नवीन लेखन...

शून्य कचरा परिसर !

Zero Garbage Project at Vijaynagar society, Andheri, Mumbai

सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण करतांना मुंबई महानगर पालिकेचा त्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. मुळातून कचराच कसा कमी करता येईल आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा ठेवता येईल हे बघताना आपल्या हातून पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा व स्वास्थाचा विचार करणे येणाऱ्या काळात अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

असो. मागच्या महिन्यात आकाशवाणी, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर सकाळी साडेसहा वाजता ‘परिसर’ या परीयावरण रक्षणाच्या कार्यक्रमात अंधेरीच्या विजयनगर सोसायटीत राहणारे श्री महेश आठल्ये यांची ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ या विषयावरील मुलाखत ऐकत होतो. मुलाखती दरम्यान त्यांनी वरील विषयाची उपयुक्त आणि चांगली माहिती सांगितली. अंधेरीच्या विजयनगर गृहसंकुलात जाऊन त्यांचा ‘शून्य कचरा परिसर’ या संबंधित सोसायटी राबवीत असलेल्या प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तो पुढे देत आहे.

१) तुम्हांला ‘शून्य कचरा परिसर’ या प्रकल्पाबद्दल कल्पना कशी सुचली? आणि त्यासाठी तुम्हीं कोणाचे मार्गदर्शन घेतलेत का?
p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-02“पूर्वी विजयनगरच्या दारात दोन कचराकुंड्या होत्या त्यामुळे सोसायटीत प्रवेश करतानाच त्याच्या दुर्गंधीने रहिवासी हैराण होत. विजयनगरचा पूर्ण विकास झाल्यापासून ह्या कचरा कुंड्या हलवाव्यात असे वाटत होते. त्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे किती गरजेचे आहे ते सांगितले. कचराकुंड्या हलवण्यापेक्षा मुळात कचराच संपवून टाकला तर हा प्रश्न उभा राहणार नाही हे लक्षात आले. त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे व त्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी करायची यासाठी पार्ल्यातील ‘देवांगिनी’ सोसायटीच्या कार्यकर्त्यांशी तसेच घरगुती कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांशीही बोलणी केली. पद्मश्री डॉ.शरद काळे, बीएआरसी तसेच `स्त्रीमुक्ती संघटने’च्या रश्मी जोशी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मदतीने रोजच्या व मासिक कचऱ्याचा अंदाज घेतला. त्यासाठी साधारणपणे खर्च किती येईल? जागा किती लागेल. यांचा अंदाज घेऊन आम्हीं सर्व कामाला लागलो”

२) आपल्या सोसायटीत राहणाऱ्या सभासदांच्यात ‘शून्य कचरा व्यवस्थापनाबद्दल’ची जागृती कशी केलीत? आणि त्यासाठी तुम्हाला काय बदल करावे लागले?p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-05
“आमच्या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाश्यांत ‘शून्य कचरा व्यवस्थापना’ संबंधित जागृती यावी म्हणून घरोघरी जाऊन गटागटाने प्रत्येकाला सुका व ओला कचरा वेळा करण्याच्या पद्धती समजावल्या. त्यासाठी संकुलातील मुलांचे पथनाट्य सादर करून सोसायटीत जनजागृतीसाठी प्रयोग केले. घरटी प्रत्येकी एक अश्या सुका कचरा टाकण्यासाठी ठराविक रंगाच्या डस्टबीन दिल्या. त्यावर फ्लॅट नंबरचे स्टिकर्स लावले ज्यामुळे कोणाकडून कचरा वर्गीकरणानुसार येत नाही हे सहज कळावे. तसेच वर्गीकरणात सुसूत्रता राहावी म्हणून ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे चित्रांसकट चार्ट बनवून ते घरोघरी वाटले व ते सगळ्यांच्या दृष्टीक्षेपात येतील असे लावले. यामुळे लोकांच्या मनातील गोंधळ कमी झाला”

३) प्रत्यक्ष कामाला सुरवात करताना प्रथम काय केलेत?
“आपल्याला किती कचरा-हौद लागतील यांचा अंदाज घेऊन ६ फुट लांब, ४ फुट रुंद, २ फुट उंच असे १२ हौद बांधून घेतले. प्राण्यांपासून संरक्षणासाठी वरून जाळी लावली, हवा खेळती राहावी म्हणून पाईप्स लावले, त्यातील अधिकचे पाणी निघून जाण्यासाठी भोके पाडून घेतली त्याचप्रमाणे ते साचून काही दुर्गंधी राहू नये म्हणून पन्हळ करून त्याला वाट करून दिली. जवळच पाण्याचे कनेक्शन घेतले, ज्यामुळे स्वच्छता राखणे सोपे गेले. नैसर्गिकरीत्या खताची प्रक्रिया चालू असताना डायरेक्ट ऊन लागू नये आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी हौदात पडूनये म्हणून त्यावर छप्पर बांधले”

