आज आपल्याला काही खरेदी करायचे असेल तर आपण ऑनलाइन मागवतो. मागवताना हे नक्की बघतो की वस्तु चांगली आणि स्वस्त आहे ना? कधी कधी स्वस्त असण्यावर जोर असतो तर कधी वस्तूची क्वालिटी बघतो. मनात मात्र नेहमी हाच एक विचार असतो की योग्य वस्तु आपल्याला मिळावी. फक्त वस्तु नाही पण आयुष्यात योग्य व्यक्ति मिळणे फार महत्वाचे. मग तो लाइफपार्टनर, डॉक्टर, वकील, मित्र, घरमालक असो की घरात काम करायला येणारी बाई असो. काही अगदी वेळेवर भेटतात, काही गोष्टी जुळून येतात तेव्हा आपल्या मुखातून सहज निघून जाते की योग्य वेळी योग्य व्यक्ति भेटली. किंवा आपण म्हणतो की नशीब चांगले म्हणून ही व्यक्ति मला भेटली. म्हणजे योग्य वेळ येणे किती आवश्यक आहे.
‘योग्य’ या शब्दा पाठीमागचा भाव असा की जी व्यक्ति आपल्या स्वभावाशी, परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेणारी, आपल्याला हवं तसं वागणारी, करणारी व्यक्ति. जर आपल्या चौकटीत ती व्यक्ति बसत नसेल तर ती आपल्यासाठी अयोग्य ठरते. मात्र याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ति खरंच अयोग्य आहे. आयुष्यात काहीं बरोबर असं ही होत की पहिले लग्न यशस्वी ठरत नाही पण दुसरे लग्न कायम टिकणारे ठरते. म्हणजेच ही जी जुळवा जुळव करताना काहीं बरोबर कठीण होऊन जाते पण तेच काहीं बरोबर सहज होते. ती वेळ, ती व्यक्ति सर्व काही जुळून आले की आपण म्हणतो की योग्य वेळी भेट झाली.
योग्य आणि योग्यता या दोन्हीची समज असणे आवश्यक आहे. जसे एखादा दागिना बनवताना कोणता हिरा कुठे लावावा याची समज कारागीरला असेल तर तो छोट्या मोठ्या सर्व हीऱ्यांचा वापर आपल्या दागिन्यात करून घेतो. तसेच एका कंपनीचा मालक आपल्या कंपनीत एखाद्या पदासाठी कोणाची निवड करताना त्याची योग्यता तपासतो. त्यानुसार त्याला काम देतो. हे करताना जर निवड चुकली तर कंपनीच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. आपल्या खाजगी आयुष्याचे ही तसेच आहे. कोणत्या व्यक्तीला किती व कोणते स्थान दयावे याची निवड जर योग्य केली तर आपले जीवन ही सुखी आनंदी राहते. नाहीतर सतत वाद होत राहतात. निवड चुकली की जगणे नकोसे होऊन जाते. एखादे क्षेत्र निवडताना व्यक्तीला आपली योग्यता तपासून निर्णय घ्यायला हवा. नाहीतर वेळ, पैसा, शक्ति सर्वांचे नुकसान होते.
नौकरी, करियर, व्यक्ति .. .. या गोष्टी बदलताना खूप त्रास होतो म्हणून निवड करतानाच थोडा वेळ घ्यावा. भावनेच्या आहारी न जाता, बुद्धीचा वापर करून योग्य काय हे शोधावे. भावना व विवेक यांचे संतुलन ठेवल्याने आपण योग्य निवड करू शकू. जसे तराजुच्या दोन्ही परडयामध्ये समान वजन असायला हवे तसेच कार्य करताना भावना आणि विवेक यांचे संतुलन हवे. कधीकधी परिस्थिती नाजुक असली की भावनेची बाजू जास्त झुकलेली असते किंवा कोणा दुसऱ्याच्या जीवनाचा निर्णय घेताना आपण अतिविवेकी होऊन जातो त्यामुळे आपले कार्य चुकीचे ठरते. योग्य कार्य करण्यासाठी परिस्थितिची समज असणे आवश्यक असते. बुद्धी शांत व स्थिर असणे गरजेचे असते. वर्तमानपत्रात अनेक घटना येतात ज्या आपल्याला सांगतात की मनुष्याकडून कशा चुका होतात. एखाद्या फ्लॅटचे काम करताना जर कोणी पिल्लरच तोडून टाकला तर काय होईल हे आपण समजू शकतो. कारागीरला आपल्या कामाचे योग्य ज्ञान असेल तर कार्य पुर्ण होते. आणि जर नसेल तर आपले व दुसऱ्यांचे नुकसान होते.
जीवनात सफल होण्यासाठी इच्छाशक्तीची नितांत गरज असते पण ती इच्छाशक्ती चुकीच्या दिशेने जात असेल तर.. .. काही जण योग्य गोष्टीची निवड करून ते प्राप्त करण्यासाठी अतोनात कष्ट घेतात. आणि यशस्वी सुद्धा होतात. पण काही जण आपली क्षमता न जाणता ध्येय ठेवतात त्यांना मात्र अयशस्वी होण्याचा अनुभव घ्यावा लागतो. एखाद्या व्यक्तिवर प्रेम केले पण त्याचे विचार, संस्कार वेगळे असतील तर जुळवून घेताना कठीण जातं. म्हणून कोणतीही गोष्ट करताना, निवड करताना योग्य आणि योग्यता या दोन्ही शब्दाचे गांभीर्य समजून कार्य करावे, तेव्हा जीवनात प्रत्येक कार्यात सफल होऊ .
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply