चामोर्शी – या तालुक्यातील मार्कंडा हे प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. येथे विलक्षण नाजूक कोरीव काम असलेले, महादेवाचे हेमाडपंती देऊळ आहे. येथील देवास मार्कंडदेव असेही म्हणतात. याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
सिरोंचा – गोदावरी व प्राणहिता नद्यांच्या संगमावरील हे एक पवित्र स्थान आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ पर्वानिमित्त एक मोठी यात्रा भरते. देशभरातून अनेक नागरिक ह्यामधे सहभागी होत असतात. सिरोंचा तालुक्यातच सोमनूर येथे इंद्रावती व गोदावरी या नद्यांचा संगम झालेला आहे.
अलापल्ली – येथील ‘वनवैभव’ हे जंगल प्रसिद्ध आहे. या जंगलासह जिल्ह्यातील घनदाट जंगले ही वन्यप्राणी – पक्षांच्या अभ्यासकांना व धाडसी पर्यटकांना नेहमीच खुणावतात.
चपराळा – हे चामोर्शी तालुक्यातील, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले पवित्र क्षेत्र आहे. यास प्रशांतधाम असेही म्हणतात. येथील हनुमानाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. येथे हनुमान जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो.
महाल आमगाव – हे चामोर्शी तालुक्यातील ठिकाण असून येथे उत्कृष्ट शिल्पकला असलेली अनेक मंदिरे पाहायला मिळतात.
वैरागड- आरमोरी तालुक्यातील हे एक ऐतिहासिक गाव आहे. येथे गोंड राजा विराट याची राजधानी असलेला वैरागड किल्ला आहे. तसेच येथे भंडारेश्वर व गोरजाईची हेमाडपंती देवालये आहेत. या भागात खोदकाम व बांधकाम करताना येथील प्रशासनाची विशेष परवानगी घ्यावी लागते. कारण पुरातत्त्वकालीन महत्त्वाच्या वस्तू किंवा मौल्यवान वस्तू सापडण्याची शक्यता या भागात आजही अधिक आहे.
भामरागड – इंद्रावती, पामुलगोतम व परलेकोटा या नद्यांचा त्रिवेणी संगम झालेले हे स्थान आहे. बिनागोंडा येथे धबधबा असून हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.
याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे खास आकर्षण म्हणजे आमटे कुटुंबियांचा लोकबिरादरी प्रकल्प व बंग दांपत्याचा शोधग्राम प्रकल्प. ही आजच्या काळात आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
माझा जिल्हा