४) संकुलातील प्रत्येक बिल्डींग मधला कचरा गोळा केल्यावर त्याचे पुढे काय होते?
p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-04“प्रत्येक बिल्डींग मधील ओला कचरा एका मोठया प्लास्टिकच्या पिशवीत गोळा केला जातो आणि तो बिल्डींग जवळील हौदाच्या जवळ ठेवला जातो. मग स्त्रीमुक्ती संघटनेतील स्त्रियांकडून तो हौदात ओतण्याआधी ओल्या कचऱ्याची तपासणी करून परत एकदा सेग्रीगेशन केले जाते व नंतर हा कचरा हौदात टाकला जातो. त्यात जीविका द्रव्य आणि मॅजिक पावडर मिसळली जाते जेणेकरून कचऱ्याचे विघटन होते आणि त्याचा आम्ल गुण कमी होतो. शिवाय दुर्गंधीही येत नाही. योग्य प्रमाणात पाणी घालून तो रोज खालीवर केला जातो. तसेच कचऱ्यापासून खत बनल्यावर ते गच्चीत वाळत ठेवले जाते. ही सर्व कामे त्या करतात. त्यांना हातमोजे, गमबूट, सोल्युशन, मॅजिक पावडर आदि वस्तू सोसायटीतर्फे पुरविल्या जातात.

५) सभासदांना दरडोई किती भार उचलावा लागतो? त्यापासून त्यांना काय मिळते?
आमच्या १४ बिल्डींग्ज मिळून एकूण ५०० सभासद संख्या आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च प्रति महिना प्रत्येक सभासदापाठी अंदाजे रु.७०/- पेक्षा कमी येतो ज्यात हौदाची देखभाल, स्त्रीमुक्ती महिलांचा पगार वगैरे धरून. पण याहीपेक्षा आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसणे महत्वाचे नाही का? जर एवढ्या क्षुल्लक खर्चात आपण आपल्या स्वत:ची, सभासदांच्या आरोग्याची काळजी आणि महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करून आदरणीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत योजनेला हातभार लावतो आहोत याचे मानसिक समाधान नाही का? समाधानाची तुलना पैश्यात होऊ शकत नाही. तसेच विजयनगरच्या प्रत्येक सभासदानी या प्रकल्पात खारीचा वाटा उचलून ‘शून्य कचरा परिसर’ योजना पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला. असा निर्धार मुंबईतील सर्व नागरिकांनी केल्यास आपली मुंबई नक्की हरित आणि सुंदर होईल यात शंकाच नाही.

६) खत किती दिवसात तयार होते, किती आणि काही आर्थिक फायदा होतो का?
p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-01प्रथमतः खताची पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन महिने लागले, मात्र पुढचे खत एका महिन्याच्या आत तयार होऊ लागले. खताला RCF चे प्रमाणपत्रही मिळाले आहे. ‘हरित वसुंधरा सेंद्रिय खत’ या नावाने आज दर महिना ४००/५०० किलो खत बनते. गच्चीत वाळत टाकलेले खत सुकले की ते मोठया मिक्सर मधून बारीक केले जाते. तयार झालेले खत सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या लहान मोठया झाडांना घालून उरलेल्या खताच्या विक्रीतून सोसायटीला अंदाजे सरासरी दरमहा साडेचार ते पाच हजाराचे उत्पन्न मिळते.

७) कचऱ्याचे वर्गीकरण कसे होते?p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-06

विजयनगर सहनिवासात कचऱ्याचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते :
१) ओला कचरा दिवसाला १०० किलो (अंदाजे) गुणिले ३० दिवस म्हणजे महिन्याला ३००० किलो. (ह्यापासून खत निर्मिती केली जाते.)
२) सुका कचरा दिवसाला १५० किलो अंदाजे गुणिले ३० दिवस म्हणजे ४५०० किलो. (हा पुनर्निर्मितीसाठी पाठवला जातो.) सुका कचरा आकार या संस्थेचे कार्यकर्ते घेऊन जातात. सध्यातरी सोसायटी त्यांच्याकडून पैसे घेत नाही.
३) इतर कचरा दिवसाला ४० किलो अंदाजे गुणिले ३० दिवस म्हणजे महिन्याला १२०० किलो. (हा महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर पाठवला जातो.)
इतर कचर्‍यामध्ये सॅनिटरी नॅपकीन्स, डायपर्स, नागरिकांनी ओल्या कचऱ्यात टाकलेल्या पिशव्या, डबे इत्यादि गोष्टी डम्पिंग ग्राउंडवर पाठवाव्या लागतात.

८) मुंबई महानगरपालिकेला तुमच्या सोसायटीमधून कचरा न उचलल्यामुळे पालिकेचा किती खर्च वाचतो?
p-20923-Zero-Garbage-Vijaynagar-Society-07प्रति वर्षी अंदाजे ९०,००० किलो कचरा डम्पिंग ग्राउंडवर जायचा वाचतो. मुंबई महानगरपालिकेला एक किलो कचरा उचलण्यासाठी अंदाजे रु.८/- इतका खर्च मानल्यास ९०,००० किलो प्रतिवर्षी गुणिले रु.८/- बरोबर ७ लाख २० हजार रुपये खर्च होतात ते वाचतील. हा अंदाज फक्त एका सोसायटीचा तर संपूर्ण मुंबईच्या कचऱ्यातून किती पैसे वाचतील? आणि मुख्य म्हणजे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.

९) तुमच्या सोसायटीला याचा भविष्यात काही आर्थिक फायदा मिळणार आहे का?
विजयनगर सोसायटी पुढील काळात मुंबई महानगरपालिकेला वरील सर्व गोष्टी सप्रमाण पटवून देऊन मालमत्ता करात सवलत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत हा सुद्धा एक आर्थिक फायदाच आहे.

१०) मुंबईत प्रकल्प राबविण्यासाठी इतर सोसायटीजना आपली टीम कशी मदत करू शकते?
काही गृह संकुलात जागेअभावी हा प्रोजेक्ट राबविण्यास अडचणी निर्माण झाल्यास एकाच विभागातील ८ ते १० इमारतींनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट राबविणे शक्य आहे. अशी उदाहरणे पुण्यात आहेत. अश्या प्रकल्पासाठी लागणारे मार्गदर्शन विनामुल्य द्यायला विजयनगर मधील कार्यकर्त्यांची तयारी आहे. कोणाला जर संपर्क साधावयाचा असल्यास त्यांच्या माहितीसाठी कार्यकर्त्यांची नावं, मोबाईल आणि ई-मेल आहेत.

महेश आठल्ये : मोबाईल ९८९२३३९४०० किंवा ९८३३९७६००३ आणि इ-मेल mahesh.athalye@crisil.com

वर्षा बापट : मोबाईल ९८२१६९६०९८ आणि इ-मेल varshavbapat@gmail.com

सुकृता पेठे : मोबाईल ९९६७३६३१७६ आणि इ-मेल sukrutapethe@gmail.com

११) प्रकल्पाबद्दल अधिक काय सांगाल?
प्रकल्पाची सुरुवात १ जानेवारी, २०१५ ला झाली. अजून आम्हीं शिकत आहोत. सोसायटीतल्या सभासदांची इच्छाशक्ती, सहकार्य आणि मेहनतीमुळे आज आम्हीं या टप्प्यावर पोहोचलो आहोत. अजून बरेच करायचे बाकी आहे.

या प्रकल्पाबाबत जागृकता अल्प प्रमाणातच आहे असे म्हणावे लागेल कारण अजूनही सोसायटीच्या पातळीवर सामुदायिक प्रयत्न होताना दिसत नाहीत तसेच वैयक्तिक प्रकल्पांची संख्याही फारच थोडी आहे. विजयनगर प्रमाणेच आपल्या सर्वांनी आपापल्या इमारतींमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

‘शून्य कचरा परिसर’ ठेवण्यासाठी विचार करणार ना? ‘शून्य कचरा व्यवस्थापनाने’ आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहीलच पण मुंबई महानगरपालिकेचा होणारा अवास्तव खर्च वाचून नागरिकांच्या आरोग्याचा आणि घनकचऱ्याचा प्रश्नही कायमचा सुटेल !

जगदीश पटवर्धन, दादर

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

3 Comments on शून्य कचरा परिसर !

  1. श्री. कोळवणकर,

    आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपण राबवत असलेल्या उपक्रमातूनही आम्ही प्रेरणा घेतली. परंतु आपल्या काही मुद्द्यांमुळे विजयनगर येथील प्रकल्पाविषयी गैरसमजुत होऊ नये म्हणून काही facts येथे देत आहे.
    १. मुळात आमची पद्धत चांगली की दुसरी पद्धत चांगली अशी स्पर्धा येथे नाहीच आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणीही उचललेली योग्य पावले ही स्वागतार्ह आणि स्तुत्यच आहेत.
    २. जिथे सभासद जास्त असतात अशा सहनिवासात असे सामाजिक लाभाचे प्रकल्प राबवणे कठीण असते. ह्या पार्श्वभुमीवर विजयनगर येथील शुन्य कचरा प्रकल्पाची यशस्वी पावले इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरू शकतील.
    ३. आमच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची उर्जा वापरली जात नाही. किंबहुना अशी उर्जा वापरुच नये असा पद्मश्री डॉ. शरद काळे सरांचा आग्रह असतो.
    ४. आपण आपल्या सोसायटीमध्ये खत बनवण्यासाठी ३० सभासदांसाठी जेवढी जागा वापरली आहे त्याचप्रमाणात आम्ही ५१५ सभासदांसाठी वापरली आहे. क्षेत्रफळ बघितले तर आमचे सभासद १७ पट जास्त असले तरी आपल्यापेक्षा जेमतेम ९ ते१० पट जास्त जागा वापरली आहे.
    ५. तसेच हे काम करण्यासाठी जसे आपण नेहमीचा कचरा घेऊन जाणाऱ्या सफाई कामगारांची मदत घेता त्याचप्रमाणे केवळ ३ परिसर भगिनी दररोज १२५ ते १५० किलो कचरा कंपोस्ट पिटमध्ये टाकून ढवळण्याचे काम करतात. यामुळे स्त्रीमुक्ती संघटनेने कचरा वेचक महीलांना रोजगार मिळवून दिला आहे. तरीही प्रतिसभासद केवळ ६० ते ७० रुपये प्रति महिना ही रक्कम फारच किरकोळ आहे.
    ६. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या खत बनविण्याच्या नैसर्गिक पद्धतीत फक्त precooked food म्हणजे कच्चा भाजीपालाच नाही तर उरलेले, खराब झालेले तसेच खरकटे अन्नही खतामध्ये रुपांतरीत केले जाते. अन्य अनेक पद्धतींमध्ये असा कचरा बाहेर टाकला जातो.
    ७. पिटस् न बांधता हे सर्व मोठ्या ड्रमस् मध्ये सुद्धा करू शकतो.
    हे सर्व सांगण्याचा एकच उद्देश की छोट्या सोसायट्यांमध्ये सुद्धा ही पद्धत अवलंबणे कठीण नाही. नागरिकांनी आपापल्या क्षमतेचा अभ्यास करून पद्धत ठरवावी पण पर्यावरण ऱ्हासाची धोक्याची घंटा ऐकून सर्वांनी असे प्रकल्प राबवणे ही काळाची गरज आहे.

    धन्यवाद.
    सुकृता पेठे
    विजयनगर सहनिवास
    अंधेरी (पूर्व)

  2. शून्य कचरा मोहीमेबद्दल आपण घेतलेली मुलाखत वाचली. कचऱ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक सोसायटीने अश्या तऱ्हेचे प्रकल्प राबविणे गरजेचेच नव्हे तर आवश्यक झाले आहे. मुलाखतीमध्ये देवांगिनी सोसायटीचा उल्लेख आला आहेच. आमच्या येथे सदर प्रकल्प गेली तीन वर्ष यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. विजयनगरमधील कार्यकर्तांनी सदर प्रकल्प पहिला व त्यांच्या विनंतीनुसार आम्ही तेथे जाऊन आमच्या प्रकल्पाचे PPP द्वारा सादरीकरणही केले होते.
    मुंबई सारख्या शहरात विजयनगर सारख्या मोठ्या सोसायट्या फारच कमी आहेत जेथे त्यांची स्वतःहाची ऐसपैस जागा आहे. किंबहुना २५-३० सभासदांच्या, वापरावयास अत्यंत छोटे आवर असलेल्या सोसायट्यांची संख्या खुपच मोठी आहे व अश्या ठिकाणी आमच्या येथे राबविला जात असलेला प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल असे आम्हाला वाटते. आम्ही राबवित असलेल्या प्रकल्पामध्ये वेगळ्या जागेची आवश्यकता लागत नाही. प्रकल्प उभा करण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो. प्रकल्प राबविण्यासाठी वेगळे मनुष्यबळ लागत नाही. कुशल कामगाराची आवश्कताही लागत नाही. प्रकल्प राबविण्यात कुठलीही उर्जा खर्च होत नाही व उत्कृष्ठ प्रतीचे गांडूळखत ओल्या कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. सदर प्रकल्प पाहण्यासाठी कित्येक संस्था भेट देत असतात. आम्ही उत्सुक संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी भेटी देत असतो व यातून प्रेरणा घेऊन सबंध पार्लेमध्ये असे प्रकल्प राबविण्यासाठी एका ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.
    छोट्या उत्सुक सोसायट्यासाठी एक आदर्श उदाहरण म्हणून आमच्या सोसायटीच्या उल्लेख करता येईल ज्यातून अनेक रहिवाशी प्रेरणा घेऊ शकतील.

    Satish Kolvankar
    satishkolvankar@gmail.com
    https://www.facebook.com/Devangini-Nisarga-Mandal-1464008310530022/

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..