नवीन लेखन...

युगांतर – भाग ९

रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

रवीचा जीव जाणार इतक्यात पाण्यात दुसऱ्या बाजूस काहीतरी हालचाल झाली आणि कुणी पाण्यात शिरल्याचा भास झाला. पाण्यात आता परत तरंग उठायला लागले आणि तळाशी मरणासन्न अवस्थेत असलेल्या रवींद्रला घेऊन ती व्यक्ती पाण्या वर आली. एका हाताने रवींद्र च्या खांद्याला पकडून ती व्यक्ती एका हाताने पाणी बाजूला सारत होती आणि तिने काही क्षणांत काठ गाठला. पुष्करणी च्या मंदिरा बाजूच्या पायऱ्यांवर त्या व्यक्तीने रवीला आणून ठेवले.

संध्याकाळी दिवेलागणीची वेळ, भैरोबाच्या मंदिरात दिवे लावले गेले होते, गाभारा भिंतीच्या कोनाड्यात लावलेल्या दिव्यांमुळे आणि भैरोबा समोरच्या लागलेल्या दिव्यामुळे पिवळ्या-लाल-केशरी रंगाने उजळून निघाला होता. भैरोबाची मूर्ती त्या ज्योतीच्या प्रकाशात छान प्रखर दिसत होती. काळ्या दगडात बनलेल्या त्या भैरोबाच्या मूर्तीला छान लाल गंधाने दिपून टाकले होते. मूर्तीच्या बाजूस समई तेवत होती तर भैरोबाच्या पायाशी छान फुलांचा गुच्छ होता आणि त्याचा सुगंध संपूर्ण गाभाऱ्यात पसरला होता. मंदिरातील सारं वातावरण त्यामुळे सुखी आणि आल्हाददायक झालं होतं. पुजारी मंदिराच्या अंगणातील दीपमाळ लावून परत आले. निरांजन अन उदबत्ती लावून त्यांनी भैरोबाला ओवाळले. आरती झाली, चणे फुटाण्याचा प्रसाद ठेवला. आणि ते मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालण्या साठी गेले. पुढील बाजूने मागे जाताना त्यांना बाहेर पडलेल्या अंधारात पुष्करणी च्या पायरीवर काहीतरी हलताना दिसले आणि ते प्रदक्षिणा अर्धवट सोडून पायरीपाशी काय आहे ते पाहण्यास गेले असता त्यांना एका टोपलीत कापडात गुंडाळलेले एक लहान मूल दिसले आणि त्यांनी अतिशय गंभीरपणे आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहिले. “शिव शिव शिव शिव, भैरवनाथा हे काय रे नवीन आता, कोणाचं पोर हे, असं का ठेवलेस आणून तुझ्या पाशी”, असे म्हणत त्या पुजाऱ्याने त्या बालकाला हातात घेऊन गाभाऱ्यात भैरोबाच्या समोर ठेवले आणि परत त्यांनी भैरोबाची आरती म्हणायला सुरुवात केली.

जय देव जय देव जय भैरवनाथा!
सुंदर पदयुग तुझे वंदीन निजमाथा!!…..

आरती म्हणून होई पर्यंत ते मूल त्या भैरोबा समोर शांत होते पण जशी आरती संपली तसं त्या बालकाने भोकाड पसरलं……

रवीने डोळे उघडले, आजूबाजुला काळाकुट्ट अंधार अंधार अन फक्त अंधार होता. त्याला आपण कुठे आहोत हे आधी समजलेच नाही. त्याने हात जमिनीला लावून उठायचा प्रयत्न केला पण त्याला जमले नाही ते. तो प्रचंड घाबरला होता. इतक्यात त्याच्या डाव्या बाजूने कोणीतरी हातात कंदील घेऊन येत असलेले त्याला दिसले. तसा तो मागील भिंतीला जरा खेटूनच बसला. ती व्यक्ती त्याच्या पाशी येऊन थांबली तशी रवीने विचारले, ” ती…..ती आरती संपली का? मं…. मं……मंदिरातली…..आरती संपली का?”

त्यावर ती व्यक्ती पुढे आली आणि तिने हातातला कंदील बाजूला ठेऊन दुसऱ्या हातातल्या तांब्यात आणलेले पाणी रविसमोर केले.

” ध….धन……धन्यवाद….. दादा….. मी कुठे आहे नक्की? तुम्ही को….को……कोण आहात? ही कोणती जागा आहे, ती आरती संपली का? ” रवीने भीत भीतच तो तांब्या हातात घेत विचारले. पाणी चांगले गरम होते.

“आधी पाणी तर पी….. थंडी लई हाय, अन ओला सुद्धा झालायस तू पुर्न…. मग बोलू”, त्या व्यक्तीचा आवाज चांगला खणखणीत होता. पण आवाजावरून गावंढळ वाटत होती ती व्यक्ती.

“मी कुठे आहे नक्की, मला काहीच कळत नाहीये हो दादा, सांगा ना?” रवी ने तांब्यातले पाणी पिता पिता विचारले. पाणी चांगले गरम असल्याने त्याला जरा हुशारी आली.

“पोरा अरे या पाण्यात पडला होतास तू, मला आवाज आला म्हणून मी पहायला आलो तर तू बुडत होतास म्हणून मग मी तुला बाहेर काढलं मगाशी” त्या व्यक्तीने सांगितलं.

ते शब्द ऐकून रवीला सगळं सगळं आठवलं, एका क्षणांत त्याच्या लक्षात आलं सारं, त्याने दचकून त्या व्यक्ती कडे पाहिलं, त्या पुष्करणी कडे पाहिलं, त्याच्या स्वतःकडे पाहिलं.

“तू कोण आहेस? ते बाळ कुठे आहे, आणि मी पाण्यात बुडत होतो ते बाहेर कसा आलो? ते बाळ कुठे आहे. आणि मी पाण्यात होतो मगाशी, आता इथे कसा आलो आणि…..आणि ती आरती कुठे ऐकायला येत होती मला? ” रवीने प्रश्नांची सरबत्ती सूरू केली तशी त्या व्यक्तीने जोरात शू…………. असा आवाज करत तोंडावर बोट ठेवले आणि रवींद्र घाबरलेल्या अवस्थेत त्याच्याकडे पाहू लागला.

“लई बोलतोस तू बाबा, का येवढा चिडून राहिलास, जरा दम खा की, समदं कळेल हो तुला”, असे म्हणून त्या व्यक्तीने त्याच्याकडे हसत पाहिले.

रवी आता खूप घाबरला होता. तो आजूबाजूला हाताने चाचपडत होता की कुठे त्याला बाळ दिसतंय का? किंवा अजून काही हाताला लागतंय का प्रतिकार करण्यासाठी, एखादी काठी किंवा दगड. हा बाबा कोण आहे त्याला कळत नव्हते. शेवटी त्याने आवाज चढवुन पण अतिशय घाबरलेल्या आवाजात त्याला विचारले, “अरे बाबा का एवढा त्रास देतोयस, सांग ना तू कोण आहेस? मी कुठे आहे, ते बाळ कुठे गेलं आणि ती आरती कुठली ऐकायला येत होती मला….. कृपा करा मला सांगा मी हात जोडतो….हात जोडतो….” रवीने त्या व्यक्ती समोर हात जोडले अन तो रडायला लागला तशी त्या व्यक्तीने पुढे येत त्याचे हात धरले आणि एका हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत केले.

“रवींद्र ना तू? ठाऊक हाय मला रवींद्रच हायेस तू, शांत हो रवींद्र, तू हितच आहेस, मंदिरा पाशी. आणि हो तुला काहिबी झालेलं न्हाई.” ती व्यक्ती आता त्याच्या समोर बसली.

“तुम्हाला माझं नाव कसं माहीत? कोण आहात कोण तुम्ही? मला खूप भीती वाटत्ये हो, खरंच सांगा ना मला नक्की काय चाललंय माझ्या बरोबर…….” रविंद्रने आता जोरजोरात रडायला सुरुवात केली.

त्याला परत शांत करत ती व्यक्ती म्हणाली, ” ठीक हाय सांगतो. पण ऐकू शकशील तू सगळं?”

“आता नाही कळलं तर डोक्यात त्या सगळ्या गोष्टी फुटतील माझ्या. मी तयार आहे जे काही असेल त्यासाठी, कृपा करा पण मला माझ्या बरोबर काय घडतंय ते सांगा”, रवीने आता मनाची तयारी केली होती.

“ऐक पोरा, तुला स्वप्नात ते लहान पोर दिसत व्हतं ना? आणि मगाशी त्या मंदिरात सुद्धा लहान पोर दिसलं ना? आरती बी सुरू व्हती……” त्यावर हो अशी मान हलवून रवीने आपले मन परत घट्ट केले.

“ते पोर दुसरं कोणी बी नसून तूच व्हतास……” त्या व्यक्तीने रवीकडे अतिशय शांत मुद्रेने पहात शब्द उच्चारले.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..