आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्याने बहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही.
सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाट व मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि.
पण खरचं आध्यात्म मागासलेलं, बुरसटलेलं आहे का ? यावर आपण कधी संशोधन केले का ? आध्यात्माला कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला का ? हे प्रश्न जर आपण आपल्या मनाला विचारले तर उत्तर नाहीच येईल ! याची खात्री आहे. पण तरी सुध्दा आपण आध्यात्माला विनाकारण नावे ठेवतो, हा विरोधाभास म्हणावा की अंधश्रध्दा हेच समजत नाही. परंतु आपण आध्यात्माला नावे ठेवतो. हे मात्र सत्य आहे, याचे कारण म्हणजे दुसरे विदेशी किंवा युरोपिय म्हणतात आध्यात्म वाईट म्हणून आपण ही म्हणतो वाईट. आपण आपली बुध्दि तर त्यांच्याकडे गहाण टाकलेली आहे ना ! म्हणून ती वापरण्याचा किंवा स्वत:चा असा वेगळा विचार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
पण हेच युरोपिय लोक जेव्हा आमच्या शास्त्राचे संशोधन करतात, त्याची व्याप्ती व महत्व जाणतात, तेव्हा आम्हाला ते नव्याने समजते व आम्ही त्याचे अनुकरण करतो. जसे आमचे ‘योगशास्त्र’ आम्ही ‘योगा’ म्हणून स्विकारले, आमचे ‘आयुर्वेद शास्त्र’ आम्ही ‘आयुर्वेदा’ म्हणून स्विकारले, तसेच आता आमचे ‘आध्यात्म शास्त्र’ आम्ही ‘आध्यात्मा’ म्हणून स्विकारणार की, काय ? याची भीती वाटते. कारण नुकतेच न्यासाने एका संशोधनाद्वारे आपल्या वैदिक गायत्री मंत्राची स्पंदने जगातील इतर सर्व मंत्राच्या स्पंदनापेक्षा जास्त व सकारात्मक उर्जा वाढवणारे आहेत, हे मान्य केले आहे. तर दुसरे म्हणजे भारतातील जेवढे दत्त क्षेत्रे आहेत, ज्यात गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, औंदुबर वाडी, गिरणार पर्वत आणि अक्कलकोट आदि ठिकाणी काही तरी विशेष उर्जा त्यांना आपल्या सेटेलाईट उपकरणाद्वारे दिसली. तर तिसरी गोष्ट म्हणजे भारत श्रीलंका दरम्यान असलेल्या रामसेतूचे नासाने मान्य केलेले अस्तित्व आणि चौथे म्हणजे संस्कृत ही भाषा अंतराळात संशोधनासाठी सर्वोत्तम भाषा आहे, हे त्यांनी मान्य केले. अशा अनेक घडामोडी आज घडत आहेत. ज्यातून आध्यात्माची नव्याने ओळख व अस्तित्व समोर येत आहे, ही निश्चितच खुप गौरवपुर्ण बाब आहे. ही झाली आध्यात्माची एक महत्वाची बाजू.
