येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.
वारली जमातीची चित्रकला केवळ भारतातच नव्हे तर जगात विशेष प्रसिद्ध आहे. सणासुदीला, तसेच लग्नसोहळ्याच्या वेळी वारली लोक झोपडीच्या भिंतींवर परंपरागत पद्धतीने चौक काढून त्यात चित्रे काढतात. चित्रातील विषय प्रामुख्याने त्यांचा आदिम धर्म, नित्यनैमित्तिक जीवनातील दृश्ये, भौमितिक रचनाबंध, शिकारीची दृश्ये, सुगीचा हंगाम, नृत्य, मिरवणूक हे असतात. वारलींसह कातकरी, ठाकर, धोंडिया, मल्हार-कोळी, भिल्ल, काथोडी इत्यादी आदिवासी जमाती ह्या जिल्ह्यात आढळतात. डहाणू, जव्हार, शहापूर, मोखाडे या तालुक्यातील डोंगराळ भागात आदिवासी जास्त संख्येने राहतात. या आदिवासींचे ”तारपा नृत्य’ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.
Leave a Reply