अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही हकीकत आहे. पार्लमेंट सुरु झाले. नव्या अध्यक्षांचे स्वागत करण्यासाठी सदस्यांनी स्वागतपर भाषणे करायला सुरुवात केली.
अमेरीकेत प्रथमच एका काळ्या माणसाची नियुक्ती अध्यक्षपदी झाल्यामुळे इतरांच्या मनात असूया होतीच. लिंकनचे कौतुक करण्याऐवजी अनेक सदस्य एका पाठोपाठ उपहासपूर्ण भाषणे करु लागले.
सगळ्यांच्या भाषणाचा सूर एकच होता. अब्राहम लिंकनचे वडील मोची होते. ते समाजातील अनेक श्रीमंत व प्रतिष्ठीत लोकांसाठी जोडे बनवायचे. हाच धागा पकडून सदस्यांनी लिंकनच्या कुळावर बोट ठेवले.
“अध्यक्षांच्या पार्श्वभूमिबद्दल काय बोलावे! यांच्या वडीलांनी आपल्यातल्या अनेक कुटुंबांसाठी जोडे बनविले आहेत. आपल्या पूर्वजांनी तसेच आपणही त्या जोड्यांचा आनंद घेतला आहे. असे आपले अध्यक्ष महोदय आपल्याला लाभले हे आपले भाग्यच म्हणायचे. ”
एका मागून एक सदस्यांनी लिंकनला डिवचायला सुरुवात केली. त्यांना वाटले आपले बोलणे ऐकून लिंकन महाशय शरमिंदे होतील. पहिल्याच सत्रात आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली बरी असे वाटून सदस्यांनी अपमान करण्याचा सिलसिला जारी ठेवला.
स्वागतपर भाषणे संपली. अब्राहम लिंकन उत्तर द्यायला उभे राहिले.
त्यांच्या चेहऱ्यावरची शांती आजिबात ढळली नव्हती. आत्मविश्वासही कायम होता. स्वतःच्या मुळाचे शल्य त्यांच्या ठायी नव्हते. ते बोलू लागले. “सन्माननीय सदस्यांनी माझा अभिनंदनाचा ठराव मांडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अनेक सदस्यांनी माझी पार्श्वभूमी सर्वांसमोर मांडली. विशेषतः माझ्या वडीलांच्या व्यवसायाविषयी या सभागृहात तपशीलवार चर्चा झाली.
माझे वडील निःसंदेह एक उत्कृष्ट चांभार होते. त्यांनी आपल्यासारख्या अनेक कुटुंबांसाठी अनेक वर्षे जोडे बनविले. याचा उल्लेख आत्ताच माझ्या आदरणीय सदस्यांनी अनेकवार केला.
माझ्या वडीलांनी बनविलेले जोडे आपण सर्वांनी व आपल्या कुटुंबीयांनी वापरले आहेत. यावरुन हे ही सिध्द होते की माझे वडील एक तज्ञ मोची होते. त्यांनी बनविलेल्या जोड्यांचा दर्जा उच्च प्रतीचा होता यात शंकाच नाही. म्हणून तर वर्षानुवर्षे आपण व आपले कुटुंबिय माझ्या वडीलांनी बनविलेले जोडे वापरत आहात. हे तर सर्वच सन्माननीय सदस्यांना मान्य करावे लागेल.
इथे प्रश्न व्यवसायाचा नसून उत्कृष्टतेचा आहे असे मला म्हणावेसे वाटते. अमेरीकेसारख्या लोकशाहीमध्ये एका मोच्याचा मुलगा अध्यक्ष बन् शकतो हे देखिल भूषणावह आहे. राहता राहिला प्रश्न माझ्या वडीलांच्या व्यवसायाचा. मला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. त्यांच्या जोड़े बनविण्याच्या कौशल्याबद्दलही मला त्यांचा अभिमान आहे.
सन्मानीय सदस्यांना मी अजून एक माहिती देऊ इच्छितो. भी ही उत्तम जोडे बनवितो. आपल्यापैकी कोणाला गरज पडली तर मी ही त्यांच्यासाठी माझ्या वडीलांइतके उत्तम जोडे बनवू शकतो, आपल्याला देऊ शकतो. तशी गरज कोणाला पडल्यास त्यांनी मला अवश्य कळवावे. कुठल्याही क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास असलेला माणूसच टिकून राहतो हे सर्व विदीत आहे.
अब्राहम लिंकनचे उत्तर ऐकून शरमिंदे व्हायची वेळ आता सदस्यांवर आली होती. सर्वांचे चेहरे गोरेमोरे झाले होते.
या गोष्टीवरुन एकच प्रेरणा घ्यायला हवी. आपण कुठल्या क्षेत्रात काम करतो यामुळे आपली पत ठरत नाही. आपली योग्यता आपल्या कामामुळे आणि कामातल्या उत्कृष्टतेमुळे सिध्द होते. आजही अमेरीकेत लिंकन मिळतात. ते नाव अजूनही टिकून आहे हे विशेष.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply