![p-44145-ZOHRA_SEHGAL-300](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/12/p-44145-ZOHRA_SEHGAL-300.jpg)
काही काही माणसं बहूदा जन्मताच बंडखोर असतात. सर्वमान्य प्रचलीत रिती परंपंरा वा चौकटीबद्ध आचरण त्यांच्या स्वभावातच नसते. लोक काहीही म्हणोत ते आपला मार्ग सोडत नाहीत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत तर असे आभावानेच आढळते. विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या रूढीवादी कुटूंबात जर असे कोणी वागत असेल तर महा कठीण…..उत्तर प्रदेशातील साहिबज़ादी ज़ोहरा बेगम मुमताज़ उल्लाह खान हीचा जन्म झाला तोच मुळी कट्टर रूढी परंपंरा पाळणाऱ्या मुस्लिम घरात. एकूण सात अपत्यातील ती तिसरी. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी एका डोळ्यात मोती बिंदू झाला आणि डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. घरात परदा पद्धत अत्यंत कडक. मोजकेच पुरूष स्त्रियांशी बोलू शकत. स्वभाव जन्मत:च विद्रोही त्यात मोठ्या बहिणाचा अशयस्वी विवाह बघून तिने निश्चय केला की लग्ना सारख्या फालतू भानगडीत न पडता फक्त करीअर करायचे.
आई तरूणपणीच गेल्या नंतर आईच्या नात्यातील काका तिला युरोपला घेऊन गेले. तिथे तिच्या काकूने “मॅरी विगमॅन्स” यांच्या बॅले नृत्य संस्थेत नांव नोंदवले. या संस्थेत प्रवेश मिळवणारी ती पहिला भारतीय ठरली. पूढे भारतातील युरोपच्या दौऱ्यावर आलेल्या उदय शंकर यांच्या बॅलेचा कार्यक्रम तिच्या बघण्यात आला आणि तिने निश्चय केला बस्स….आता नृत्यातच करीअर करायचे आणि ती उदय शंकर यांच्या ग्रूपमध्ये सामील झाली. १९३५ ते ४० या काळात ती उदय शंकरच्या ग्रूप मधील महत्वाची नर्तिका होती व विदेशी दौरे गाजवत होती. १९४० ला उदय शंकर परत भारतात आले व जोहरा त्यांच्या ग्रूप मधील नृत्य शिक्षिका म्हणून काम बघू लागली. याच ठिकाणी तिला कामेश्वर सेगल हा तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान असलेला शास्त्रज्ञ, चित्रकार आणि नृत्यकार तरूण भेटला जो नंतर तिचा पती झाला. भारतात यावेळी तिची धाकटी बहिण अझरा बट्ट पृथ्वी थिएटर मध्ये सामील झालेली होती. पृथ्वीराज कपूरची ही संस्था त्या काळी एक मात्तब्बर नाटक संस्था होती. मग जोहराही त्यात ४०० रूपये प्रतिमाह वेतनावर अभिनेत्री म्हणून रूजू झाली.
इप्टा या संस्थेच्या “धरती के लाल” या चित्रपटा पासून जोहरा सैगलचा चित्रपट प्रवास सुरू झाला पण नाटक हे तिचे पहिले प्रेम. देव आनंदच्या “बाजी” चित्रपटात ती नृत्य दिग्दर्शीका होती तर तर राजकपूरच्या “आवारा” मधील सूप्रसिद्ध स्वप्न गीत घर आया मेरा परदेसी….याचे नृत्य दिग्दर्शन जोहराने केले. त्यावेळी तिचे पती कामेश्वर कला दिग्दर्शनात आपले नशीब अजमावत होते. १९५९ मध्ये कामेश्वर सेगल यांचे निधन झाले आणि जोहरा सेगला दिल्लीला आल्या आणि त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या नाट्य अकादमीच्या संचालक झाल्या. पूढे १९६२ मध्ये त्यांना लंडनमध्ये नाट्य अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली व त्या तिकडे गेल्या. तिथे त्यांना बीबीसी वाहिनीवर काम करतानां आपला ठसा उमटवला. बीबीसीच्या २६ एपिसोडच्या त्या मूख्य निवेदिका होत्या.
१९८२ मध्ये त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक वळण आले. जेम्स आयव्होरी यांच्या “ज्वेल इन द क्राऊन” या चित्रपटाद्वारे त्या परत चित्रपट क्षेत्राशी जोडल्या गेल्या. तिथे अनेक चित्रपटात भूमिका करून पुन्हा १९९० च्या मध्यात भारतात परत आल्या. इथे आल्यावर नाटक, मालिका, चित्रपट, काव्य वाचन यात सतत बिझी असत. १९९६ मध्ये त्यांचा हिंदी चित्रपटातील आजीचा प्रवास सुरू झाली. नवीन पिढीला ही आजी चांगलीच ठावूक आहे. कारण ८४ वर्षांच्या या आजीचा सळसळता उत्साह तरूणींनाही लाजवेल असाच होता. दिलसे, हम दिल दे चूके सनम, वीर झारा, सावरीयाँ, चिनी कम या चित्रपटातील ही म्हातारी आठवून बघा..या वयातले तिचे हास्य, तिचे लाजणे, तिच्या नृत्याच्या स्टेप्स सर्व कसे मोहक वाटते. २००२ मधला “चलो इष्क लडाए” हा गोविंदाचा चित्रपट जोहराने स्विकारला तेव्हा ती ९० वर्षांची होती व त्यातील मध्यवर्ती भूमिकेत तिच होती. तिला कसे मारता येईल यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवणाऱ्या नातवाची भूमिका गोंविदाने केली आहे. यात जोहराने चक्क सायकल चालविली आहे आणि गुंडाशी फायटिंग पण केली आहे…..
तर अशी ही चिर तरूण जोहरा सेगल. कर्मठ मुस्लिम परीवारातील जोहराने हिंदू कामेश्वरशी लग्न करून धर्म बदलला पण नाव मात्र कधीच नाही बदलले. त्याकाळी प्रचंड विरोध असतानां हे लग्न झाले. स्वत: पंतप्रधान पं. नेहरू या लग्न सोहळ्यास हजर होते. किरण आणि पवन ही दोन मुले या दापंत्याला झाली. पैकी किरण WHO या संस्थेचे काम करतो तर पवन हा उत्कृष्ट ओडिशी नर्तक आहे. १० जुलै २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. तब्बल १०२ वर्षांचे आयुष्य जोहरा सेगल जगल्या. सहारनपूर ते अर्धे जग पालथे घालून प्रवास करत जीवनाचा मनोसोक्त आनंद घेत राहिल्या. शेवट पर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोपले नाही. त्यांच्या तरूणपणी त्या किती सुंदर होत्या माहित नाही पण नव्वदीतल्या जोहराकडे बघून मना पासून Love you & hatsoff you असेच म्हणावेसे वाटते.
दासू भगत (१० जूलै २०१७)
Leave a Reply