तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.
वासुदेव बळवंत फडके – आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यात १८४५ साली शिरढोण या गावी झाला. यानंतर मुंबई मिलिटरी अकाऊंट्स् खात्यात ते नोकरीला होते. नंतर पुणे व सातारा या जिल्ह्यांतील तरुणांना संघटित करून त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध बंड पुकारले. त्यांच्या बंडामुळे सर्व भारतभर व इग्लंडमध्ये खळबळ उडाली.
गोडसे भटजी – माझा प्रवास’ हे प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी हेदेखील याच जिल्ह्यातील वरसाई गावचे होत. हे प्रवासवर्णन मराठीतील पहिले प्रवासवर्णन मानले जाते.
आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही, महात्मा गांधींचे परमशिष्य आचार्य विनोबा भावे हे देखील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या गावचे. १८९५ मध्ये गागोदयात त्यांचा जन्म झाला.
शिवराम महादेव परांजपे – प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, निर्भीड पत्रकार व प्रभावी वक्ते म्हणून ख्याती असलेले शिवराम महादेव परांजपे हे मूळचे महाडचे रहिवासी होत. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातील जहाल लिखाणाबद्दल राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना एकोणीस महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. ‘काळकर्ते परांजपे’ या नावानेच ते ओळखले जात.
सी.डी. देशमुख – रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, ज्येष्ठ अर्थतज्ञ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख (सी.डी.देशमुख) यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नाते या गावचा. त्यांचे बालपणही जिल्ह्यातील तळे व रोहा येथे गेले. त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीचे हे सर्वप्रथम विजेते होते. इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेत १९१८ साली सर्वांत अधिक गुण मिळवणारे हे पहिले भारतीय ठरले. हा विक्रम नंतर इतर कुणीही भारतीय मोडू शकला नाही. १९३७ साली ‘सर’ ही उपाधी देऊन ब्रिटिश सरकारने त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला. १९५० च्या मे महिन्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. उत्तम प्रशासकीय सेवेबद्दल मॅगसेसे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे पारितोषिक १९५९ साली त्यांना मिळाले.
प्रबोधनकार ठाकरे – केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे) यांचा जन्मही याच जिल्ह्यातला. समाजसुधारक, पत्रकार, प्रभावी वक्ते आणि इतिहासकार असा नावलौकिक त्यांनी मिळवला. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन ही नियतकालिके त्यांनी चालवली. प्रबोधन या नियतकालिकामुळे त्यांना प्रबोधनकार असे संबोधले जायचे.
गणपत कृष्णाजी पाटील – आद्य मराठी भाषिक मुद्रक व प्रकाशक गणपत कृष्णाजी पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील थळ या गावी झाला. त्यांनी स्वतःने चरबीरहित शाई तयार करून बोरीबंदरजवळ शिळा छापखाना उभारला.यांनीच महाराष्ट्रात सुबक मुद्रणाचा पाया घातला.
Leave a Reply