झुणका भाकर म्हटलं की, गावची आठवण येते. लहानपणी सुट्टीत गावी गेल्यावर झुणका भाकरी खाणं व्हायचंच. ती चव शहरात काही अनुभवता आली नाही. याला कारण गावाकडील नैसर्गिक पाण्याचं वेगळंपण.
पुण्यात आल्यावर कधीतरी शहरी ‘पिठलं भाकरी’ केली जात असे. आयत्यावेळी झटपट होणारा हा जेवणाचा बेत सर्वांना आवडणारा असायचा. कष्टकरी तो पोटाची भूक भागविण्यासाठी खातात तर उच्चभ्रु ‘फॅशन’ म्हणून मोठ्या हाॅटेलातून वेटरला त्याची ऑर्डर देतात.
देहू, आळंदी, पंढरपूरची वारी करणारे वारकरी पूर्वी झुणका भाकर खाऊनच पायपीट करायचे. त्यामुळे त्यांना जी उर्जा मिळायची ती थेट पंढरपूरला पोहोचेपर्यंत पुरत असे.
पुण्यामध्ये अखिल मंडई मंडळाच्या अप्पा थोरातांनी कष्टकरींसाठी झुणका भाकर केंद्र १९ नोव्हेंबर १९७४ रोजी सुरू केले. अवघ्या पन्नास पैशांमध्ये पोटभर झुणका भाकर देणारे हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र होते. १९७२ च्या दुष्काळाची झळ कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात सोसावी लागली होती. हे केंद्र सुरू झाल्यापासून त्यांना दिलासा मिळाला. शहरातील मध्यमवर्गीय देखील तिथे जाऊन झुणका भाकरचा आस्वाद घेऊ लागले. माझे मोठे काका पुण्यात आल्यावर आवर्जून मंडईला जाऊन झुणका भाकर खाऊन येत असत. काही वर्षांनंतर मंडळाने झुणका भाकर बरोबरच पुरी भाजी, भजी, मिसळ इत्यादी पदार्थ पुरविणे चालू केले.
शिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली.
२०१९ मध्ये पुण्यामध्ये मेट्रोचं काम वेगाने सुरू झाले. त्यामुळे मंडई परिसरात मेट्रोचे स्टेशन करण्यासाठी गेले पंचेचाळीस वर्षे चालू असलेल्या केंद्राचे स्थलांतर मिनर्व्हा वाहनतळाच्या जागेत होणार आहे.
पुणे तसं चोखंदळ खवैय्यांचं शहर आहे. इथं प्रत्येक हाॅटेलची काही ना काही स्पेशालिटी असतेच. दाक्षिणात्य पदार्थांसाठी फर्ग्युसन रस्त्यावरील ‘वैशाली’ला पर्याय नाही. बनमस्कासाठी कॅफे ‘गुडलक’मध्ये बसायला नशिबानेच जागा मिळते. आपटे रोडवरील हाॅटेल ‘श्रेयस’चे सुग्रास जेवण केले नाही असा पुणेकर शोधूनही सापडणार नाही. फडतरे चौकातील ‘स्वीट होम’ची इडली सांबार खाताना जो शेव प्लेट मागवत नाही, खुशाल समजावं तो महाभाग पुण्यातला नाहीये. केसरी वाड्यासमोरील ‘प्रभा विश्रांती गृह’ या ऐतिहासिक हाॅटेलमधील ‘वडा सॅम्पल’ खाण्यासाठी वेळेत गेलं नाही तर गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडून बोलणी खावी लागतात. रविवार पेठेतील रेल्वे बुकींग शेजारील जुन्या वाड्यातील ‘वैद्य उपहार गृह’ मधील मिसळ खाण्यासाठी सकाळीच जावं लागतं. मुंजाबाच्या बोळातील ‘बेडेकर मिसळ’ साठी माल संपण्याआधी नंबर लावून बाहेर उभं रहावं लागतं. पेशवे पार्क शेजारील हाॅटेल ‘जयश्री’ हे पावभाजीच्या अफाट लोकप्रियतेतूनच टिळक रोडवर ‘जयश्री गार्डन’ स्वरुपात उभं राहिलं.
— सुरेश नावडकर.
Leave a Reply