मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व काँगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ही काँगो नदीची एक प्रमुख उपनदी मआप्रच्या दक्षिण दिशेने वाहते. बांगुई ही मआप्रची राजधानी व सर्वात मोठे शहर ह्याच नदीवर वसलेले आहे.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय शोधक मध्य आफ्रिकेमध्ये पोचले व १८८२ साली फ्रान्सने फ्रेंच काँगो वसाहत निर्माण केली. १ डिसेंबर १९५८ रोजी ह्या वसाहतीला स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला. बार्थेलेमी बोगांडा ह्या नव्या स्वायत्त प्रदेशाचा पंतप्रधान बनला परंतु काही अवधीतच त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. १३ ऑगस्ट १९६० रोजी मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाला स्वातंत्र्य मिळाले व सत्ता स्थापण्यासाठी बोगांडाच्या दोन सहकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. ३१ डिसेंबर १९६५ रोजी कर्नल ज्याँ-बेडेल बोकासा ह्या लष्करी अधिकाऱ्याने बंडामधून सत्ता बळकावली. त्याने देशाचे संविधान बरखास्त करून स्वत:ला मध्य आफ्रिकेचा सम्राट ही उपाधी दिली. त्याने तब्बल १४ वर्षे मध्य आफ्रिकेवर हुकुमशाही गाजवल्यानंतर १९७९ साली फ्रान्सने त्याला हुसकावुन लावले परंतु पुन्हा दोन वर्षांनी एका नव्या लष्करी अधिकाऱ्याने सत्ता हातात घेतली. आजही लोकशाही केवळ नावापुरतीच अस्तित्वात असलेल्या ह्या देशामध्ये फ्रांस्वा बोझिझे हा लष्करप्रमुख २००३ सालापासून राष्ट्राध्यक्ष आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक जगात सर्वात खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. सध्या येथील अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत असून हा देश जवळजवळ संपूर्णपणे विदेशी अनुदानावर अवलंबुन आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : बांगुई
अधिकृत भाषा : फ्रेंच, सांगो
स्वातंत्र्य दिवस : १३ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन : मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply