झुबिन मेहता यांचे वडील मेहिल हे उत्तम व्हायोलिन वादक होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९३६ रोजी झाला. त्यांनी मुंबईत बॉम्बे सिम्फनी ऑर्केस्ट्रा नावाची संस्थाही स्थापन केली होती. पारशी कुटुंबात जन्मलेल्या झुबिन मेहता यांना डॉक्टर व्हायचे होते, मुंबईच्या सेंट मेरी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्समध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण त्या वेळचे वातावरणच असे होते, की त्यांच्या वडिलांच्या संगीताच्या क्षेत्रातील कारकीर्दीच्या पावलावर पाऊल टाकून आपणही त्याच मार्गाने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. व जगाला एका श्रेष्ठ दर्जाच्या संगीतकाराची देणगी मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी व्हिएन्नामध्ये जाऊन संगीताचे शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे १९५८ मध्ये त्यांनी आपला पहिला कार्यक्रमही सादर केला. त्याच वर्षी झालेल्या म्युझिक कंडक्टर स्पर्धेत झुबिन मेहता हे जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचे विजेते ठरले. जगातल्या अनेक नामवंत म्युझिक कंडक्टर्समध्ये त्यांना अतिशय मानाचे स्थान मिळाले. त्यानंतर भारताला कायमचा रामराम ठोकला, तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व मात्र सोडलेले नाही.
झुबिन मेहता यांनी या कामात जे प्रावीण्य मिळवले, ते अतुलनीय आहे. मॉन्ट्रेयल सिम्फनी ऑर्केस्ट्रा या जगप्रसिद्ध ऑर्केस्ट्राचे म्युझिक कंडक्टर होण्याची संधी मा.झुबिन मेहता यांना वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी मिळाली. त्या पदावर ते सात वर्षे कार्यरत होते. लॉसएंजेलिस फिलहार्मनिक या संस्थेत म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांनी सोळा वर्षे काम केले आहे. इस्त्रायलच्या ‘इस्त्रायल फिलहार्मोनिक ऑर्कस्ट्रा’ची सवरेतोपरी जबाबदारी १९८१ मध्ये त्यांनी स्वीकारली. मात्र, ही जबाबदारी स्वीकारली असताना अमेरिका, युरोप खंडातील जगभरातील अनेक ऑर्केस्ट्राचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले. भारतीय संगीताची, वाद्यांची त्यांना उत्तम जाण आहे. आपल्या नादमधुर सतार वादनाने जगातील प्रत्येकाला भुरळ पाडणा-या पंडित रविशंकर यांच्याबरोबरही त्यांनी एकत्रितपणे कार्यक्रम केले. इस्त्रायलची सांगीतिक संस्कृती जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी त्यांनी ‘इस्त्रायल फिलहार्मोनिक ऑर्कस्ट्रा’च्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. त्याचीच पोचपावती म्हणूनच त्यांच्या योगदानाबद्दल इस्त्रायल सरकारने त्यांना १९९१ मध्ये इस्त्रायल पुरस्कार’ देऊन गौरवले. सध्या ते जर्मनीच्या बावेरियन स्टेट ऑर्केस्ट्राचे काम पाहत आहेत. त्यांचे ‘द स्कोअर ऑफ माय लाइफ’ हे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे. भारत सरकारने झुबिन मेहता यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply