नवीन लेखन...

युवापिढी आणि वाचनसंस्कृती

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला मेधा सोमण यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


आयुष्य अखेरपर्यंत आनंदाने आणि विवेकाने जगावं अशी इच्छा असेल तर माणसाला कशाची तरी खूप आवड असायला पाहिजे. या छंदाची जोपासना लहानपणापासूनच असेल तर सहजपणे माणूस आपल्या संकटकाळी, आजारपणामध्ये, निवृत्तीच्या काळात किंवा रिकामा वेळ मिळाला तर त्या छंदात आपला स्वतःचा वेळ आनंदात घालवू शकतो. एवढ्यासाठी खरं म्हणजे लहान वयापासून गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, गिर्यारोहण, आकाशदर्शन, किंवा वाचन असा कोणतातरी छंद आपल्याला आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे, की ज्यामुळे आपले सगळेच क्षण श्रीमंत आणि समाधानी बनतील.

वाचनाची आवड असणारी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी भान हरपून सगळं आजूबाजूचं जग विसरून वाचत असताना दिसते. पण आजची युवापिढी वाचनापासून दूर आहे का, अशी शंका अनेकांना वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आजची युवापिढी असं म्हणताना डोळ्यांसमोर पटकन महाविद्यालयीन विद्यार्थीवर्गच येतो. सोळा ते चोवीस-पंचवीस वर्षापर्यंतच्या मुलांचे महाविद्यालयीन शिक्षणाचेच वय असते.

युवावर्ग म्हणताना त्यातही व्यावसायिक शिक्षणासाठीची पदवी किंवा पदविका घेणारे विद्यार्थी म्हणजे सीए करणारे, इंजीनिअरिंग किंवा मेडिकलला जाणारे किंवा कॉम्प्युटरसाठी वेगवेगळे कोर्सेस घेणारे विद्यार्थी, त्यांच्या प्रैक्टिकल्स, लेक्चर्स, सेमिनार्स आणि प्रोजेक्टस्‌मध्ये सदैव गुंतलेले असतात. पण यांच्या व्यतिरिक्त कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्याबाबत विचार करता, त्यांना कॉलेज लेक्चर्सव्यतिरिक्त तसा पुष्कळ मोकळा वेळ मिळू शकतो.

यावेळेचा उपयोग काही विद्यार्थी विविध स्पर्धांतून भाग घेऊन, नाट्य, काव्य, संगीतनृत्य, वक्तृत्व, खेळ वगैरे कलांच्या पर्यायाने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी करतातही.

पण काही विद्यार्थी मात्र मिळणारा वेळ कॉलेज कट्ट्यावरील गप्पा, हॉटेल्स, पार्ट्या, टीव्ही मालिका बघणे, एफ.एम. रेडिओ ऐकणे, सिनेमा, नाटक आणि इंटरनेटवरील चॅटिंग, इ-मेल, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटमध्ये दिवसाचे अनेक तास घालवताना दिसतात.

इंटरनेटद्वारे त्यांना वेगवेगळी माहिती मिळविता येते. पण काहीवेळा ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं जे म्हटलं जातं, त्याप्रमाणे मनाचा समतोल राहतोच असं नाही. आणि इंटरनेटवरून  चॅटिंग वगैरे द्वारा नको त्या माणसांशी नको तेवढी मैत्री वाढविली जाते आणि त्यातून अनेक समस्यांना आमंत्रण दिलं जातं.

मुलगा दहा बारा वर्षांचा झाला म्हणजे आईवडील त्याला हौसेने कॉम्प्युटर आणून देतात. हेतू असा असतो, की आपला मुलगा लहानवयापासून कॉम्प्युटर हाताळू लागला, तर मोठेपणी तो उत्तम संगणकतज्ज्ञ बनेल. पण आईवडिल ऑफिसला गेल्यानंतर शाळा-कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त, या कॉम्प्युटरचा उपयोग मात्र नको त्या जीवघेण्या खेळांशी सुद्धा कधी केला जातो; ते त्या मुलाला किंवा मुलीलाही कळत नाही.

