अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली.
जिल्ह्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था लक्षात घेता, पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये ज्वारी, गहू, तूर, कापूस व संत्रे या पिकांसंबंधी संशोधन करण्यात येते. तसेच पशुपालन, फळबाग लागवड व पिकांवरील रोगराई हे देखील संशोधनाचे विषय आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी अभियांत्रिकी, कृषी तंत्रज्ञान, जमीन व जलसंधारण, जलसिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे मुख्यालय अकोला येथे असुन एप्रिल, १९७६ रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अन्नधान्य,बी-बियाणांबाबत संशोधन आणि त्याचा विकास व निर्मितीचे कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. अनुकूल हवामान व जमीन यामुळे हा जिल्हा कापूस उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कापूस हेच जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे.ज्वारी, मूग, तूर ही जिल्ह्यातील खरीपाची प्रमुख पिके असून खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला महाराष्ट्रात आघाडीवर असणार्या जिल्ह्यांपैकी एक आहे.तसंच गहू, हरभरा ही अकोला जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पिके आहेत. संत्री हेदेखील जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक असून मिरची व ऊसाचे पीकही ह्या जिल्ह्यात घेतले जाते.
Leave a Reply