सकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच असल्याने त्याने २ दिवस चक्कर मारली होती. पूर्वी गावात दिवस कार्य असले की तेराव्या दिवशी गाव जेवायचे, पण आता तसे राहिले नव्हते, परिस्थिती बदलली होती. वरची पाखाडी, खालची पाखाडी आता विभागली गेली होती आणि त्यात सुद्धा गावात शिल्लक अशी किती लोकं होती. अर्ध्याहून जास्त शहरात शिकायला, नोकरीला स्थायिक, काही म्हातारी माणसं आणि जी काही तरुण शिल्लक होती त्यातली अर्धी पर्यटनाच्या नादाला लागून दारूच्या नशेत गाडली गेली होती. त्यामुळे आईच्या दिवस कार्याला काही गाव जेवणार नाही हे रवींद्र ला ठाऊक होते.
रवींद्र बराच वेळ घोंगडी वर तसाच पडून होता. रोज पहाटे लवकर उठणारा तो आज मात्र त्या पडलेल्या स्वप्नाने आणि नंतर झालेल्या घालमेलीने जास्त धास्तावला होता. तो पहाटे घरात येऊन परत आडवा झाला होता खरा पण त्याला झोप काही केल्या लागली नव्हती. त्याच्या डोक्यात आणि डोळ्यांसमोर त्या स्वप्नातली एक एक गोष्ट सारखी फिरत होती. त्या स्वप्ना बद्दलचे विचार त्याच्या डोक्यात प्रचंड धुमाकूळ घालत होते. त्याला लहानपणी तर असे स्वप्न कधी पडले नव्हते, पण गेल्या १० ते १५ वर्षांच्या काळात त्याला हे स्वप्न किमान ८ ते ९ वेळा तरी पडले होते. माणसाला शांत झोप लागली की त्याच्या मनात सुरू असलेले विचार हे दूरवर मुक्त पसरतात आणि त्यातूनच गोष्टी स्वप्नांच्या रूपाने आपल्याला दिसतात. असे त्याला लहानपणी अण्णांनी शिकवले होते. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीला घाबरत असू तर तीच गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते, कधी आपल्या आयुष्याशी संबंध नसलेल्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसू शकतात हे सगळं अण्णांनी त्याला सांगितले होते. पण आपल्याला पडलेले स्वप्न एक दोनदा नाही तर तीनदा तेच होते हे सांगितल्यावर अण्णांनी त्याला आपले विचार, भीती, किंवा स्वप्नात दिसणारा असंबद्ध पणा यावर त्याला चार गोष्टी सांगून त्याचे निरसन केले होते पण जसजसे तेच स्वप्न सारखे पडू लागले तसे रवींद्र ला ती गोष्ट काहीतरी वेगळी खासच आहे हे जाणवू लागले होते. त्यात दहा वर्षांपूर्वी अण्णांचे निधन झाले आणि मग या सगळ्या गोष्टी असूनही नसल्या सारख्याच मागे पडल्या आणि त्यावर विचार करणे रविंद्रने सोडून दिले होते. पण, काही काळापूर्वी ताईने त्याला अचानक त्याच्याच आयुष्या विषयी एक कोडं घालताना त्याला पडणाऱ्या स्वप्नाचा उल्लेख जाणीवपूर्वक केला होता हे त्याच्या लक्षात आले होते. ताईला अण्णांनी माझ्या स्वप्ना बद्दल सांगितले होते याचा अर्थ अण्णा काहीतरी तिच्याशी बोलले असणार हे त्याने ताडले आणि याबद्दल आणि पहाटे घडलेल्या प्रकारा बद्दल ताईशी बोलायचे असे मनाशी ठरवून रवींद्र अखेर उठला आणि त्याने पडवीत जाऊन हौदात पाण्यावर तरंगणारा पितळी तांब्या उचलून त्यातले पाणी आपल्या तोंडावर मारले.
ताई आणि तिचे मिस्टर बाहेरच्या खोलीत चहा पीत बसले होते. रवींद्र सुद्धा ओट्यात ठेवलेला चहा परत गरम करून बाहेर आला. थंडीचे दिवस असल्याने चहाला आलं अगदी वर आलं होतं. पण त्याने घशाला आणि पोटाला ऊब मिळत होती आणि मनाला ताजेपणा. चहाचा कप हातात नुसता गोल गोल फिरवत रवींद्र काहीतरी विचार करत बसला असतानाच ताईने विचारले, “काय रे, आज उशिरा उठलास तू? बर वाटत नाहीये का तुला? काही होत नाहीये ना?”