काळाच्या ओघात नव्या शोधाचा उपयोग माणसाच्या हितासाठी, सुखासाठी होतो आणि केलाही जातो. उदा. मोबाइल फोनमुळे या धकाधकीच्या आणि तितक्याच असुरक्षित जीवनात, माणसांच्या खुशालीसाठी किंवा महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहचवण्यासाठी खूपच उपयोग होतो. पण तरुण वर्गाकडून मोबाइलचा अतिरेकी वापर, क्षणाक्षणाला परस्परांना पाठवले जाणारे एसएमएस् आणि दैनंदिन कर्तव्याच्या आड येणारे, त्यांचे मोबाइलवरचे सततचे बोलणे. मोठ्या, वडिलधाऱ्या माणसांना त्रासदायक होतेच आणि मुलांच्या हिताच्या आड येणारेही वाटते. अशा सर्व परिस्थितीत दिवसाचा जर बराचसा वेळ जात असेल तर तरुणं पिढी पुस्तक वाचणार कधी? वाचनासाठी वेळ कसा आणि किती देणार? या सर्व गोष्टीं शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षांचा अभ्यासही आहेच. परीक्षेसाठी नेमलेल्या विषयांची नेमलेली पुस्तके त्यांनी वाचून, अभ्यासून विषय तयार करावा अशी खरी अपेक्षा असते. काही अभ्यासू विद्यार्थी ती पुस्तके त्या त्या विषयांसाठी वाचतातही; पण न वाचणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकं वाचण्याची इच्छा असणारे जसे काही असतात तसे अभ्यासाखेरीज न वाचणारे संख्येने खूप असतात. त्यांना काय वाचावे? आणि कधी वाचावे? याचं मार्गदर्शन करण्याची त्यांच्या आईवडिलांची तशी क्षमताही नसते आणि त्यांना वेळ नसल्याची कारणेही सांगता येतात. हातात पुस्तक घेऊन वाचायला वेळ नाही, असं तरुणांकडून अनेकवेळा सांगितले जाते. या म्हणण्यात सत्य नाही असं नाही. कारण करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी असं सांगितलं, तर त्यांत त्यांना दोष देणंही योग्य होणार नाही. पण आपल्या करिअरविषयी आस्था नाही, ओढ नाही आणि चिंता तर नाहीच नाही, अशी जी तरुण मुले आहेत त्यांच्यासाठी वाचनाची आवडच त्यांना पुढच्या आयुष्यात ‘माणूस’…. सच्चा माणूस म्हणून जगण्याला आधार देईल. म्हणूनच टीव्ही आणि टीव्हीवरील उथळ मालिका पहाणे, इंटरनेटवर चॅटिंग, फेसबुक वगैरे सोशल नेटवर्किंगमध्ये वेळ वाया न दवडता, युवा पिढीने वाचनाचे संस्कार जाणीवपूर्वक करवून घेतले पाहिजेत.

प्राचीन काळापासून सुसंस्कृत माणसाला चौफेर ज्ञानाची भूक होती आणि आज विज्ञान युगातही एकविसाव्या शतकात ती भूक तशीच कायम आहे. पूर्वी मुद्रणकला अस्तित्वात नसताना अध्ययन-अध्यापनाद्वारे, पठणाद्वारे, गुरुंकडून शिष्यांकडे ज्ञान पिढ्यानपिढ्या संक्रमित झाले. मुद्रणकला अस्तित्वात आल्यावर छापखान्यातून छापलेली पुस्तके, आजपर्यंत माणसाची ज्ञानाची भूक भागवत आहेत.

वाचनामुळे फक्त ज्ञानच मिळतं असं नाही. आपली भाषाही समृद्ध होते. आपली शब्दसंपत्तीही वाढते. कोणतीही अभिव्यक्ती चांगल्या शब्दांद्वारे करता येते. विचारांची खोली वाढते. मन सुसंस्कृत आणि उदार बनते. वाचलेल्याची नोंद करण्याची सवय ठेवली तर त्या नोंदीसुद्धा पुनः प्रत्ययाचा आनंद देतात आणि सर्व जीवनच सुखी समाधानी आणि आनंदी बनते.

तरूण पिढीला आपलं जीवन सुखासमाधानाचं आणि आनंदाचे व्हावे असे वाटत असेल, तर वाचनासारखा दुसरा पर्याय नाही.

