पत्रकार, संपादक, कवी, पटकथाकार, अभिनेता, गीतकार, व झी चॅनलचे संपादक विजय कुवळेकर यांचा जन्म २२ जानेवारी १९५२ रोजी झाला.
विजय कुवळेकर यांनी सकाळ, लोकमत यांसारख्या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले असून, त्यांनी ‘झी मराठी दिशा’ या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणून काम केले आहे. ते राज्याचे माहिती आयुक्त राहिले आहेत. ते अभ्यासू वक्ते, लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
विजय कुवळेकरांचे वडील डॉक्टर. त्यांचा भाऊही डॉक्टरच. साहजिकच धाकट्या मुलाने डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा, नव्हे धाकच. त्यांनी मुलाला पर्याय दिला, ‘डॉक्टर हो, नाहीतर घर सोड.’अशा रितीने विजय कुवळेकर रीतसर घराबाहेर पडले !
त्यांनी पहिली लावणी दहावीत असताना लिहिली होती. त्यांच्या एका शिक्षकाने सांगितले, असलं काही लिहिण्यापेक्षा काहितरी चांगलं लिही. त्यावेळी कुवळेकर कोल्हापुरात होते. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत टायपिंग क्लासचे प्रमूख, व कब्बडी संघाचे मुख्य ! त्यांच्या संपर्कात आल्यावर कुवळेकरांनी महाभारतातील कर्णावर सत्तर कविता लिहिल्या…. विजय कुवळेकर एका मुलाखतीत इंदिरा संत यांच्या बद्दल म्हणतात.
मी सकाळ मध्ये नोकरी करत असताना कवयत्री इंदिरा संत यांना गद्य लेख लिहिण्याची लेखी विनंती केली. त्यानुसार इंदिराबाईंनी सहा लेख पाठवले. पण त्यातला एकही लेख मला पसंद पडला नाही. पण तसे त्यांना न कळवता मी मोठ्या खुबीने कळवले, की ‘आपला अमुक लेख चांगला आहे, पण त्यात हे वाढवा, हे बदला..’ वगैरे. त्याला इंदिराबाईंचे उत्तर आले की,‘ आपली लेख न आवडले हे सांगण्याची हातोटी मला अतोनात आवडली. मी हे सहा लेख परत लिहून पाठवत आहे. ’ त्यातही मी सुधारणा सुचवल्या ! बाईंची मोठेपण असे, की त्यांनी प्रत्येक लेख जवळपास सहा वेळा लिहिला !
आणि मग पुढे वर्षभर इंदिराबाईंचा लेखातला एक शब्दही बदलावा लागला नाही.
विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन यासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘पैलू’साठी राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. बडोद्यात २०१४ मध्ये झालेल्या २६व्या सावरकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. संवाद (भाग १ आणि २), झुंबर, शिवार, अर्घ्य असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
विजय कुवळेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply