या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असल्याने कापसावर आधारीत उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व जमनालाल बजाज यांच्या या जिल्ह्यातील वास्तव्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात ग्रामोद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. ग्रामोद्योग व लघुउद्योग यांचा विकास साधणारी, वर्धा योजना या नावाने ओळखली जाणारी जिल्हा विकासाची एक वैशिष्ट्यपूर्ण योजना १९९३ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. विदर्भातील पहिला साखर कारखाना याच जिल्ह्यातील दुसरबीड येथे आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव येथे औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत. सेवाग्राम येथील गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन, दत्तपूर येथील महारोगी सेवा समिती, वर्धा येथील महिला समाज व राष्ट्रभाषा प्रचार समिती, जमनालाल बजाज केंद्रीय ग्रामोद्योग अनुसंधान संस्था; कस्तुरबा हेल्थ सोसायटी, अखिल भारतीय चरखा संघ यांसारख्या अनेक सेवाभावी संस्था वर्धा जिल्ह्यातून कार्यरत आहेत.
Leave a Reply