बारीवीच्या परिक्षेत पास झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन आणि ज्यांना यात पाहिजेतसे यश मिळवता आले नाही किंवा यशस्वी होता आले नाही त्यांनी निराश किंवा दुःखी होण्याचे कारण नाही. काही दिवसांत दहावीचा निकाल लागणार आहे. काहींना चांगले मार्कस् तर काही काठावर तर काहीना अपयश. ही काही जीवनातील अंतिम परिक्षा नाही.
काही विद्यार्थीमित्र या अनपेक्षीत निकालाने कधी कधी टोकाची भुमिका घेताना दिसतात. यासाठी तरूण मुलांचा आत्मविशास कसा वाढीस लावावा. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. पालकांचे व पाल्याचे संबंध कसे असावेत याचे सविस्तर विवेचन मला लेखक श्री विजय गुप्ते यांच्या ‘तरूण मुलांचा आत्मविकास’ (श्री अक्षर ग्रंथ प्रकाशन बोरिवली, मुल्य रू.७०/-) या पुस्तकात वाचायला मिळाले.
श्री विजय गुप्ते यांचे हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका एवढी स्पष्ट व विषयाला सुसंगत आहे की ते पुस्तकाच्या शिर्षकावरूनच कळते. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील व्यासंग व दांडगा अनुभव पुस्तकातील उदाहरणांवरून वेळोवेळी जाणवतो. श्री विजय गुप्ते यांना आध्यात्माची आवड निवृत्त झाल्यावर लागली असे जरी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील भुमिकेमध्ये मांडले असले तरी याची बिजे कुठेतरी त्यांच्या मागील जन्मात पेरली असावीत. आपल्यावरील गुरूजनांचे व आप्तांचे संस्कार आपल्याला त्या वेगळया वाटेकडे वळवितात यात काही शंकाच नाही. कारण श्री विजय गुप्तेंना आध्यात्मिक तत्व पूर्णपणे मान्य आहे व तसे ते रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचे प्रयास करताना दिसतात हे मी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात असल्याने जाणवत. असो.
आजच्या कलियुगात कोण देवावर व आध्यात्मावर विश्वास ठेवतो? आपण आपले व मी यापलीकडे कोणाला काही दिसत नाही. सेवा व भक्ति केल्याने वर्तमान व भविषात येणार्या संकटाशी सामना करण्याचे बळ मिळते हे कदाचीत आजच्या तरूण व फॅशनेबल मुलामुलींना माहित असूनही त्यांच्या कृतीतून उतरताना दिसत नाही ही खंत त्यांच्या मनात असेल असे वाटते. आणि याचे योग्य उत्तर या पुस्तकातून प्रत्येक मुलामुलीला व पालकांना मिळाले असेल असा माझा समज आहे. श्री विजय गुप्ते यांचा विज्ञानावर गाढ विश्वास आहे आणि त्यांना दैववाद नामंजूर असून प्रयत्नवादावर नितांत विश्वास आहे तसेच इश्वरशक्तीवर देखील श्रद्धा व विश्वास आहे. याचाच कुठेतरी सर्व पुस्तकातील विषयातून विद्यार्थ्यांशी व पालकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयास आहे व तो त्यांच्या कृतितून उतरावा अशी प्रामाणीक तळमळ आहे. आजच्या तरूणांना आणि त्यांच्या पालकांना काही तरी मनापासून हितावह व महत्वाचे सांगावेसे वाटले म्हणून पोटतिडकीने प्रेम व आनंदाने हे पुस्तक त्यांच्याकडून त्या परम पित्याने लिहून घेतले असे म्हणावे लागेल.
पुस्तकाच्या शिर्षकाची कुठेही आवास्तवता दिसत नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे मांडले आहे. कुठेही भडकपणा रंजकता नाही. कदाचीत त्यांच्या बालपणीचे संस्कार त्यांना स्वस्त बसून देत नव्हते व ती तळमळ व उमेद या वयात अजून तशीच ताजीतवानी असल्याचे पुस्तकांतील १७ प्रकरणांतून दिसून येते.
प्रत्येक तरूण मुला-मुलीत मन व बुद्धीच्या विचारांचे कंगोरे बदलण्याची वृत्ती असेल व पालकांना तरूण मुला-मुलीत मनापासून विकास घडवून आणायचा असेल तर हे पुस्तक आधी पालकांनी वाचावे मनन चिंतन करावे. तरूण मुलांमुलींनी पालकांशी चर्चेव्दारे पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न करावा आणि नंतर ते कृतित कसे आणता येतील यासाठी प्रयास करावा. तरी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेच्या निकालासाठी प्रेमाचे ऑलवेज द बेस्ट !
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply