नवीन लेखन...

झुरळाने काटा काढला! – भाग 2

दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?”

“नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने गोरेसाहेब येतील त्यांना भेटा. ते आले म्हणजे मी सांगतो तुम्हाला.” असे म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि मी आत जाऊ बसलो.

हळूहळू एक एक कर्मचारी येऊ लागला. आपापल्या जागेवर बसून हाशहुश करू लागला. सगळे पंखे, दिवे लागले. बँक गजबजू लागली. तेवढ्याच एक उंचेला, घाऱ्या डोळ्यांचा, पातळ जिवणी आणि तलवारकट मिशीचा माणूस आत शिरला. त्याची नजर भेदक, कपडे पांढरे शुभ्र आणि नाक बाकदार काहीसे पोपटासारखे होते. प्रथम दर्शनीच तो माणूस आवडण्यासारखा वाटत नव्हता. त्यानेही माझ्याकडे एक नजर टाकली. कपाळावर एक आठी पडल्याचे मला दिसले आणि झपझप जाऊन तो काऊंटर पलीकडे एका टेबलाशी जाऊन बसला. टेबलावर प्रत्येकाच्या नावाच्या पाट्या होत्या. त्यावरून हाच ‘गोरे’ हे मी जाणले.

शिवाय तो येताच झालेली सामसूम पाहून हे ‘गोरे’साहेबच असणार ही भावना पक्की झाली. बसल्या बसल्या त्याने शिपायाला हाक मारून चहाची ऑर्डर दिली. तेवढ्यात वॉचमनने मला खुणावून तेच गोरेसाहेब असा इशारा केला. थोड्या वेळानं गोरेसाहेब आले त्यांची चहा झाल्यावर मी त्यांच्याकडे गेलो आणि समोर उभा राहिलो. त्यांनी त्रासिक मुद्रेने माझ्याकडे पाहिले आणि पुन्हा खाली पाहून काम करू लागले. मी घाबरत घाबरत म्हणालो,

‘साहेब! मी आज इथं रुजू व्हायला आलोय, हे बघा माझं नेमणूकपत्र!”

“मग, असं सांगा ना सरळ. इथे काय नुसते विठोबासारखे कंबरेवर हात ठेवून उभे रहायला आलात का?”

प्रथम दर्शनीच मला हा माणूस आवडला नव्हता आणि त्याचं हे पहिलं वाक्य मला एखाद्या काट्यासारखं बोचलं.

“नाही साहेब काम करायलाच आलोय. मी काय काम करू ते सांगा.

माझ्याकडे रागानं पाहून ते खेकसले, “गोपाळ! जा रे यांना त्या मीनाकुमारीच्या टेबलावर बसव!” गोपाळच्या मागोमाग मी मुकाट्याने गेलो आणि त्याने दाखवलेल्या जागेवर बसलो. मी निघाल्यावर गोरेसाहेब शेजारच्याला म्हणाल्याचं माझ्या कानावर आलं. “काय ध्यान आहे! तिकडे ती म्हातारी आणि हा म्हातारा! बँकेचा पेन्शनर क्लब करायचा विचार दिसतोय मॅनेजरचा!” मी मागे फिरलो आणि म्हणालो, “साहेब आपण मला काही म्हणालात का?” गोरेसाहेब म्हणाले, “अरे वा! तुमचे कानसुद्धा चांगले लांब दिसताहेत आजोबा!” त्याने माझा उल्लेख म्हातारा, आजोबा केल्याबरोबर मला बोचलेला काटा जास्तच रूतला. पण मी तो अपमान तसाच गिळला. जागेवर बसल्यावर मीनाकुमारीचे टेबल म्हणजे काय याचा खुलासा झाला. माझ्या टेबलामागेच भिंतीवर एक कॅलेंडर होते आणि त्यावर मीनाकुमारीचे चित्र! मी आजूबाजूस नजर फिरवली. बहुतेक सर्वांच्या तोंडावर छद्मी हास्य होते. फक्त माझ्या शेजारच्या टेबलावरच्या ढोमसेबाई माझ्याकडे पाहून मित्रत्वाने हसल्या. त्या अंगानं स्थूल, काळ्यासावळ्या आणि बरेचसे केस पिकल्यामुळे वयस्कर दिसत होत्या. मघाशी गोरेने ‘म्हातारी’ म्हणून उल्लेख केला, त्या ह्याच हे मी ताडले. त्यात ढोमसेबाईंचा एक डोळा काणा होता. त्या हसून म्हणाल्या हळूच “गावडे, त्या गोरेपासून सावध राहा. बगळ्याची पिसं पांघरलेला कावळा आहे तो कावळा!” मी फक्त मान हलवली.

थोड्या वेळानं गोपाळ आला आणि त्याने मला गोरेसाहेबांनी बोलावलंय म्हणून सांतिलं. मी उठून त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या समोर दोन जाड रजिस्टर्स आपटली आणि म्हणाले, म्हणाले कसले, खेकसलेच, “गावडे! ही रजिस्टर घ्या आणि पक्की करा!” मी ती बाडं घेऊन माझ्या जागेवर आलो. मला कामाची काही कल्पना नव्हती आणि गोरेला विचारायचीही सोय नव्हती. मी जागेवरच चुळबूळ करू लागलो. ढोमसेबाईंनी माझी अडचण ओळखली आणि त्या माझ्या मदतीला आल्या.

“गावडे! हे कच्चे रजिस्टर, यातल्या नोंदी या पक्क्या रजिस्टरमध्ये करा. चुका करू नका. “थॅँक्यू मॅडम!” मी म्हणालो.

समोरच्या टेबलावरचा कुलकर्णी, गोरेकडे पाहून छद्मीपणाने हसला. मी तिकडे दुर्लक्ष करून माझे काम करू लागलो. बाकी काही नसलं तरी माझं अक्षर मात्र अगदी मोत्यासारखं होतं! मी मन लावून रजिस्टर पूर्ण केलं. लंच टाईम कधी झाला मला पत्ताच लागला नाही. माझ्या पाठीवर कुणाची तरी जोरात थाप पडली आणि मानूम आवाज आला.

“अहो आजोबा! पुरे झालं काम, जेवायचं नाही वाटतं!” मी दचकून वर पाहिलं तर कुलकर्णी आणि गोरे जोरजोरात हसायला लागले. पुन्हा ‘आजोबा’ ऐकल्यावर मला राग आला. पण काय करणार! तो तसाच गिळला. लगेच पाटलाने माझ्या खांद्यावर थाप मारून म्हटले, “आजोबा, आज तुमची पार्टी, नवीन नोकरीची!” त्याबरोबर सगळ्या गोरे कंपूनेच मला घेरले आणि जवळजवळ जबरदस्तीनेच बाहेर काढले.

“काय गावडे! अगदी पहिल्याच दिवशी जमवलंत बुवा!” पाटील म्हणाला.

“जमवलं म्हणजे? मी नाही बुवा समजलो काय ते?” “अहो, म्हणजे मीनाकुमारीशी जमवलं म्हणताहेत ते!” सगळे जोरजोरात खिदळायला लागले.

“छे! छे! कुलकर्णी, अहो काय बोलताय हे तुम्ही? अहो किती चांगल्या आहेत त्या ढोमसेबाई. आज त्यांनी समजावून दिलं नसतं तर माझं काही खरं नव्हतं!” “तेच तर म्हणतोय आम्ही गावडे! तुम्ही दिसता तेवढे ‘हे’ नाही. चांगलेच आतल्या गाठीचे आहात की राव!” गोरे म्हणाले.

“छे! छे! गोरेसाहेब, अहो काहीतरीच काय. मी त्यांच्याकडे एक डोळासुद्धा वर करून पाहिले नाही!”

“तुम्ही नाही हो पाहिलेत! पण त्यांचा एक डोळा होता ना तुमच्याकडे!” कुलकर्णी म्हणाला आणि सगळेजण खो खो हसत सुटले. अशी संपूर्ण लंच टाईममध्ये त्या सगळ्यांनी माझी मनसोक्त भंकस केली. काटेरी तारेने कोणीतरी ओरबडावे तसा तो प्रकार होता. एखादा सडका आंबा सगळी पेटी नासवतो, तसे या मोरेने सर्वांना नासवले आहे असे मला वाटले.

लंचनंतर मी माझ्या जागेवर बसलो. तशा ढोमसेबाई पुन्हा माझ्या जागेवर आल्या आणि माझे काम पाहून म्हणाल्या,

“गावडे, तुमचे अक्षर फार सुंदर आहे आणि काम पण अतिशय टापटिपीचे दिसते. मॅनेजरसाहेब नक्कीच खूष होणार तुमच्यावर!’

-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..