कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.१९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले आणि याच वर्षी कर्मवीरांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाउसची स्थापना केली. छत्रपती शिवाजी कॉलेज हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या वतीने १९४७ मध्ये सुरू करण्यात आले.‘स्वावलंबी शिक्षण’ आणि ‘कमवा व शिका’ ही सूत्रे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली.
शैक्षणिकदृष्ट्या सातारा जिल्हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. विद्यापीठाच्या अखत्यारीत एकूण ५६ महाविद्यालये सातारा जिल्ह्यात आहेत.महाबळेश्र्वर तालुक्यातील पाचगणी येथे दर्जेदार निवासी शाळा असून हे जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले आहेत व संपूर्ण भारतातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी विकसित केलेल्या कर्हाड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सातार्यातील तसंच भारतातील ही पहिली सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळाही येथे असून १९६१ मध्ये, यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्थापन केली.
इतर संस्था – वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्र्वकोश निर्मिती महामंडळाचे कार्यालय आहे. याच महामंडळाच्या कामाद्वारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी भाषेची सेवा करुन वाई जिल्ह्याचा लौकिक वाढवला. पुण्यातील अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेचे ग्रामीण उद्योजकता विकास केंद्र फलटण तालुक्यातील गणेशनगर येथे असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आनंद कर्वे हे या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.पर्यावरण व ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील अँश्डेन पुरस्कार (ग्रीन ऑस्कर) त्यांना प्राप्त झालेला आहे.
Leave a Reply