या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.
या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
रामायणकाळात अगस्त्यनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनार्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनार्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे.
Leave a Reply