परदेशातल्या विमानतळावर उतरल्याबरोबर आपण अगदी नकळत तुलना करु लागतो ….
आपली आणि त्यांची….
खरंच देश-विदेशातील माणसं हजारो मैलांवर रहात असतांना त्यांचे धर्म वेगळे असतील पण सवयी आणि लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक “डीएनए” जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला?
अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !
वाचताना सतत वाटते की – अरे, आपण कितीतरी बाबतीत अगदी सारखे!
झांझीबार देशातले हे सोहोळे वाचतांना मग जाणीव होते, हा तर त्यांचा आणि आपला …..
अवघा रंग एकचि झाला !!!
झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही. जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत.
आजपासून ही मालिका सुरु होत आहे !!
अरूण मोकाशी यांचा परिचय
- व्यवसायाने परिवहन सल्लागार. सिव्हील इंजिनियरींगचे पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र व गुजराथमध्ये झाल्यावर लंडनला प्रयाण. तेथे ब्रॅडफर्ड व लंडन विद्यापीठात परिवहन शाखेचा पदव्युत्तर अभ्यास.
- इंग्लंडमध्ये बारा वर्षे सल्लागार संस्थेत काम केल्यावर १९७८ मध्ये भारतात परतले. मुंबईत ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ च्या कार्यालयात परिवहन शाखा स्थापन करून त्याचे वीस वर्षे नेतृत्व केले. या कालावधीत भारतातील सुमारे बारा शहरातील परिवहन सल्लागार अहवाल स्थानिक, राज्य व केंद्र सरकारला सादर केली. यावेळी पन्नास टेक्नीकल पेपर्स लिहिले व देशभरच्या परिवहन संमेलनात सादर केले.
- १९९३ मध्ये ‘मुंबई मेट्रो’चा सुधारीत प्रस्ताव सादर करून देशभर सादरीकरणाची झंझावाती मोहीम हाती घेतली. यावेळी मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिके यात मेट्रोवर चौफेर लेखन केले. याच वेळी नवी दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या ईष्येने पेटून निघाली व त्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाची मोर्चेबांधणी सुरू केली.
- १९९८ मध्ये विश्वबँकेने मोकाशी यांची दिल्ली-वॉशिंग्टनला ‘परिवहन विशेषज्ञ’ म्हणून नेमणूक केली. तेथे चार वर्षे काम केले. त्यानंतर अफगाणिस्थान, एथिओपिया, येमेन व झांझीबारमध्ये विविध परिवहन प्रकल्पाचे नेतृत्व केले.
Leave a Reply