त्यावर रविंद्रने चहाचा एक घोट घेत त्याच विचारमग्न स्थितीत उत्तर दिले, “मला काय होतंय? चांगला ठणठणीत तर आहे मी, आज जरा तासभर उशिरा उठलो इतकंच. आणि असंही आता उठून करायचंय काय लवकर, कोणासाठी उठायचं, कशाला उठायचं, आणि का उठायचं मुळात, हूं……”
“अरे, काय झालं एकदम तुला रवी? मी फक्त एवढंच विचारलं की काही होत नाहीये ना तुला? गेले २ दिवस जास्त धावपळ सुरू आहे, दगदग झाल्ये तुझी जास्त म्हणून काळजीने विचारलं, त्यावर एवढं काही लगेच तण तणायला नकोय”, ताई जरा कपाळाला आठ्या पाडूनच बोलली.
“हो बरोबर आहे, तणतण मीच करतो खरं आहे, मला दुसरं येतंच काय नाहीतरी, म्हणूनच मला कोणी काही सांगत नाही, विचारत नाही कुठे जाऊ देत नाही. मला काय अक्कल थोडीच दिल्ये देवाने, अक्कल दिली असती तर माझ्या पासून गोष्टी लपवल्या गेल्या नसत्या कधी”, रवी ने मनात खदखदणारी गोष्ट एकदम बोलून दाखवली.
ताईने त्याच्या बोलण्यावर मिस्टरांकडे पाहिले आणि भुवया उंचावून नुसती मान हलवली. रवींद्र चे लक्ष दुसरीकडेच होते. ताईने मिस्टरांना खुणेने तुम्ही काहीतरी बोला असे सांगितले आणि मिस्टरांनी त्यावर हाताने हो बोलतो असं म्हणत आलं घातलेल्या चहाचा शेवटचा घोट घेऊन घसा उगाचच खाकरला.
” हे बघ रवी”, ताईचे मिस्टर समजुतीच्या स्वरात बोलू लागले, “काही गोष्टी घडताना, त्यावेळी त्या का घडतात आणि त्याने काय परिणाम होतो सर्वांवर, यावर कोणाचा अंकुश नसतो. मला माहित्ये तुला ताईच्या आजारपणा बद्दल सांगितलं नाही आम्ही कोणीच याचं खुप वाईट वाटलं आहे. खर तर खूप राग आलाय तुला आम्हां सर्वांचाच. मला माहित्ये आम्ही जे केलं ते चुकीचं होतं. तुझ्यापासून ती गोष्ट लपवायला नको हवी होती. पण त्यावेळी वातावरणच असं काही होतं की आमचा नाईलाज होता. आणि अण्णांनी स्पष्ट सांगायचं नाही असं ठणकावले होते आम्हाला मग त्यांच्या शब्दापुढे आम्ही तरी काय करणार? तुला न सांगण्या मागे आम्हाला काही फायदा होणार नव्हता. अरे, केवळ अन केवळ तुझीच काळजी म्हणून ताईने आणि अण्णांनी तो निर्णय घेतला होता. ताई ला त्रास सुरू झाला ते माझ्या घरच्या वातावरणामुळे. मी सुद्धा कुठेतरी कमीच पडलो बघ तिला समजून घेण्यात. पण तिची साथ मात्र सोडली नाही कधी, पण तिला तुझी खुप काळजी रे तुझ्या भल्या साठी खुप काही केलंय रे तिने. एका गोष्टी साठी तिला एवढं अपराधी ठरवू नकोस.” ताईच्या मिस्टरांनी अतिशय भावनिक शब्दांत त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला होता. ते सगळं ऐकताना रवींद्रने ताईकडे पाहिले होते आणि त्याच्या डोळ्यात परत अश्रू साठले होते. पण ते अश्रू काहीच क्षण टिकले कारण परत त्याच्या चेहऱ्यावर डावलल्याची रेषा उमटली आणि त्याने ताईकडे पहातच तिला प्रश्न केला, “आणि त्या स्वप्ना विषयी काय मग? त्या बद्दलही काही बोलली नाहीस तू? अण्णां आणि तुझं काहीतरी बोलणं झालंच असणार त्यावर, हो की नाही? मग तरीही तू मला कधी काही सांगितलं नाहीस.” त्याने निराशपणाने परत आपली नजर खाली केली.
ताईच्या मिस्टरांनी तिला आता मोकळेपणाने बोल असा इशारा केला.
