मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ‘मारबत व बडग्या’ या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. या जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला असल्याने जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठया प्रमाणावर आहे.
देवरी, सालेकसा, आमगाव, अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतील डोंगराळ भागात व दाट जंगलांच्या प्रदेशात गोंड, गोवारी, हळबी यांसारख्या आदिवासी जमाती राहतात. गोंड ही भारतातील संख्येने सर्वांत मोठी असलेली आदिवासी जमात आहे. हे लोक गोंडी बोलीभाषा बोलतात. गोंडी बोली तमीळ व कन्नडशी मिळतीजुळती आहे. या जमातींच्या काही वेगळ्या चालीरिती व रूढी असून, ‘पेरसा पेन’ हा त्यांचा मुख्य देव आहे. पिकांची कापणी झाल्यावर व काही सणासमारंभाला हे आदिवासी लोक, ‘रेला’ किंवा ‘ढोल’ नावाचे नृत्य करून आपला आनंद साजरा करतात.
Leave a Reply