मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी

Jehangir Art Gallery, Mumbai

p-2324-jehangir-art-gallery

मुंबई शहरात अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी काळाच्या ओघात आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली. मुंबईतल्या या अशा काही वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘ जहांगीर आर्ट गॅलरी ‘. फोर्टमधील काळा घोडा परिसरात, प्रिन्स अॉफ वेल्स म्युझियमच्या मागच्या बाजूला असलेली ही गॅलरी १९५२ मध्ये बांधली गेली. गेल्या ६० वर्षांमध्ये जनसामान्यांपासून ते कलासंग्रहकांपर्यंत व नवोदित चित्रकारांपासून ते बुजुर्ग चित्रकार – शिल्पकारांपर्यंत सर्वांचे `जहांगीर आर्ट गॅलेरीशी ऋणानुबंध जुळलेले आहेत.

त्याकाळात मुंबईत प्रदर्शने भरवण्यासाठी आर्ट गॅलरीज नव्हत्या. बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक, चित्रांचे संग्राहक डॉ. होमी भाभा, चित्रकार के . के . हेब्बर, वॉल्टर लँगहॅमर, कलासमीक्षक रऊडी व्हॅन लायडन अशा अनेकांनी यासाठी प्रयत्न केले. बॅरिस्टर ओक हे चित्रकार आणि पेशाने वकील होते. बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले असताना तिथली कलादालने आणि प्रदर्शने पाहून मुंबईतही असे कलादालन व्हावे असे त्यांना वाटले. तत्कालीन मुख्यमंत्री बी. जे. खेर यांच्यामार्फत ओकांनी म्युझियमच्या आवारातील भूखंड मिळवला. सर कावसजी जहांगीर यांना या सर्वांनी गॅलरी बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून विनंती केली. सर कावसजी जहांगीर यांनी दिलेल्या देणगीतून सुमारे ६० लाख रुपये खर्च करून अद्ययावत वास्तू उभारण्यात आली. २१ जानेवारी १९५२ रोजी नव्या वास्तूत जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना झाली. कावसजी यांचे पुत्र जहांगीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आर्ट गॅलरीला ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ असे नाव देण्यात आले.

वास्तुकलेच्या दृष्टीने जहांगीर आर्ट गॅलरीला वेगळेच महत्त्व आहे. १९५० च्या दशकातल्या प्रसिद्ध आर्किटेक्ट दुर्गा बाजपेयी यांनी त्याचे डिझाइन केले. मुंबईच्या निओ गोथिक शैलीतल्या ब्रिटिशांचा वारसा जपणाऱ्या तसेच हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचा प्रभाव असणाऱ्या आर्ट डेको शैलीतल्या इमारती यांच्यापेक्षा वेगळी, अलंकरणापेक्षा उपयुक्ततेवर भर देणारी, भारतीयत्व जपणारी अशी आधुनिक शैली १९५० च्या दशकात इथे रुजवली गेली.

जहांगीर आर्ट गॅलेरीची इमारत वरवर पाहताना इतर सर्वसाधारण इमारतींसारखीच वाटते . पण तिच्या रचनेतले वेगळेपण व साधेपणातले सौंदर्य, हे तिच्या रचनेतले बारकावे व प्लॅनिंग लक्षात घेतल्यावरच प्रत्ययास येते . ही बैठी इमारत अंडाकृती आहे. या इमारतीला पहिला मजला आहे, काही भागापुरताच आहे . सभागृह आणि कलादालन अशा दोन्ही उद्देशाने ही गॅलरी बांधली आहे. २७०० चौरस फुटाचे ऑडिटोरियम कम आर्ट गॅलरी आणि ३,७०० चौरस फुटाची मोठी आर्ट गॅलरी असे या इमारतीचे दोन प्रमुख भाग आहेत.

१९६० मध्ये आर्ट गॅलरी वातानुकूलित करण्यात आली. २०१२ मध्ये ऑडिटोरियमचे नूतनीकरण करून तेही वातानुकूलित करण्यात आले. पण जहांगीरचे वैशिष्ट्य होते ते नैसर्गिक प्रकाश कलादालनामध्ये सौम्य तऱ्हेने सारख्या प्रमाणात पडेल अशा पद्धतीच्या रचनेत.

जहांगीरची दर्शनी बाजू अगदी साध्या भिंतीने बनवलेली आहे, जणू काही भारतातील कलाक्षेत्रातील एक माईलस्टोन अशी ओळख सहज बघताना कोणाला जाणवणारच नाही.  प्रवेशद्वारावरचे पुढे आलेले शिंपल्याच्या आकाराचे काँक्रीटचे छत एवढाच काय तो या इमारतीचा अलंकरणात्मक भाग.

प्रवेशद्वाराच्या वरच्या भिंतीवर असलेले जहांगीर आर्ट गॅलरी हे कॅपिटल अक्षरांमध्ये असलेले नाव साध्या आकारांच्या अक्षरांमध्ये आणि ती अक्षरवळणे आर्ट डेको शैलीची आठवण करून देणारी आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरी विविध उपक्रमांमुळे, चित्रकार आणि कलारसिकांच्या वर्दळीमुळे कलाक्षेत्रातील घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिली. जहांगीरमध्ये एम  एफ  हुसेन, एस एच रझा, माधव सातवळेकर, एम आर आचरेकर अशा चित्रकारांची प्रदर्शने झाली. अनेक प्रथितयश चित्रकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणारी रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनेही अनेक झाली.

दरवर्षी येथे नेमाने बॉम्बे आर्ट सोसायटी, इंडियन आर्ट सोसायटीची वार्षिक प्रदर्शने, राज्य कला प्रदर्शने अशी प्रदर्शने होतच असतात. इतर राज्यांतले चित्रकारही आवर्जुन जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शित करतात.

जहांगिरमध्ये काही वादही झाले आणि ते गाजलेही. ५० च्या दशकात अकबर पदमसींनी जहांगीरमध्ये भरवलेल्या प्रदर्शनातील काही चित्रांबाबत पोलिसांनी कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यांच्यावर खटला झाला. मात्र या खटल्यात निर्णय पदमसींच्या म्हणजेच कलावंतांच्या बाजूने लागला. एम एफ हुसेन यांच्या ‘श्वेतंबरा’ प्रदर्शनातील कापडाचे तागे आणि पसरलेली वृत्तपत्रे यांनी असेच वादळ निर्माण केले होते.

१९९० च्या सुमारास जहांगीरच्या बाहेरील पदपथावर नाममात्र भाडे भरून नवोदित चित्रकारांना चित्रे प्रदर्शित करण्याची सोय करून देण्यासाठी ‘आर्ट प्लाझा’ सुरू करण्यात आला. जहांगीरचा परिसर आता मुंबईतला आर्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*