदेशातील इंदोर इथले थोर संत नानामहाराज तराणेकर यांनी लिहिलेला स्वानुभव एका अंकात वाचला होता. ते हिमालयात भ्रमण करत असताना, त्यांना अचानक कुमार वयातील कृष्णदर्शन झालं होतं. “ठाडे रहियो पंडितजी” असं व्रज भाषेत तो त्यांच्याशी बोलला. हा अनुभव वाचूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते, जे आजही लिहिताना तसेच उभे राहिलेयत.
माझा एक मित्र आहे, अध्यात्मिक विषयाचं त्याचं वाचन भरपूर आहे. आमच्या विविध विषयांवर चर्चा, गप्पा होत असतात. तो अगदी मनापासून अनेकदा मला म्हणतो,
“प्रसाद, आयुष्यात एकच इच्छा आहे, श्रीकृष्ण दर्शन व्हावं.” हे बोलतानाही तो त्याच्या घरातील श्रीकृष्णाच्या तसबिरीखाली बसलेला असतो.
त्याच्या या हृदयातून येणाऱ्या इच्छेला “तथास्तु” म्हणत, हा श्रीकृष्णावर लिहिण्याचा केलेला प्रयत्न इथे थांबवतो.
श्रीकृष्णार्पणमस्तु
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply