काल दुपारी दोनच्या सुमारास झी टीव्ही च्या दोन वेगवेगळ्या चॅनेल्सने अगोचरपणा केला. एकाचवेळी एकाच थीम वर आधारीत दोन चित्रपट सुरु केले. एका चॅनेलवर ” मेहबुबा “- खन्ना आणि हेमा वाला ! पुनर्जन्म या रेघेभोवती. ” मधुमती ” किंवा गेला बाजार “कर्ज ” या थीमवरचे अधिक चांगले प्रकार. आणि शेजारच्या चॅनेलवर ” कुदरत “. पुन्हा खन्ना + हेमा. थीम तीच. परीघावरील मंडळी तीच – आरडी , किशोर, लता ! चित्रपटाचे सोने करायला ही तीन नांवे पुरेशी. माझ्यासारख्याला भाम्बवायला झाले.
पण “मेहबुबा ” ने बाजी मारली. खन्नाला भूतकाळ आठवून द्यायला हेमाने शिवरंजनीच्या आलापीचा दर्दभरा स्वर घेतला- ” मेरे नयना सावन-भादो ! ”
अरे, हा श्वेत वस्त्रधारी स्वर तर आत्ता आत्ता- ६ फेब्रुवारीला तिरंग्यात लपेटून निघून गेला होता. ” अवघेचि झाले देहब्रह्म ” असा सांगावा सांगत ! मग काल आगंतुकासारखा कसं म्हणू , कारण त्यानेच तर पदोपदी भरण -पोषण केलंय, सुसंस्कृत केलंय. पण धटिंगणासारखा नक्कीच माझ्या घरात घुसला. दोन आठवडे जपलेलं पथ्य ( व्यक्त न होण्याचं ) मोडायला लावलं. आणि खूप वेळ मी त्यांत हरवून गेलो.
मग आज सकाळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सहज गेलो. तेथे रिसेप्शन मध्ये स्वरस्मृती जागताहेत असं कानी आलं होतं. ” विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ” माऊलींच्या मनी ते दृगोच्चर झाले आणि आमच्या आर्त विश्वात ते स्वरांच्या रूपात नभाकार झाले . हॉस्पिटलमध्येही तोच स्वर ” दिसला”. काल कानात होता आज नजरेत !
बर्मनदा,नूरजहाँ आणि कोणाकोणाबरोबरची चलतचित्रे त्याच श्वेत वस्त्रासमवेतची- भावमुद्रा विविध असल्या तरी निर्व्याज, काहीही न मागणारे निखळ स्मित तेच.
डोळ्यातल्या पाण्याने ती चित्रं पुसट होण्याच्या आत मी हॉस्पिटलमधून निघालो.
६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी – तो स्वर असण्या-नसण्याची ही दिनदर्शिका !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply