प्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत.येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे. भंडारा शहरात छत्रनाथ गोसावी उर्फ अलोन बाबा यांनी स्थापन केलेला मठ आहे. अलोन बाबा मीठ खात नसल्यामुळे आजही त्यांचे अनुयायी येथे मीठ न खाण्याचा नियम पाळतात.
रावणवाडी येथील १०० वर्षे जुने राममंदिर असून या देवळात आजही भाविकांची गर्दी होते. भंडार्यापासून २० कि.मी. अंतरावर मोहाडी या ठिकाणी चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे, व चौंडेश्वरी देवी भंडारा जिल्ह्यातील अंबागड येथे मध्ययुगीन किल्ला असून बख्त बुलंदशाह या गोंड राजाच्या कालावधीत १८ व्या शतकात बांधल्याचं इतिहास सांगतो. जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण ‘पदमावती नगरी’ म्हणून ओळखले जात असे. वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र असून तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे.तिथे कर्हाडा आणि बालसमुद्रथ असे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून येथील सांगडी किल्ला व चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.
पवनी तालुक्यातील अड्याळ येथील श्रीहनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमीला येथे यात्रा भरते व ही यात्रा घोड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पवनी येथेच आद्यकवी मुकुंदराज यांचे स्मारक आहे.
वैनगंगा नदीच्या पात्रात माडगी हे बेट निर्माण झाले आहे. येथे प्राचीन नृसिंह मंदिर असून येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. येथे गोमुखातून सतत पडणारी धार अति पवित्र समजली जाते. महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते. कोका हे जंगलात वसलेले प्रसिद्ध स्थळ आहे. येथे डिसेंबर महिन्यात सैबेरियामधून येणारे पक्षी थंडीतील स्थलांतरादरम्यान येतात व जानेवारीच्या मध्यास परत जातात.
Leave a Reply