लोकमान्य टिळक – लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली याच जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे म्हणत. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास त्यांनी सुरुवात केली.
गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते. कॉंग्रेसच्या १०० हून अधिक वर्षाच्या इतिहासात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणार्या तीन मराठी भाषिकांमधे त्यांचा समावेश होता.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे – १८ एप्रिल, १८५८ रोजी यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे जन्म झाला. थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जात. १८९१ च्या काळात पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवा महिलेशी पुनर्विवाह करून समाज सुधारणेच्या दिशेने त्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलले.
रँग्लर र. पु. परांजपे – यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८७६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ल्याजवळील मुर्डी या गावात झाला. मुंबई प्रांताचे शिक्षण मंत्री, अबकारी खात्याचे मंत्री, लखनौ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि ऑस्ट्रेलियात भारताचे हायकमिशनर आदी सन्मान्य पदे त्यांनी भूषवली. त्यांना केंब्रिज विद्यापीठाने सिनियर रँग्लर हा बहुमान बहाल केला.
रघुनाथ धोंडो कर्वे – संततिनियमनाची चळवळ ज्यांनी देशात सर्वप्रथम सुरू केली ते रघुनाथ धोंडो कर्वे मूळचे याच जिल्ह्यातले होते. यांचा जन्म १८८२ मध्ये सुवर्णदुर्गजवळच्या मुरुड येथे झाला. संततिनियमन, स्त्रियांचे आरोग्य, कामशास्त्र, आहारशास्त्र इत्यादी विषयावर त्यांनी ‘त्या’ काळात कार्य केले.
साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)- २४ डिसेंबर, १८९९ रोजी दापोलीजवळ पालगड येथे यांचा जन्म झाला. ‘श्यामची आई’ या मातृप्रेमाची महती सांगणार्या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक. यांनी स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने भाग घेतला. साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले.
बाळशास्त्री जांभेकर – हे मराठी वृत्तपत्रांचे जनक होत. दर्पणकार जांभेकर ह्यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले हे होय. यांनी ज्ञानेश्वरीचे पहिले मुद्रण १८४५ साली केले. यांना ९ भाषा अवगत होत्या.
डॉ. पांडुरंग वामन काणे – धर्मशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा जन्म चिपळूणजवळ पेढे-परशुराम येथे (७ मे,१८८०) झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच जिल्ह्यात दापोली येथे झाले. तसेच त्यांनी रत्नागिरी येथे काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. श्री. काणे यांना यथार्थतेने ‘महामहोपाध्याय’ म्हटले जाते आणि त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमानही १९६३ मध्ये बहाल करण्यात आला.
बाळ गंगाधर खेर – मुंबई राज्याचे / प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म २४ ऑगस्ट ,१८८८ रोजी रत्नागिरी येथे झाला. १९३७ ते ३९ व १९४६ ते ५२ या काळात त्यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रिपद भूषविले. १९५२ ते ५४ या काळात ब्रिटनमधे भारताचे राजदूत म्हणूनही काम पाहिले. पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहातही डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर श्री. खेर सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या सामाजिक सेवेची साक्ष म्हणून मुंबईतील त्या काळच्या मागासवर्गीय वस्तीला खेरवाडी असे नाव देण्यात आले.
कवी कृष्णाजी केशव दामले (केशवसूत) – यांचा जन्म १५ मार्च ,१८८६ रोजी या जिल्ह्यातील मालगुंड येथे झाला. यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते.
Leave a Reply