रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आहे. त्याचबरोबर भिरा व भिवपुरी हीदेखील दोन महत्त्वाची जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत. उरण येथे नैसर्गिक वायू साठवला जातो, तेथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव ज्याला देण्यात आले, ते न्हावाशेवा (जे.एन्.पी.टी.) आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक बंदर हे रायगडच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे, असे म्हटले जाते. १९१२ साली येथे सागरी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करणार्‍या या बंदरामुळे पनवेल, उरण, अलिबाग या शहरांच्या किंबहुना रायगड जिल्ह्याच्याच विकासाला चालना मिळाली आहे. नागोठणे येथे इंडियन पेट्रो केमिकल हा उद्योग क्षेत्रातील मोठा प्रकल्प आहे.
थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते. तसेच कीटकनाशके बनवणारा आशियातील सर्वात मोठा हिंदुस्थान इन्सेक्टीसाइड्स हा कारखानाही पनवेल तालुक्यात रसायनी येथे आहे. याच तालुक्यात आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करणारा धूत पापेश्वर हा मोठा कारखाना आहे. महाड येथे हातकागद तयार करण्याचा उद्योग आहे तर रोहे व खोपोली येथे पुठ्ठे तयार करण्याचा व्यवसाय चालतो. पेण येथे शाडूच्या मूर्ती तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय असून तेथे तयार होणार्‍या गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पेण येथे पोहे पापड विक्री घरगुती महिला मोठ्या प्रमाणावर करतात. अधिक लांबीचा समुद्र किनारा, खाड्या, यांमुळे मासेमारी व प्रक्रिया उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. पापलेट, हाईद, सुरमई, बांगडा इत्यादी जातींचे मासे येथे पकडले जातात.

1 Comment on रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Leave a Reply

Your email address will not be published.


*