मात्र आज काही आध्यात्मातीलच पाखंडी, भोंदुबाबा, बुवाबाजी मूळे अनेकांच्या मनात आध्यात्माविषयी गैरसमज निर्माण झालेला आहे. अशा भोंदुगिरी मुळे बऱ्याच वेळा आपल्या श्रध्देला तडा बसतो, आपली फसवणुक होते, आपल्याला लुटले जाते. पण याचा शास्त्रशुध्द आध्यात्माशी काही एक संबंध नाही. या पाखंडी लोकानी सांगितलेले आध्यात्म व शास्त्रीय आध्यात्म यात दोन टोकाचे अंतर आहे. हे पाखंडी लोक स्वत:चे महत्व वाढवतात, संपत्ती वाढवतात. आपल्या खऱ्या हेतुपासून सर्वांना अंधारात ठेवून लोंकाच्या श्रध्देच्या बाजार मांडतात. तर शास्त्र शुध्द वैदिक आध्यात्म हे स्वत:ची ओळख नष्ट करायला शिकवते. जीवनातील अंधकार नष्ट करते. वैदिक आध्यात्म आपल्याला सर्व मोह-पाशातून मुक्त करते. कारण शुध्द आध्यात्म म्हणजे शाश्वत ज्ञानप्राप्ती होय. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होय. शुध्द आध्यात्म म्हणजे चैतन्य होय, शुध्द आध्यात्म म्हणजे चिरतंन शांती होय, शुध्द आध्यात्म म्हणजे समर्पण होय. शुध्द अथवा वैदिक आध्यात्म म्हणजे सुख-दु:खाच्याही पलिकडील परमानंदाची प्राप्ती होय. असे आध्यात्मिक गुढ ज्ञान ज्यांना ज्यांना मिळवता आले ते जितेद्रिंय, निश्चल आणि स्थितप्रज्ञ झाले. अशा महान विभूतीनांच आपण आज ऋषी-मुनी, तपस्वी आणि संत म्हणून ओळखतो. असे हे महापुरूष म्हणजे आध्यात्म विश्वातील तेजस्वी तारे होत. यांनी जगत् कल्याणासाठी आपल्या प्रपंचाची व संपत्तीची राख रांगोळी करून समाज प्रबोधन केले. तर आज काही महाठग, स्वंयभू बाबा, महाराज लोक याच विभूतींच्या नावाने हजारो लाखो रूपये कमावत आहेत, हे खुप मोठे दुर्दैव आहे. असो.
आज काही उच्च शिक्षित व स्वत:ला विद्वान समजणारे लोक वरील ढोंगी लोकामुळे आध्यात्माला अंधश्रध्दा मानतात. पण आध्यात्म म्हणजे अंधश्रध्दा नसून सुखी आणि समाधानी जीवनाची गुरूकिल्ली आहे. आध्यात्माचा उगम हा श्रध्दा किंवा अंधश्रध्दा याच्या हजारो वर्ष पुर्वीचा आहे. सजीव सृष्टीच्या उगमा पुर्वीपासून आध्यात्म अस्तित्वात आहे. आध्यात्म ही परमात्म्याची प्रथम निर्मिती आहे, हे आपण प्रथम ध्यानात घ्यावे. आता आध्यात्माच्या खरेपणा विषयी कळाल्यानंतर मग परत प्रश्न असा पडतो की, परमात्मा किंवा परमेश्वर प्रत्यक्षात आहे अथवा नाही ? तेव्हा आपण याच्या जास्त खोलात न शिरता याबाबतीत परम तपस्वी, महाज्ञानी, सिध्द पुरूष आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे विचार जाणून घेऊ. श्री रामकृष्ण म्हणतात,”रात्री आकाशात किती तरी तारे दिसतात, परंतु सकाळी सूर्य उगवल्यावर ते दिसत नाहीत. पण तुम्ही असे म्हणू शकता काय की, दिवसा आकाशात तारे नसतातच मुळी ? लोक हो, अज्ञान अवस्थेत परमेश्वराचे दर्शन होत नाही. म्हणून असे म्हणू नका की, परमेश्वर नाहीच !” याचाच मतितार्थ म्हणजे या जगात परमेश्वर नांदतो.
आजच्या यांत्रिक युगात जीवन व मृत्यू हे एकमेकांचा पाठलाग करत आहेत. यात मृत्यू कधी आपला डाव साधेल, हे सांगणे कठिण आहे. तेव्हा युवकांनी तात्काळ आध्यात्माचा अंगिकार करावा. आध्यात्माने युवकांत नवचैतन्य निर्माण होईल. यातून समाजाचे व देशाचे भले होईल. युवकातील स्वैराचार व बेशिस्तपणा दूर होईल. आपण आपल्या देशाचा गौरवपुर्ण इतिहास पाहितल्यास आपल्या असे लक्षात येईल की, आध्यात्मातूनच आपला देश पुढे आलेला आहे. आध्यात्मानेच आपल्याला एक नवी दिशा दिलेली आहे. आपल्या प्राचीन ऋषी-मुनींनी केलेले संशोधन म्हणजे आजचे प्रगत विज्ञान होय.
आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशील आपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनी आध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा.
– श्री. सुनिल कनले
प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची ज्योत पेटवणाऱ्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवकरी !
Leave a Reply