पुणे जिल्ह्याच्या दक्षिण अंगाला भोर तालुका आहे. भोर हे गाव नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. पुणे -कापुरव्हळ-भोर असा गाडीमार्ग आहे. तसेच पंढरपूर महाळ हा राज्यमार्गही भोर मधून जातो.
भोर पासून सात – आठ किलोमीटर अंतरावर रोहीडा किल्ला आहे. भोर कडून मांढरदेव कडे जाणार्या मार्गावर बाजारवाडीकडे जाणारा फाटा आहे. बाजारवाडी हे गाव रोहीडा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. भोरपासून एस.टी.बसची सोय आहे. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे आहे.
या शिवाय अंबवडेच्या बाजुनेही गडावर येता येते. ही पायवाट खूप लांबची आणि वळसा मारुन येते. पायथ्याच्या बाजारवाडीतून मात्र गडावर जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. या वाटेने तासाभरात आपण गडाच्या दरवाजापर्यंत चढून जातो.
रोहीडय़ाला एका पाठोपाठ तीन दरवाजे आहेत. पहील्या दरवाजावर गणेशपट्टी पट्टी आहे. दुसर्या दरवाज्यावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाच्या आतल्या बाजुला पाण्याचे टाके आहे. कातळातील हे पाणी बाराही महिने थंडगार असते. रोहीडय़ाचा किल्ला चढून धापा टाकत या पाण्याजवळ पोहचल्यावर या पाण्याची चव अमृतासमान लागते. दाराजवळ पाण्याचे टाके असणे वैशिष्ठपूर्ण आहे. क्वचीत काही ठिकाणी दाराजवळ पाणी मिळते. असे टाके सालोटा किल्ल्याच्या दाराजवळ आहे.
गडाचा तिसरा दरवाजा उत्तम प्रतीचा आहे. या दरवाजावर चंद्र, सुर्य, मासा, कमळ अशी शिल्पे सजवलेली आहेत. बाजूला हत्ती कोरलेले आहेत तसेच येथे मराठी व फारसी शिलालेखही लावलेला आहे.
शिवकालात महाराजांनी गडाचे नाव विचित्रगड असे ठेवले होते. रोहीडा उर्फ विचित्रगड या किल्ल्यावर मंदिर आहे. ते मंदिर रोहीडमल्ल उर्फ भैरवा चे आहे. या वरुनच गडाला रोहीडा हे नाव मिळाले असावे. सध्या काही लो याला रोहीडेश्वरही म्हणतात याचा उल्लेख रोहीडेश्वर असा केल्या गेल्या मुळे अनेकांचा असा समज होतो की, शिवरायांनी मावळ्यांच्या सोबतीने येथेच स्वराज्याची शपथ घेतली असावी.
रोहीडेश्वर आणि रायरेश्वरामधे फरक असून रायरेश्वर येथून दूर अंतरावर आहे. रोहीडय़ाच्या किल्ल्याच्या तटबंदीमधे सात बुरुज आहेत. या बुरुजांना नावेही दिलेली आहेत. शिरवले बुरुज, दामगुडे बुरुज, पाटणे बुरुज, वाघजाईचा बुरुज, फत्ते बुरुज तसेच शर्जा बुरुज अशी नावे आहेत.
गडाचा चहुअंगाने बांधलेली भक्कम तटबंदी आता काही ठिकाणी ढासळत चाललेली आहे. गडावरील मंदिरामधे गणपती, भैरव तसेच शिवपिंड ही आहे. दारामधे दीपमाळ आहे. जवळच एक थडगेही आहे. मात्र ते कोणाचे हे मात्र कळत नाही.
गडावर पाणी पुरवठय़ासाठी असणारी टाकी आहेत. त्यातील एक टाके जमिनीमधे असून एका भोकामधून आत जाता येते.
शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे.
गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात.
‘महान्यूज’च्या सौजन्याने वाटेल.
Leave a Reply