बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
ढाका ही बांगलादेश ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रम्हपुत्रा व गंगा ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.
स्वतंत्र बांगलादेश : भारतीय लष्कर व बांगलादेशची मुक्ती वाहिनी यांच्या संयुक्त लढ्यातून बांगलादेश मुक्त झाला. त्यानंतर पाकिस्तानने पूर्व बंगालचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजिबुर रहमान यांची मुक्तता केली. त्यांनी १९७२मध्येच ७४ लवाद नेमून ७०० युद्ध गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली होती; परंतु हे काम पूर्ण होण्याआधीच १९७५मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून लष्करातील पाक हस्तकांनी बंड करून शेख मुजिबुर व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली. शेख हसीना ही त्यांची कन्या देशात नसल्याने वाचली. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक व अधिकारी भारतीय लष्कराला शरण आले होते. त्यातील १९५ अधिकारी व सैनिकांवर ‘युद्ध गुन्हेगारी’चा ठपका होता.
१९७२च्या सिमला करारात पाकिस्तानचे तेव्हाचे प्रशासक झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना या युद्ध गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानने ते पाळले नाही. भुट्टोंनी ९३ हजार सैनिकांच्या मुक्ततेसाठी अनेक आश्वासने दिली; परंतु ते साध्य होताच भारताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून ते कामाला लागले. १९६५, तसेच १९७१च्या युद्धातील भारतीय युद्धकैद्यांची मुक्तता होण्यासाठी भारताने पाक सैन्यातील ९३ हजार प्रमुख अधिकाऱ्यांना ओलिस ठेवले असते, तर भारतीय युद्धकैदी पाक तुरुंगात खितपत पडले नसते. तसेच १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामातील १९५ दोषी पाक लष्करी अधिकारी व सैनिकांना पाकऐवजी बांगलादेशकडे सोपवून त्यांच्यावर लष्करी कोर्टात कारवाई करता आली असती. पाकिस्तानी लष्कराला साथ देणाऱ्या बंगाली युद्ध गुन्हेगारांनी पाकिस्तान, तसेच युरोपीय देशांत आश्रय घेतला होता. पाकिस्तानच्या प्रेरणेने लोकशाही सरकारविरुद्ध कट करणाऱ्या मेजर जनरल झिया उर रेहमान, लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटींनी या युद्ध गुन्हेगारांना परतण्याची मुभा दिली. त्यातील काही राजकीय प्रवाहात सामील झाले. त्यातील काहींना लष्करी राजवटीप्रमाणेच ‘बीएनपी’च्या बेगम खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदेही मिळाली.
सलाहुद्दीन कादर चौधरी : हा २०१५ साली २२ नोव्हेंबरला फाशी गेलेला ‘जमाते इस्लामी’चा नेता अखंड पाकिस्तानातील हंगामी राष्ट्राध्यक्षांचा मुलगा होता. त्याची फाशी पाकिस्तानला विशेष झोंबली होती. पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशातील युद्ध गुन्हेगारांवरील कारवाईचा निषेध केला होता. पूर्व पाकिस्तान फुटून निघाल्याचे वास्तव सुरुवातीला पाकिस्तानने मान्य केले नाही. बांगलादेश मुक्त झाल्यानंतरही त्याने शेख मुजीब यांना तुरुंगातून सोडले नव्हते. जगभरातून दबाव आल्यामुळेच शेख मुजीब यांची हत्या न करता त्यांना मुक्त करणे पाकिस्तानला भाग पडले होते. कदाचित ९३ हजार पाकिस्तानी युद्धकैदी भारताच्या ताब्यात असल्यामुळेही मुजीब यांचे प्राण वाचले असतील. बांगलादेशला मान्यता देण्यास पाकिस्तानने १९७४ची वाट पाहिली. पाकिस्तानच्या हस्तकांवर १९७१मधील गंभीर गुन्ह्यांबद्दल कारवाई करण्यासही इस्लामाबादचा आक्षेप आहे. पूर्व पाकिस्तानच्या बंगाली जनतेवरील निर्दयी अत्याचारांबद्दल पाकिस्तानने अजून माफी मागितलेली नाही. इस्लामी कट्टरतावाद्यांच्या मदतीने बांगलादेशला पुन्हा एकदा आपल्या कवेत घेण्याचे पाक लष्कराचे स्वप्न आहे.
अस्थिर बांगलादेश : पंतप्रधान शेख हसीना यांनी १९७१च्या युद्ध गुन्हेगारांवरील कारवाई निर्धाराने चालवली असली, तरी देशात २०१६ सालीही राजकीय स्थैर्य नाही. २००९ची निवडणूक त्यांच्या अवामी लीगने जिंकली. २०१४मधील निवडणुकीपूर्वी हंगामी काळजीवाहू सरकारच्या स्थापनेवरून ‘बीएनपी’च्या नेत्या बेगम खालिदा झियांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. त्यातून बीएनपी व ‘जमाते इस्लामी’ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे बांगलादेश संसदेत विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. परिणामी अवामी लीगची एकतंत्री, एकाधिकारशाही राजवटी आहे. बेगम झिया यांच्या २००९पूर्वीच्या सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. माजी पंतप्रधान बेगम झियांवर १७५ कोटी डॉलरच्या भ्रष्टाचाराप्रमाणेच इतर अनेक गुन्हे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्या कोर्टापुढे हजर झाल्या होत्या. त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यांचा एक मुलगा परदेशात पळून गेला आहे.
बांगलादेशात लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटीविरुद्धही शेख हसीना आणि बेगम झिया एकत्र आल्या होत्या. परिणामी २००९ची निवडणूक खुली होऊन शेख हसीना यांचा पक्ष विजयी झाला. बेगम झिया यांना पराभव पचवता आला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाने देशव्यापी हरताळ, संपाद्वारे सरकारला हवालदिल केले. या दोघींमधील वैमनस्य २०१४मध्ये विकोपाला गेले. बेगम झियांनी आपल्या सत्ता काळात शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या आारोपाखाली अकरा महिने तुरुंगात डांबले होते. आता पाच प्रकरणांत शेख हसीना यांनी बेगम झियांना आरोपी केले आहे. या दोघी इर्शाद यांच्या विरोधात एकत्रित लढल्या; पण आता तेच इर्शाद पंतप्रधान शेख हसीना यांचे विशेष सल्लागार आहेत, तर त्यांच्या जातीय पार्टीचे तिघे मंत्री आहेत. याच इर्शाद यांच्या लष्करी राजवटीने १९८८मध्ये बांगलादेशाला इस्लामी राष्ट्र घोषित केले होते. शेख हसीना यांना बांगलादेश पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावे, असे वाटते. परंतु तेथील कोर्टाने ती मागणी फेटाळली आहे.
बांगलादेशच्या पश्चिम व उत्तरेला भारत आहे. पूर्वेस भारत व म्यानमार तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे.
बांगलादेशमध्ये सहा प्रशासकीय प्रभाग आहेत – बारिसाल, चित्तागॉँग, ढाका, खुलना, राजशाही व सिलहट. हे प्रभाग ६४ जिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अनेक उपजिल्हे असतात तर उपजिल्ह्यांची थाना या प्रशासकीय एककात विभागणी करण्यात आली आहे.
ढाका बांगलादेशची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. चित्तागॉँग, खुलना, राजशाही, बारिसाल व सिलहट ही इतर मोठी शहरे आहेत. ही शहरे महापौर निवडतात तर इतर शहरांतून नगराध्यक्ष असतो. दोघांची निवड पाच वर्षांसाठी असते.
बाग्लादेश निर्मितीपासूनच भारताचे बांगलादेशाशी बरे संबंध आहेत.
बांगलादेश आर्थिकदृष्ट्या विकसनशील देश आहे. येथील नागरिकांची सरासरी वार्षिक कमाई २,३०० अमेरिकन डॉलर आहे. जगातील ही सरासरी १०,२०० अमेरिकन डॉलर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : ढाका
अधिकृत भाषा : बंगाली (बांगला)
स्वातंत्र्य दिवस : मार्च २६, १९७१
राष्ट्रीय चलन : बांगलादेशी टका (BDT)
( Source : Wikipedia )
Leave a Reply