दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.
माजघरा मागच्या दरवाजातून बाहेर पडल्यावर पडवी वजा जागा होती, लहानपणी येथे सकाळी चुलीवर एक हंडा नेहमी पाणी गरम करत असायचा. बऱ्याच दिवसात वापरली नसलेली चूल ताईने परत एकदा पेटवली आणि बाजूच्या हौदातले पाणी एका हंड्यात भरून चुलीतला विस्तव वाढवला. जसजशी लाकडं चुरचुर… आवाज करत पेट घेत होती तसतसा पाण्याला उकळी येण्याचा वेग वाढत होता आणि हंड्या मागून धूर सुद्धा येऊ लागला. त्या थंडीत तो विस्तव आणि तो धूर मोठ्या आधाराचा वाटत होता. धूर जसजसा त्या गारठ्यात मिसळत होता तशी आठवणींची ऊब त्या घरात परत शीर होती.
रवींद्र पहाटेच उठून वाडीत गेला होता. कालचा दिवस आईचं सगळं करण्यात आणि नंतर विचारांच्या बाजारात कधी संपला हे रवी आणि ताई दोघांनाही समजले नव्हते. रात्री स्वयंपाक घरात घडलेला प्रकार दोघांनाही वेगळ्या प्रकारे हादरवून गेला होता.
रवींद्र थोड्या वेळात वाडीतून परत माजघराच्या दिशेने आला तेव्हा त्याने ताईला बघितले आणि तो तिच्या कडे आला.
“आलास, चहा ठेवलाय पातेल्यात, फक्त गरम करून घे आणि मलाही थोडा दे परत, एवढ्या पहाटे वाडीत कशाला गेला होतास?” ताईने पडवी झाडत असतानाच त्याला विचारले.
तिच्या कडे न बघता रविंद्रने हौदातले पाणी तांब्याने पायावर घातले आणि तिच्या प्रश्नाला उत्तर न देता तो स्वयंपाक घरात गेला. 5 मिनिटाने त्याने दोन कपातून वाफाळता चहा आणला आणि त्यातला एक कप ताईला दिला.
“रात्रभर झोप नाही मला, नुसता तळमळत होतो काल मी”, रवींद्र ने चहाचा एक घोट घेत बोलायला सुरुवात केली. “काल मी जे काही बोललो त्यातले एकही अक्षर तुझ्या बद्दल नव्हते. तुला चांगलंच माहित्ये मी कोणाला उद्देशून बोलत होतो. माझी ना प्रचंड चिडचिड होते सारखी या सगळया विचारांनी, पाहिलेस ना तू काल, जेवण झाल्यावर दोन्ही काका थांबले का इथे, नाही, का? तर म्हणे रहावे लागेल मग १३ दिवस, च्यायला सख्खी वहिनी गेली त्याच काही नाही यांना, तिकडे सुट्ट्या टाकाव्या लागतील ना त्याची चिंता जास्त यांना, मनात आलं होतं काल सरळ बोलून टाकावं, आलातच कशाला इथे मग, फोन वरूनच दिलगिरी व्यक्त करायची ना, ती सुद्धा झूट साफ झूट. सतीश काय बाजूच्याच गावात आहे म्हणून तो घरी गेला त्याच काही नाही इतकं पण हे बघा दोघे महाशय, वय झालं म्हणून आता प्रवास झेपत नाही म्हणणारे, आणि इकडे यायचे टाळणारे काल इतक्या रात्रीच्या बस ने बरे जायला तयार झाले. आता नाही वाटत यांना प्रवास करताना त्रास होत. आता नाही कंबर दुखत यांची. इतके म्हातारे झाले तरी पैशाचा हव्यास सुटत नाही यांचा म्हणून अजून नोकरी करतात हो आणि वर मला टोमणे मारायचे की बघा गावात राहून काय कमावलं याने, अजून हाफ चड्डीतच रहातो हा आणि वर उघडा, त्यापेक्षा आला असता शहरात तर निदान पिऊन गिरी तरी केली असती याने चार पैसे कमावले असते. अरे, यांना आपल्या वडिलांनी कष्ट करून शिकायला शहरात पाठवले, मुलांना बाजूला ठेऊन तेव्हा बरे दादा चांगला, आणि तिथे जाऊन सेटल झाल्यावर कोण दादा. अरे वाह रे वाह. माझं ना डोकच चालत नाही कधी कधी, काय मिळवलं आपल्या आई वडिलांनी सांग ना ताई, काय मिळालं यांना एवढे कष्ट करून, इतकी वर्षे मन मारून जगले पण काय मिळालं यांना? माझ्या आयुष्याची माती झालीच आणि यांच्यापायी. पण ही एवढी वाडी, सुपारी, माड, केळी दिसतायत ना ते केवळ आमच्या कृपेमुळे म्हणावं या काका लोकांना. आठवडा भर बायका मुलांना घेऊन इथे येऊन राहून दाखवा म्हणावं आणि वाडी नीट ठेऊन दाखवा, नाही चड्डीत…..”
