नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीने गोदावरी नदीकाठी प्रायश्चित घेतले, तेव्हा त्याला ‘नंदी तट’ असे संबोधले गेले व त्याचा अपभ्रश होऊन नांदेड असे नाव पडले अशीही एक कथा सांगितली जाते. पांडव नांदेडला येऊन गेल्याचा उल्लेख पुराणामध्ये सापडतो.
आंध्रभृत्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, बहामनी व मोगल अशा राजवटी या प्रदेशाने अनुभवल्या. इ. स. १७२५ मध्ये हा प्रदेश हैद्राबादच्या निजामाच्या अमलाखाली आला. हैद्राबाद मुक्ती संग्रामात (मराठवाडा मुक्ती संग्रामात) नांदेड भागातील लोकांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण होते. मात्र दिनांक १८ सप्टेंबर, १९४८ रोजी निजामाने भारतातील विलीनीकरणास मान्यता दिल्यानंतर नांदेडचा भारतात समावेश झाला. यानंतर दिनांक १ मे, १९६० रोजी नांदेडला महाराष्ट्रातील स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान प्राप्त झाले.
Leave a Reply