पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, उरूस या माध्यमांतून संस्कृतीचे दर्शन तर आपल्याला होतेच पण त्याबरोबरच लग्न, सण-समारंभ, व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रसंगी पुणेकरांचा उत्साह अवर्णनीय असतो. समाज अधिक संख्येने एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवला सुरूवात केली. या उत्सवांनी आज देशात भव्य स्वरूप प्राप्त केले असून, पुण्याचा गणेशोत्सव तर जागतिक कीर्तीचे वैशिष्ट्य बनला आहे.
पुण्यातील विविध स्वातंत्र्यसेनानींनी, राजकीय कार्यकर्त्यांनी व समाजसुधारकांनी शिक्षण या मुद्याला सर्वाधिक महत्त्व दिल्यामुळे त्या काळापासून पुण्यात शैक्षणिक संस्थांची एक दर्जेदार, गुणवत्तापूर्ण श्रृंखलाच निर्माण झाली. या समृद्ध भूतकाळाच्या आधारावरच पुणे आज भारतातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांबरोबरच संशोधनात्मक, प्रशिक्षणात्मक संस्थाही पुण्यात स्थापन होऊन विकसित झाल्या. बदलत्या जीवनशैलीमुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि लोकजीवनाच्या उत्साहामध्ये तीळमात्रही फरक पडलेला नाही.
Leave a Reply