“बास रवी, बास पुरे, पुरे आता…..” ताईने त्याचं बोलणं तोडत त्याला थांबवलं.
“हे बघ, ते कसं वागले तुझ्याशी हे मलाही माहित्ये, पण म्हणून तू सुद्धा त्यांच्या विषयी तसंच मनात ठेवायचेस? का? त्यांनी इथे यायला टाळा टाळ केली असेल पण त्यांनी आई आणि अण्णांना किती वेळा बोलावलं त्यांच्याकडे? पण अण्णा त्याला तयार होते का? नाही ना मग ते फक्त चुकीचेच आहेत असं होत नाही रवी. प्रत्येकाला काही ना काही प्रश्न असतातच आयुष्यात. प्रत्येक जण ते बोलून दाखवतोच असेही नसते, प्रत्येक वेळी नकार देण्या मागचे कारण टाळणे नसते रे, कधी कधी त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे याचाही विचार आपण करायचा असतो. हे बघ रवी त्यांना केवळ चुकीचे ठरवून तुझं समाधान होणार असेल तर मग ठीक आहे. पण तू जर नेहमी तुझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींना त्यांनाच जबाबदार समजणार असशील तर मात्र मला ते मान्य नाही.”
ताईने हातातला कप बाजूला ठेवला आणि परत तिने रवीशी बोलायला सुरुवात केली, “आता तू म्हणशील ताई असंच बोलणार, शेवटी मी सुद्धा शहरातलीच नाही का. असही ताईने कुठे काय केलंय एवढं घरासाठी.” एक दीर्घ श्वास घेऊन ती परत बोलू लागली, “मुलाच्या मुंजीच्या वेळी आई आणि अण्णा आले होते मला इतका आनंद झाला होता की किती वर्षांनी दोघे एकत्र माझ्या कडे आलेत, खूप खूप बरं वाटलं होतं मला पण, माझ्या सासूबाईंनी त्यांचा केलेला पाणउतारा त्यानंतर केवळ नातवासाठी मुंज होई पर्यंत ते थांबले होते, नंतर मात्र मुंजीच्याच दिवशी रात्रीच्या बसने दोघे परत गावाला आले आणि त्या नंतर दोघांनीही माझ्या घराकडे परत कधी पाऊल टाकले नाही. त्या प्रसंगा नंतर मी रोज मनात आई अण्णांची माफी मागत राहिले, एकदा मी अण्णांशी या बद्दल विषयही काढला होता पण जाऊदे ग व्यक्ती तितक्या प्रकृती असं मलाच उलटं त्यांनी समजावलं होतं. मग येत का नाही माझ्याकडे असं विचारलं तर म्हणाले कशाला आम्ही येऊन गेल्यावर तुला त्रास असं उत्तर दिलं होतं त्यांनी. आयुष्यभर माझ्या आई वडिलांच्या अपमानाच्या ओझ्या खाली मी जगत्ये. कित्येक वेळा मी अण्णांना काही रक्कम द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते नाकारणं हे त्यांच्या साठी वडिलांचं कर्तव्य होतं पण माझ्यासाठी मात्र ते हरल्यासारखं होतं.” ताईच्या आवाजातून आता भावनांचा पूर वाहू लागला होता, रवी मात्र तिच्याकडे न पाहता वाडीतल्या सुपारीच्या बारीक पण तरीही लवचिक असलेल्या झाडांकडे पहात होता. वादळं कितीही आली तरी सुपारी आपलं स्थान, कर्तव्य आणि आपलं जगणं कधीच थांबवत नाही हे त्याला ताईचे बोलणे ऐकताना मनोमन पटत होते.
ताईने परत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, “तुला माहित्ये दहा वर्षांपूर्वी अण्णा एकदा मुंबई ला काम होतं म्हणून ४ दिवस आले होते”, ताईने आणि रवीने एकमेकांकडे काही सेकंद पाहिले, “तेव्हा ते माझ्याकडे आले होते, काम होतं म्हणून नाही तर एका आजाराशी झगडत असलेल्या आपल्या मुलीला पाहायला ते आले होते.” रवीने चमकून ताईकडे पाहिले, त्याच्या हातातला कप रिकामा होऊनही आता इतिहासातल्या काही गुप्त रहस्यांनी भरून जायला तयार होता. ते घर, ती वाडी, तो हौद सारं काही एका अनभिज्ञ रहस्याच्या तोंडाशी येऊन थांबलं होतं. आता वेळ होती रहस्यभेदाची…..
— सुमंत परचुरे.
Leave a Reply