नवीन लेखन...

युद्धस्य कथा रम्या

दीपावलीच्या आनंदात थोडी आठवण त्यांचीही
दूरस्था: पर्वता: रम्या: वेश्या: च मुखमण्डने.
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरत:
(अर्थात उंच आणि दुर्गम पर्वत तसंच स्वतःच्या चेहऱ्याला सौंदर्य प्रसाधनांनी रंगवाणारी गणिका हे जसे दुरूनच रम्य आणि सुंदर भासतात, त्याचप्रमाणे युद्ध कथा या ऐकण्यासाठीच चांगल्या वाटतात. या तीनही गोष्टीं जितक्या लांब राहतील तेव्हढं चांगलं.)
युद्धकथा या ऐकायला फारच रम्य म्हणजे, ज्या कथांमध्ये आपण तन मनाने रमून जातो अशा असतात खऱ्या पण त्या ही लांबूनच. कारण प्रत्यक्ष युद्ध आणि त्या घडलेल्या युद्धाची कथा यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
“वेडात मराठे वीर दौडले सातं” या गीतात एक ओळ आहे,
“खालून आग वर आग आग बाजूनी” जी युद्धभूमीचं तंतोतंत वर्णन सांगते.
हल्ली ना आपली आदराची स्थानं फारच उथळ झालीयत. अशी व्यक्तीस्थांनं आता उरलेलीही नाहीत किंवा आपण म्हणूया एका हाताच्या बोटावर मोजाण्याएव्हढी उरलेली आहेत. आपला आयडॉल कोण असावं किंवा कोणाला आपलं आयडॉल मानावं याची मानांकनंच बदलून गेलीयत. चित्रपट क्षेत्रात हिरो ही बेगडी संकल्पना घेऊन सर्कसउड्या मारत पन्नास पन्नास गुंडाना चोपणारा, ते ही स्वतः नाही तर डुप्लिकेट च्या मदतीने,जराही आपला जीव धोक्यात न टाकता स्टाईल मारत प्रेम करणारा आणि या सगळ्यासाठी करोडो रुपये कामावणाऱ्या चित्रपटाच्या नायकाला आम्ही आपल्या आयुष्याच्या हिरोच्या सिंहासंनावर बसवून मोकळे होतो, त्याच्या एका दृष्टिक्षेपासाठी झुरतो, त्याचे फोटो घरात लावतो, त्याच्या इतर सगळ्या वाईट कृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, फक्त त्याच्या सौंदर्याला, शरीरसृऊष्ठवाला भुलतो. स्वतःच्या वागणूकीकडे न पाहता आपल्याला सन्मार्गाचे धडे देणाऱ्या या so called हिरोना आम्ही देवत्व अर्पण करायलाही तयार असतो. परंतु त्याचवेळी देशाच्या सीमेवर अक्षरशः छातीचा कोट करून लढणाऱ्या real heroes ना आम्ही विचारातही घेत नाही.
मी काही वर्षांपूर्वी एक कथा वाचली होती. त्यामध्ये त्या शहरात दहशत असणाऱ्या एका गुंडाला, एक लष्करी अधिकारी सर्वांसमक्ष दोन कानाखाली लागावून म्हणतो, “तुझ्या अंगात जी काही रग आहे ती सीमेवर दाखव. हिम्मत असेल तर चल, मी तुला लष्करात दाखल करतो. त्याला शिक्षण देऊन लष्करात सामील केलं जातं. काही काळानंतर झालेल्या युद्धात तो शाहिद होतो, म्हणून त्याची पोस्टर्स त्या शहरात लागतात. तो लष्करी अधिकारी पुन्हा त्या शहरात येतो तेव्हा त्याला ही पोस्टर्स दिसतात. तेव्हा त्याच शहरात राहणाऱ्या आपल्या मित्राला तो सत्य परिस्थिती सांगतो, की हा माजी गुंड ऐन युद्धाच्या धुमश्चक्रित कच खाऊन युद्धाभूमीवरून पळाला. आणि तो पळाला याहीपेक्षा त्याच्या पळपुटेपणामुळे आणखी तीन जवान मनोधैर्य खचून त्याच्यामागून पळाले आणि शत्रूच्या गोळ्यांनी मारले गेले. हा हुतात्मा नाही तर त्याचं कोर्ट मार्शल केलं गेलं.
ही कथा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की निरपराध, सर्वसामान्य आणि निशस्त्र लोकांवर दादागिरी करणं फारच सोपं आहे. परंतु भर युद्धात, सतत आग ओकाणाऱ्या आणि समसमान शस्त्रानी युक्त असलेल्या शत्रूसमोर आपलं मनोधैर्य जराही खचू न देता, आपला वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक फायदा काहीही नसताना फक्त देशासाठी, मातृभूमीसाठी जीव पणाला लावून लढणं, शाहिद होणं हे फार फार कठीण आहे.
