दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी….१
शून्यामधले कितीकजण ते, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती….२
आज हवे ते त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द एक तो, निर्माण करील सहनशक्ति….३
क्षीण होता तव दृष्टी, दिसेल कां तयाची धडपड
श्रवणदोष तो येण्यापूर्वी, ऐकून घे तू दु:खी ओरड…४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण तयांचा, जगण्यामधला खडतर हेतू…५
जेव्हां असशील विंवचनात तू, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय ते, जाणून घेण्या सवड कुणा ती…६
डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply