महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो.
गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात.
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
Leave a Reply