आज प्रत्येक देश म्हणत असतो की युद्ध हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतातच आणि देश अनेक वर्षांनी मागे जातो. देशाची बसवलेली आर्थिक घडी विस्कटून जाते. तरीसुद्धा हे जाणणारा, बोलणारा प्रत्येक देश नवनवीन शास्त्रसामग्रीचा शोध लावतच असतो. अणुबॉम्ब सारख्या संपूर्ण मानवजात नमशेष करणाऱ्या शस्त्राना दुसऱ्या देशांवर दबाव ठेवण्यासाठी आपल्या संग्रही बाळगतच असतो. आपल्या सीमेवर चोवीस तास जागता पहारा करणारे हे नुकतीच मिसरूड फुटलेले तरुण आपलं कर्तव्य बाजावत असताना अचानक विरगतीला प्राप्त होतात. नुसती कल्पना करा, काय आभाळ कोसळत असेल त्यांच्या कुटुंबावर. नुकताच वयात आलेला, लग्न ठरवून सीमेवर गेलेला आणि आपल्या भावी जीवनाची स्वप्न पाहणारा किंवा अगदी नुकतच लग्न होऊन आपल्या कर्तव्यावर रुजू झालेला अकस्मात धारातीर्थी पडतो. त्याचं शव मानाने त्याच्या गावात आणलं जातं. संपूर्ण सन्मानाने त्याची अंत्ययात्रा पार पडते. सगळं पुन्हा पहिल्यासारखं सुरु होतं. आणि इतकं होऊनही त्या कुटुंबातला धाकटा लेक म्हणतो, मलाही लष्करात जायचंय. मी सुद्धा माझ्या मातृभूमीचं रक्षण करून माझं कर्तव्य पार पाडणार. कोण असतात ही माणसं? अहो ! तुमच्या आमच्यासारखीच सर्वसामान्य. मग कुठून उभरतं त्यांच्या मनात हे देशप्रेम? त्यांच्या मनात का नाही येत की शिक्षण झाल्यावर एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर नोकरी करून भरपूर पैसा कमवावा, आणि लग्न करून बायको मुलांसह आपल्यापुरतं ऐष आरामात जगावं? असं जर प्रत्येक तरुण म्हणू लागला तर या मातृभूमीला कोण सांभाळणार? अर्थात तसं घडत नाही म्हणा, कारण दरवर्षी अनेक तरुण मुलं भारतीय लष्करात सामील होण्यासाठी मन बांधून तयार होत असतात. हिमाचल प्रदेश, सियाचेन सारख्या रक्त गोठावणाऱ्या सीमेवरच्या थंड भागात आपल्या देशासाठी हे शस्त्रसज्ज जवान दिवस रात्र उभे आहेत म्हणून तर आपण निर्भयपणे सुखाचा घास आपल्या शहरात बसून खाऊ शकतोय. तो घास घेताना एकदातरी त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवणं अपेक्षित आहे. आपण आपल्या चैन, मज्जा, मस्ती यामध्ये इतके मशगुल झालेले आहोत की आपल्याला हे सगळं कधी जाणवतही नाही. मला अगदी मनापासून वाटतं की प्रत्येकाला शाळेपासून लष्कराचं पायाभूत शिक्षण आणि पुढील आयुष्यात कधीही प्रगत शिक्षण अपरिहार्य करायलाच हवं. बाकी काही नाही तरी देशातील तरुण पिढीला शिस्त लागेल आणि लष्कराचं महत्व लक्षात येईल.
आपल्या गांवातल्या, आपल्या शहरांतल्या लष्करी जवानाला, देशाचं रक्षण करत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांला आपण मान द्यायलाच हवा. त्यांच्यासाठी आपल्याकडून जे काही करणं शक्य आहे ते करून आपल्या कर्तव्याचा वाटा आपण उचलायला हवा. मी एका व्हिडिओ क्लिप पहिली होती ज्यामध्ये एका देशाच्या सैन्याची एक तुकडी विमानातून उतरून विमानतळाच्या बाहेर पडत असतें. त्यावेळी त्या विमानतळावर असलेली प्रत्येक व्यक्ती उभं राहून टाळ्या वाजवत त्यांना मानवंदना देते. किती अभिमान वाटावा असं चित्र आहे हे.
मघाशी मी म्हटलं तसं प्रत्येकाने अगदी लष्करात दाखल झालं नाही तरी, त्यांच्या सेवेची जाण ठेवली तरी पुरेसं आहे. कारण किसान आणि जवान हे चांगल्या, वाईट, खूप वाईट आणि अत्यंत बिकट परिस्थितीत धैर्याने उभे आहेत, केवळ आणि केवळ म्हणूनच आपण भरल्या पोटी सुरक्षित जीवन जगत आहोत. युद्धस्य कथा रम्य : ज्या ऐकून तेव्हढ्यापुरतं भावुक होण्यापेक्षा, मनात कर्तव्यभावना ठेवून आपण काही करू गेलो, तर मला वाटतं ते जास्त योग्य ठरेल.
आज अगदी शालेय जीवनापासून महागडा फोन, महागडी घड्याळं, कपडे आणि चंगळवाद, मॉल, चित्रपट, हॉटेल यामध्ये बुडून जाणाऱ्या शहरी पिढीच्या आपण पालकांनी या सगळ्याबरोबर वर उल्लेखलेल्या कर्तव्यभावनेची जाण त्यांना करून देणं अत्यंत गरजेचं आहे, इतकंच मनापासून वाटतं.
दीपावलीच्या या आनंदात एक कडक स्याल्युट आपल्या संपूर्ण सेनादलाला.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..