ताईने एकदा मिस्टरांकडे आश्वासक नजरेने पाहिले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन तिने रवीला हाक मारली, “रवींद्र, ऐकतोस माझं जरा? अरे रवी…. जरा एक माझं, इकडे बघ…..” तशी रवींद्र ने आपले तोंड तिच्या कडे वळवले. त्याची नजर अजूनही खालीच गेलेली होती.
“तुला लहानपणी असं काही स्वप्न पडलं असेल असं मला वाटत नाही पण, तू अण्णांना सांगितलंस की मला एकच स्वप्न सारख पडतं, तेव्हा अण्णांनी तुला वरवर समजावून ते टाळलं पण त्या बद्दल माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं तुझ्या स्वप्ना बद्दल, पण मला असं वाटतं की त्याचा अर्थ काय असेल यावर मी काही बोलणं म्हणजे अंधारात बाण मारण्या सारखे होईल, तुलाच त्यातून काय नक्की समजतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. माणसाला स्वप्नं पडणं काही वेगळेपण नाही पण एकच स्वप्न सारखं पडणं यात काहीतरी वेगळे आहे असे मला वाटते. तुला काय स्वप्न पडतं हे मला काही त्यांनी सांगितले नाही पण आमच्या नंतर त्याची काळजी घे एवढं मात्र त्यांनी मला निक्षून सांगितले. मीही त्यांना कधीच निराश करणार नाही हे त्यांना माहीत होतं. मला तुझी काळजी घेणं भाग होतं म्हणूनच मी माझ्या आजारपणा विषयी तुला सांगितलं नाही. नाहीतर तू इथलं सगळं सोडून माझ्याकडे आला असतास आणि मग इथे कोण राहिलं असतं. म्हणून तुला सांगणं टाळलं बाकी काही नाही रे, आणि मी खरंच तुझी मनापासून माफी मागते जर मी तुला त्रास दिला असेन तर”, ताईने अश्रू आपल्या हातांनी बाजूला सारले.
“काही गोष्टी का घडतात, या पेक्षा त्या माझ्या बरोबरच का? याचं उत्तर शोधलं तर सारी गणितं सुटू शकतात. तुझ्या स्वप्नाविषयी ही तसेच आहे, तुला त्यातून काहीतरी पलीकडे पाहावे लागेल तेव्हा त्या स्वप्नाचा अर्थ तुला लागेल. मला सांग तुला काय स्वप्न पडतं ते”, ताईने त्याला प्रश्न विचारून मदत करण्याचा विश्वास दाखवला होता.
“ताई सर्वात पहिले म्हणजे माझी माफी मागायचा काहीच संबंध नाहीये, मी तुझ्या पेक्षा लहान आहे आणि ज्या अर्थी तू सांगितलं नाहीस त्या अर्थी त्यात माझं हित असणार हे नक्की पण गोष्टीच अश्या प्रकारे समोर आल्या की मला खुप बाजूला केल्या सारखं वाटलं, म्हणून माझी चिडचिड झाली”, रवींद्रच्या आवाजात थोडा कम्प जाणवत होता. आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही भावनिक शब्द ऐकायला मिळाले की हे होणं सामान्य माणसाच्या स्वभावात बसायचेच त्यामुळे त्यानेही बोलताना काही आढेवेढे घेतले नाहीत.
“आणि स्वप्ना बद्दल म्हणत असशील तर……” पुढची १० मिनिटे रवींद्र ताईला आणि तिच्या मिस्टरांना त्याला पडत आलेले स्वप्न आणि काल पहाटे झालेल्या प्रकारा बद्दल सांगत होता. त्याने प्रत्येक गोष्ट नीट आठवून सांगितली होती. कदाचित यातून काहीतरी गवसेल याची त्याला आशा निर्माण झाल्याने त्याने सगळं सगळं काही नीट सांगितले होते. पण ते सगळं ऐकताना मात्र ताईच्या चेहऱ्यावर प्रचंड घालमेल जाणवत होती आणि जेव्हा त्याने पुष्करणी चे नाव घेतले तेव्हा मात्र ताई चा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता, तिच्या मनातली इतकी वर्षांची दडवलेली एक गोष्ट आज त्या पुष्करणी शब्दाने अचानक परत वर खेचली गेली होती.
रवींद्र हा तिचा सख्खा भाऊ नव्हताच तर तो अगदी बाळ असताना अण्णांना गावातल्या भैरोबा मागच्या पुष्करणी पाशी सापडलेला कोवळा जीव होता. मनात बुजवलेली ही गोष्ट आज त्या स्वप्ना मुळे परत उकरली गेली होती. परत नवीन रहस्य आणि आव्हान घेऊन यायला….
— सुमंत परचुरे.
Leave a Reply