आज काळ बदलला आहे. बदलत्या काळाप्रमाणे अनेक सोई-सुविधा आपल्या सेवेला तत्पर आहेत. मग त्यांचा उपयोग आपल्या संपन्न, सुसंस्कृत जीवनासाठी का करायचा नाही?

कॉम्प्युटर, लॅपटॉप आपल्या हाताशी आहेत ना, तर आपणही आपल्याला बहुश्रुत बनवण्यासाठी, आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी बनविण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी इंटरनेटचा वापर जरूर करावा. आपणही इंटरनेटवरून अगदी अधाशासारखे वाचू शकतो.

अनेक वृत्तपत्रे, मासिके, इंटरनेटवर आपल्या वार्ता, महत्त्वाचे लेख आणि अनेक पुस्तकही प्रसिद्ध करतात. हातात पुस्तकं घेऊन वाचण्याची प्रवृत्ती जरी कमी झाली असली तरी इंटरनेटवर माहितीचा प्रस्फोट झालेला आहे. गुगल, याहू, विकीपिडिआ (wikipedia) अशा अनेक संकेतस्थळांवर प्रचंड माहिती उपलब्ध होते. आज परिपक्च असे अनेक तरुण हातात पुस्तक घेण्यापेक्षा असं वाचनही करीत असतात.

मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या अशा मराठी मुलांना मराठी पुस्तके वाचण्याचा कंटाळा येतो. अशा मुलांसाठी मराठी भाषेतील पुस्तके इंग्रजीमध्ये अनुवादित होणे आवश्यक आहे. नवी पिढी हातात पुस्तके घेऊन वाचील अशी शाश्वती नाही. म्हणून मराठी भाषेतील पुस्तकांचे डिजिटलायझेशन होणं आवश्यक आहे. कारण तरुणांपुढे सदैव लॅपटॉप असतो. चार-पाचशे पानांचे पुस्तक हातात घेऊन वाचणं हे तरुणांच्या बाबत भूतकालीन बाब झाली आहे. आयपॉडमुळे पुस्तक हातात घेऊन वाचण्यापेक्षा ‘ऐकता’ येऊ शकेल, इंटरनेटवरही मोठी मोठी पुस्तके वाचता येतात. इलेक्ट्रॉनिक बुक्स कुठेही नेता येतात.

ग्रंथालयातही आता ‘इलेक्ट्रॉनिक लायब्ररी’ हे हायटेक्नॉलॉजी स्किल वापरता येईल. यापुढच्या काळात पुस्तकरूपाने वाचन केले जाईलच असे नाही. इंटरनेटवर जशी पुस्तकं वाचता येतात तशी ऑडिओ बुक्सही आता मिळू शकतात. ही ऑडिओ बुक्स कानाला इअरफोन लावून गाणी ऐकली जातात तशी ऐकता येतात. ऑफिसला जाताना गाडीतून, प्रवास करताना, बसने जातानाही, अगदी घरातील काम करतानाही ही ऑडिओ बुक्स ऐकता येतील. परदेशात इंग्रजी पुस्तके अशा स्वरूपात जर मिळू शकतात, तर भारतात, महाराष्ट्रात अशी मराठी पुस्तकंही तरुणांना मिळणं आवश्यक आहे. तरुणांनी आजच्या युवापिढीने मिळालेल्या सुविधांचा वापर असा करावा, की जेणेकरून वाचनाचे मन सुसंस्कारित होईल. व्यक्तिमत्त्व प्रभावी बनेल. निश्चयी, विवेकी वृत्तीत वाढ होईल आणि विचारांची खोली वाढेल. उत्तम सुसंस्कारित माणूस म्हणून आपली ओळख वाढेल; मात्र यासाठी मराठी प्रकाशकांनीही तरुणांसाठी इलेक्ट्रॉनिक बुक्स, ऑडिओ बुक्स तयार केली पाहिजेत. ग्रंथालयांनीही इलेक्ट्रॉनिक लायब्ररी हा विभाग तयार केला पाहिजे; की ज्यामुळे वाचनापासून दूर जाणारी तरुण पिढी वाचनाकडे नक्की आकर्षित होईल.

-मेधा सोमण

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला मेधा सोमण यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..