आज स्त्रिया आपल्या स्त्रीशक्तीचा प्रताप जगाला दाखवत आहेत आणि जग ते पाहून थक्क होत आहे . ‘ती ‘ ने गगन भरारीच नाहीतर अंतरिक्ष गमंना पर्यंत आपली समर्थता सिद्ध केलीयय . आज ‘ती ‘ला विचारले ‘का ग कोठे चालली आहेत ? ‘ तर ती काय उत्तर देईल ?
‘ झनन झनझनके अपनी पायल ,
चली मै आज मत पूछो काहा ‘
१९६२ साली ‘आशिक ‘नावाचा एक सिनेमा आला होता . त्या काळच्या परंपरे नुसार या सिनेमाची पण गाणी श्रवणीय होती . तुम्हास यातील ‘ मै आशिक हू बहारोंका —‘ . ‘तुम आज मेरे संग गेलो —-‘ , ‘तुम जो हमारे मीत न होते —-‘ हि गाणे आठवत असतील . त्याच सिनेमातलं हे गाणे .
‘ झनन झनझनके अपनी पायल ,चली मै आज मत पूछो काहा ‘
या सिनेमातील इतर गाण्याच्या मानाने हे गाणे थोडे दुर्लक्षितच . ‘मी जुन्या गाण्याचा चाहता आहे ‘ म्हणणारे हि या गाण्याला विसरले आहेत . पण हे खूप वैशिष्ट्यपूर्ण गाणे आहे . कुठली वैशिष्ट्ये ? कुठल्याही सिनेमाचे गाणे हि एक ‘टीम वर्क ‘ कलाकृती असते . गीत ,संगीत , स्वर ,चित्रीकरण आणि त्यातील नटाचा अभिनय , हे त्या गाण्याचे ‘ पंच प्राण ‘असतात असे म्हणलेतर वावगे ठरू नये . ! त्यातील एक जरी कमकुवत असेल तर कलाकृतीला गालबोट लागते .
या गाण्याचे गीतकार आहेत शैलेंद्र . बस नाम हि काफी है l अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण गाणी त्यांनी हिंदी सिनेमाला दिली आहेत . या गाण्या पुरते सांगायचे तर तुम्ही ज्यावेळेस गाणे ऐकाल त्या वेळेस तुम्हासच प्रचिती येईल ! शैलेंद्र आणि शंकर -जयकिशन याना वगळून ‘हिंदी सिने गीतांचा ‘ इतिहास लिहता येणार नाही !
शंकर-जयकिशन हि प्रतिभावंत संगीतकारांची जोडी ,अनेक अवीट गोडीची गाणी त्यांनी दिलीत , पण या गाण्यासाठी रसिक ,विशेषतः शास्त्रीय संगीताचे चाहते त्यांचे ऋणी राहतील ! कारण —– त्यांच्या साठी हे गाणे म्हणजे एक ‘स्पेशल ट्रीट ‘ आहे ! हिंदी सिनेमातील गाण्यात सहसा न वापरलेला जाणारा ‘राग ‘ त्यांनी या गाण्यासाठी योजिला आहे ! हे गाणे ‘राग -शंकरा ‘ वर आधारित आहे .
राग -शंकरा बद्दल काय लिहावे ? हा राग रात्रीचा दुसरा प्रहर किवा उत्तर रात्रीचा राग आहे . याची प्रकृती उल्हासपूर्ण , स्पष्ट आणि प्रखर आहे , वीर रस पूर्ण !(या वृत्ती हे गाणे ऐकताना आपल्याला स्पष्ट जाणवतात !) . त्रिताल सारखा द्रुत गतीतला ठेका याला फुलवतो . आता राग शंकराचा विषय निघालाय तर सांगावेसे वाटते कि हिंदीने नसले तरी मराठी गाण्यांनी या रागाला बऱ्या पैकी स्वीकारलंय . जुन्या संगीत नाटकात , गीत रामायणात हा राग छान भरलाय . तसे कशाला ,आपल्या सर्वांच्या परिचयाचे उदाहरण देतो .
