नवीन लेखन...

झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले. झांझीबारची डालाडाला जन्मतःच ‘खाजगी’ क्षेत्रातली ही शुभवार्ता खरी. तसे झांझीबारवासीय मुंबईकरांसारखेच. त्यांना आपल्या बससेवेचा कोण अभिमान!

अगदी भल्या पहाटे जवळच्या खेड्यातून डालाडाला झांझीबारच्या दिशेने निघते. सुरूवातीला थोडेफार प्रवासी असतात. पण पुढे एक एक करत बस गच्च भरते. गर्दीत दररोजचे दोस्त लोक भेटतात. मग गप्पाष्टके लगेच चालू. ‘‘अरे यार, कालची फूटबॉल मॅच काय रंगली!- ‘‘. खरं तर ती झांझीबारला नाही किंवा दारेसालामलाही झालेली नसते. ‘क्विन्स पार्क रेंजर’ आणि ‘मॅंचेस्टर युनायटेड’ मधली मॅच इंग्लंडमधल्या कुठल्यातरी मैदानात झालेली असते. पण प्रवासी कसे ती आपल्याच गावात झाल्याच्या आवेशात रंगवून सांगत असतात. जगातल्या सर्वच शहरातली माणसे शहरी रस्सीखेचीत एकमेकांपासून दूर फरफटत चालली. बससेवा शेकडो-हजारो लोकांना दिवसातले काही मिनिटे तरी जवळ आणते. मैत्रीसाठी आणि गप्पांसाठी सर्वजण हपापलेले असतात.


डालाडाला प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात. वेग पण भन्नाट असतो-कधी कधी भीतीदायक सुध्दा. बहुतेक डालाडाला ‘टोयोटो डायना’ या ट्रकगाड्या रूपांतरीत आहेत. बाकांच्या रचनेमुळे प्रवासी थेट एकमेकांसमोर बसतात. झोडपणार्‍या सरीपासून बचाव करण्यासाठी ताडपत्री लावलेल्या असतात, पण गाडीच्या मागे वाहन-मालकाच्या काव्य-प्रतिभेचे भरभरून सादरीकरण असते, जसे भारतातले ‘ओके हॉर्न टाटा’ किंवा ‘देखो लेकिन प्यारसे’, किवा ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’.

डालाडाला बसगाड्या, थांबे, बसतळ जुने होत आहेत. नूतनीकरण खाजगी संस्थांना जवळ जवळ अशक्य आहे. बस अपघात वाढतच आहेत. पण व्यवस्थापनात सगळा ‘आनंदी आनंद’ आहे. कारण बरचसे बसमालक कायद्यांना जुमानत नाहीत. प्रवासी मागणी-पुरवठ्यानुसार बसभाड्यात खुशाल मनमानी चालवतात. जसे गर्दीच्या मार्गावर जास्त भाडे व इतर मार्गावर कमी दर. आता शहरात मोटारगाड्या दरसाल सोळा टक्क्यांनी वाढत आहेत. म्हणजे रस्त्यावरची वाहन गर्दी वाढणार. मग प्रवासी स्वतःच्या गाड्या विकत घेणार. हे दुष्टचक्र चालू होणार.

पण सोप्या शब्दात सांगितले. (अ) परिवहन क्षेत्राचे धोरण व संस्था-संघटन चोख पाहिजे. परिवहन निगडीत इतर संस्थांबरोबर संवाद व एकवाक्यता हवी, (ब) अर्थ नियोजन भरवशाचे पाहिजे. पैशाचे सोंग घ्यायला कुणाला जमले? (क) कायदेविषयक त्रुटी नष्ट व्हायला पाहिजेत. (ड) खुद्द परिवहन संस्थेमधील अधिकार्‍यांचे ज्ञान-अनुभव अद्ययावत असणे जरूरीचे आहे. त्यांच्याजवळ नवे ज्ञान अवगत करून घेण्याची पात्रता असायला हवी. (इ) संस्थार्गत व्यवहारात आचरण-शुचिता असावी म्हणजे पात्रता असणार्‍या कंत्राटदाराचीच दरवेळी निवड होईल. हे थोडक्यात झाले बससेवेचे पंचप्राण. दुष्टचक्र तोडण्यासाठी बससंस्थांचे ‘बळकटीकरण’ झाले पाहिजे.

भारतीय शहरातल्या बससेवेच्या व डालाडाला सेवेत तसा थोडाफार सारखेपणा व फरक शोधल्यावर बरेच मिळतील. पण सर्वात जास्त सारखेपणा हा दोन्ही देशात अलिकडे तयार झालेले विकास आराखडे व त्यात आलेले यशापयश यामध्ये आहे. यातून विकसनशील राष्ट्रात सध्या चालू झालेल्या बस पुनरूज्जीवनाच्या अपयशाची खरी कहाणी समोर येत.

मग विचार करायला लावणारी बाब म्हणजे ढासळणार्‍या बससेवेला जबाबदार कोण? प्रवासी बसकंपनी का सर्वच शहरात कमकुवत होत चाललेले नागरी व्यवस्थापन? मग ही परिस्थिती बदलता येईल? आता तज्ज्ञांना खात्री पटली आहे की यासाठी बसमार्गांचे रस्ते व बसगाड्यांच्या पलिकडे जाऊन विचार केला तर किती असंख्य बाबी या बस-सेवेशी निगडीत आहेत. अगदी मूळ मुद्याशी जाऊन विचार केल्यावर आठवा, ‘शहरात सार्वजनिक वाहन प्राधान्य दिले पाहिजे ‘असे आपण नुसते म्हणतो. पण फार काही करत नाही. शहरातल्या सर्व सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी एकाच संस्थेकडे सोपवलेली नाही. दुर्घटना घडली तर जबाबदारी कुणाची? ‘खाजगी संस्थेकडे सार्वजनिक वाहतूक द्या’. हे बहुतेकांचे म्हणणे. पण झांझीबारच्या बाबतीत ते केव्हाच घडले. मग पुढे काय?

बस व्यवस्थेतील ‘गुंतागुंत रेखाचित्र’

एका हुशार परिवहन चमूने ‘सिस्टिम्स एंजिनिअरींग अॅन्ड सायबरनॅटिक्स’ या तंत्राचा उपयोग करून बस व्यवस्थेतील गुंतागुंतीचे यशस्वीरित्या रेखाचित्र तयार केले. खालील स्पष्टीकरणावरून ठळक घटक (कंसात दर्शविलेले) परस्पराशी कसे गुंतलेले आहेत हे स्पष्ट होते. ही जणू आहे, शहरी बस-व्यवस्थेची क्ष-किरण प्रतिमा!

वरील आकृतीतल्या कोणत्याही एका साखळीचा बाणांनी दर्शविलेला मार्ग अवलंबून बस संस्थेला भेडसावणार्‍या परस्परावलंबतेची कल्पना येते. उदाहरणार्थ, बस सेवा (बस संस्था) परिस्थितीप्रमाणे समयानुसार खाजगीकरणाचा (कंत्राटी सवलतदार) निर्णय घेते. यामुळे सेवेची परिणामकारकता (फेर्‍यांची वारंवारता किंवा ‘फ्रिक्वेन्सी’) ठरते. यावर उपभोक्त्यांचा सहभाग (गर्दी) अवलंबून असतो. त्यामुळे इंधनाचा प्रभावी उपयोग (इंधनक्षमता) ठरतो. त्यामुळे सेवेचा अर्थव्यय (खर्च) ठरतो. त्यानुसार तिकिट शुल्क (प्रवास भाडे) ठरले जाते आणि यावर सेवेची (बस संस्था) यशस्विता अवलंबून असते. सारांश, या साखळीमुळे लक्षात येते, बस संस्थेच्या व्यवस्थापनावर खाजगीकरणाचा महत्त्वाचा प्रभाव पडत प्रवाशांच्या गर्दीवर कमी जास्त प्रभाव पडतो.खर्‍या कार्यक्षमतेमुळे तो दर ताशी होणार्‍या बस फेर्‍यांतून दिसतो. त्याचा बससंस्थेला होणार्‍या खर्चावर प्रभाव असतो व त्यामुळे प्रवास भाड्याच्या शुल्कावर प्रभाव पडतो. अशा प्रकारे बससेवेची क्षमता साकार होते.

या एका साखळीमुळे फार काही नवीन कळले असे वाटण्याचे कारण नाही. पण या साखळीतली (इंधनक्षमता, बससेवेचा खर्च, प्रवास भाडे) हे अन्य लांब साखळ्यांतले महत्त्वाचे दुवे आहेत व त्या साखळ्याही समजावून घेता येतात. समावेशक माहिती बस संस्थेच्या नियोजनासाठी महत्त्वाची ठरते. खास म्हणजे, महापालिका, पोलिस, कंत्राटदार या सर्वांच्या सहभागाने सुलभ होते. त्यामुळे पृथक्करणाला वेगळीच पारदर्शकता प्राप्त होते. असे पृथक्करण सर्वच शहरी परिवहन व्यवस्थापनासाठीही तयार आहे. हे नुसते पुस्तकी उपदेश-पारायण नाही. महत्त्वाच्या घटकांमधील परस्परावलंब म्हणजेच व्यवस्थापनातील गुंतागुंतीचे जंजाळ सोडविण्याचा हा शास्त्रीय व पारदर्शक प्रयत्न आहे. या साखळी रेखाकृतीचा खरा उपयोग म्हणजे प्रथमतः ही गुंतागुंत व्यवस्थापनाने लक्षात घेतली पाहिजे व प्रत्येक साखळीचा समाचार घेत गुंतागुंत सोडविली पाहिजे.

खरं म्हणजे जगात असे कितीतरी प्रतिभावंत अंमलदार आहेत. त्यांना हे ‘गुंतागुंत रेखाचित्र’ प्रत्यक्षात न काढता बससेवेतल्या गुंतागुंतीतले घटक व त्यांचे परस्परावलंबन स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे व बुध्दीमत्तेमुळे समजलेला असतो. असे प्रज्ञावंत प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक देशात आढळतात. त्यांच्या यशाचा दाखला सुधारलेल्या बससेवेच्या यशामुळे लक्षात येतो.

डालाडाला बससेवेने हे केले नसले तरी ती झांझीबारमध्ये रूबाबात धावत आहे. सुधारणांची आवश्यकता आहे याची अंमलदाराना जाणीव आहे. रोजचे प्रवासी तसे खूष आहेत. मग ‘मिया बिबी राजी तो क्या करे काजी’ म्हणून सर्व समस्या त्यांच्या रेखाचित्रासकट सतरंजीखाली ढकलून दृष्टीआड ते सृष्टीआड करण्यात काय अर्थ आहे?

दरम्यान दरवर्षी थातुरमातुर सुधारणा चालू राहणार.. पहाटेच्या वेळी डालाडाला हजर होणार, प्रवासी बसणार, गप्पाष्टके रंगणार व झांझीबारकर ‘जो भी प्यारसे मिला हम उसीके हो लिए’ मानत राहणार. पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलदारांना सध्याच्या सुधारणा म्हणजे वरवरची रंगरंगोटी आहे याची जाणीव झाली आहे.

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.

त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..