‘ आग नाच नाच राधे ,उडवुया रंग ,
रंगा मध्ये भिजेल तुझे गोरे गोरे अंग ‘ हे गोंधळात गोंधळ मधलं ,उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं गाणं . याच रागातील !( पण सिनेमात या चांगल्या गाण्याचा विचका झालाय . असो )
या रागास शोभेलसा उल्हासपूर्ण , आवेशयुक्त सूर लताजींनी लावलाय . सगळं गाणं कस जिवंत करून टाकलंय . ‘ झनन झनझनके अपनी पायल ,’ म्हणताना ऐकणाऱ्याच्या अंगातुन झिणझिण्या निघतात . अंगावर काटा येतो ! सळसळती लांब सडक नागीण किंवा वीज चमकावी तस काहीस ! शंकरा सारखा राग आणि लताजींचा स्वर्गीय आवाज !केवळ दुर्मिळ योग्य ! या गाण्याला लताजींनी जी लय आणि गती बहाल केलीय त्याचे वर्णन करायला मी कफल्लक आहे ! या गान सरस्वती पुढे आमची अक्षर सरस्वती नेहमीच निरक्षर होते .
या गाण्याचे कृष्ण धवल चित्रीकरण असूनही मस्त झालाय . हे गाणे एक स्टेज परफॉर्मन्स म्हणून चित्रित केलाय . एकंदरच गाण्याची गती चित्रीकरणात पण जपलिय . रेल्वे इंजन आणि रुळांचा कल्पक वापर करून घेतलाय ,या मुळे अजून एक इफेक्ट साध्य झालाय तो म्हणजे हा गाण्याचा कार्यक्रम अनेक शहरात होतोय हे आपसूकच प्रेक्षकांना पर्यंत पोहचत . हा ,थोडी स्पष्टता ( brightness ) हवी होती असे वाटते .
पद्मिनी वर हे गाणे चित्रित झालंय . त्रवणकोरच्या तीन भगिनी -ललिता , रागिणी ,आणि पद्मिनी या भारतनाट्यमच्या ‘दादा ‘! यांच्या नृत्य कौशल्याचा उहापोह करण्याच्या भानगडीत आपण पडू नये हेच बरे ! लताजींचा आवाज आणि यांचे नृत्य या ऐकण्याच्या आणि पहाण्याच्या गोष्टी नाहीत ,तर अनुभवण्याच्या आहेत ! फक्त तुम्हाला या गाण्यातील दोन ब्युटी स्पॉट सांगतो . पहिलाआहे — पहिल्या कडव्यात ‘ मै सावन कि चंचल नदीया , बंधके रहिना ,बांध के रहूगी ‘ असे बोल आहेत . त्यातील ‘बांध के रहूगी ‘ या वाक्यावर पद्मिनीने जो मुद्रा अभिनय केलाय तो —- फक्त आणि फक्त लाजवाब !( मस्त क्लोजप घेतलाय !) दुसरा स्पॉट आहे शेवटच्या कडव्यात ,–‘खोज रही हू उस सपनेको ,तरस गये नैन हमारे ,जिसको पलको मे रखने को ‘ या ओळीच्या शेवटी पद्मिनीने अश्या काही अलगद पापण्या मिटल्यात कि, खरोखरच तिने आपले स्वप्न पापण्यात कैद केल्याचा फील पाहणाऱ्याला येतो !
तर असे हे सुंदर गाणे . मला आवडलेले . का ? याचे उत्तर ,माझ्या परीने देण्याचा (दुबळा का होईना ) प्रयत्न केलाय . ते ‘राग ‘ ‘नृत्य ‘ बाजूला ठेवा ,पण एक ‘हटके ‘ गाणे म्हणून एखाद्या वेळेस सवड काढून जरूर एका .
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .